‘लोकरंग’मधील (८ ऑक्टोबर) राजेश्वरी देशपांडे यांचा ‘टॉयलेट : एक (सरकारी) भयकथा’ हा लेख वाचला. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘हागणदारीमुक्त भारत’ करण्यासाठी व्यवस्थेकडून अधिकाराचा वापर केला जात आहे. मात्र हागणदारीमुक्त भारतासाठी व्यवस्था आपले कर्तव्य पार पाडत नाही. शहरी घरे लहान असतात. लहान शहरांत आजसुद्धा भूमिगत मैलावाहू व्यवस्था नाही. त्यामुळे लहान आकाराच्या घरात शौचालय बांधण्यात अडचण निर्माण होते. एक उदाहरण द्यावेसे वाटते- अक्कलकोट नगर परिषदेला आमच्या एका मित्राने तीन वेळा विनंती अर्ज करून कुंभार गल्लीत भूमिगत मैलावाहू व्यवस्था करण्याची मागणी केली. अशी व्यवस्था नसल्याने घरात शौचालय बांधून स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग घेता येत नसल्याचे अर्जात नमूद केले. मात्र अनेक महिने उलटून गेले तरी त्या अर्जावर नगर परिषदेने काहीच कारवाई केली नाही. उलट त्या परिसरातील रहिवासी नाइलाजास्तव उघडय़ावर शौचास बसल्यास त्यांच्यासमोर फटाके उडवून त्यांना पळवून लावले जात आहे. एकविसाव्या शतकातील भारताचे हे दुर्दैवी चित्र आहे. मग मित्राने कंटाळून या नगर परिषदेकडून भूमिगत मैलावाहू व्यवस्थेची तयार केली जात नसल्याने घरात शौचालय बांधता येत नाहीय, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. महिना उलटून गेला तरी तिथूनही काही सकारात्मक निर्णय हाती पडला नाही. आता माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून अर्जावर काय कार्यवाही केली याची माहिती मित्र घेत आहे. हे सर्व पाहता व्यवस्थेकडून अधिकाराचा वापर होतानाच कर्तव्यात कसूर होत आहे. यामुळे ‘हागणदारीमुक्त भारत’ हे एक स्वप्नच ठरत आहे. गरीब जनतेसाठी मात्र ‘टॉयलेट.. एक भयकथा’ हाच प्रकार आहे.

सलीम सय्यद, सोलापूर

नराश्याचे अंतरंग

सचिन कुंडलकर यांचा ‘नराश्याची सुबक नोंदवही’ हा लेख (२४ सप्टेंबर) व त्यासोबतचे नीलेश जाधव यांनी काढलेले समर्पक रेखाचित्र आवडले. कपाटे वा घर साफ करणे, संपूर्ण स्वयंपाक करणे या उपायांतून मन:शांती मिळवण्याचा लेखकाने शोधलेला उपाय नराश्याचे खोल अंतरंग उलगडून दाखवतो. अशी घरकामे करायला घेतली, की ती ठरवल्याप्रमाणे पूर्ण करणे हे बहुतांशी आपल्या हातात असते, आणि म्हणूनच ती पूर्णत्वास नेता येतात व त्याचे समाधान मिळते. (एखाद्या नामाचा ठरावीक वेळा जप करणे, जपमाळेचे मणी मोजणे ही याचीच उदाहरणे आहेत.) गाणे ऐकतानाही मन:शांती मिळते. कारण लय, ताल, सम आपल्या अपेक्षेप्रमाणे येत राहतात. अपयशामुळे नराश्य येते, असे समजले जाते. ते पूर्ण सत्य वाटत नाही. एखाद्या कठीण परीक्षेत अपेक्षित यश न मिळणे, अंतराळ मोहीम अयशस्वी होणे, अशा गोष्टींमुळे संबंधितांना वाईट वाटू शकते वा क्षणिक नराश्य येऊ शकते, पण त्याचा आजार होत नाही. याचे कारण म्हणजे, इतक्या जिकिरीच्या गोष्टीत अपयश येण्याची शक्यता अंतर्मनाने गृहीतच धरलेली असते. साध्या साध्या गोष्टीसुद्धा अपेक्षेप्रमाणे जेव्हा पूर्ण होऊ शकत नाहीत तेव्हा विचारी मनास त्याचा त्रास होतो आणि नराश्याचे रूपांतर आजारात होते. दैनंदिन आयुष्यातली ‘प्रेडिक्टेबिलिटी’ वाढवणे किंवा तशी ती नसली तरी त्यावर विचारच न करणे हे दोन्हीही सोपे नाही. साध्या गोष्टीसुद्धा मनाप्रमाणे घडणार नाहीत अशीच खूणगाठ मनाशी बांधून ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा’ अशी मानसिकता (‘त्या’ भावगीतापेक्षा वेगळ्या अर्थाने) बाळगणे एवढेच मग अशा माणसाच्या हाती शिल्लक राहते.

प्रसाद दीक्षित, ठाणे

लंकेश यांनी काश्मिरी पंडितांबद्दलही लिहिले होते का?

१७ सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मधील ‘लढवय्यी पत्रकार’ हा राजा शिरगुप्पे यांचा लेख वाचला. लेखात गौरी लंकेश या बंगळुरू येथे हत्या झालेल्या महिला पत्रकाराचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. अर्थातच, माझ्यासारख्या मराठी वाचकाला लंकेश यांच्याबद्दल व त्यांच्या पत्रकारितेबद्दल अजिबातच माहिती नव्हती. ती शिरगुप्पे यांच्या लेखामुळे मिळाली. या लेखात म्हटले आहे, की गौरी लंकेश या त्यांच्या ‘गौरी लंकेश पत्रिके’तील ‘कंड हागे’(जे पाहिले ते) या सदरात भारतातीलच नव्हे, तर जगभरात घडणाऱ्या अयोग्य, अन्याय्य गोष्टींबद्दल रोखठोक पण सत्यनिष्ठ, शास्त्रीय पद्धतीने आणि मुद्देसूद मांडणी करीत. हे पाहता शिरगुप्पे यांना विचारावेसे वाटते, की लंकेश यांनी त्यांच्या सदरात भारतातीलच काश्मिरी पंडितांचे नृशंस हत्याकांड, त्यांच्या स्त्रियांवरील अनन्वित अत्याचार, त्यांना त्यांच्या मातृभूमीतून हुसकावून लावण्यामुळे पदरी आलेले विस्थापितांचे आयुष्य यांबद्दल काही लिखाण केले होते का? यावर प्रकाश टाकला जावा.

सुहास जी. जोशी, मुंबई

विशाल कार्याचा पट

‘लोकरंग’मधील ‘संचिताचे कवडसे’ हे डॉ. विकास आमटे यांचे सदर वाचनात येते. बाबा आमटेंच्या आभाळाएवढय़ा कामाबद्दल जेवढे बोलावे, वाचावे, लिहावे तेवढे थोडेच आहे. या विशाल कार्याचा पट मोजक्या शब्दांत डॉ. विकास आमटे थोडा थोडा करीत उलगडून दाखवीत आहेत. अंगावर काटा आणणारे प्रसंग, ध्येयासाठी घेतलेले अतोनात कष्ट, अकल्पित आयुष्य जगलेली-जगणारी माणसे अशा गोष्टींची रेलचेल या सदरात असते. या सगळ्या गोष्टी मुळातच आकर्षक वाटत असल्या तरी त्यांना सुसंगतपणे जोडून, कंटाळवाणेपणा न येऊ देता ओघवत्या शब्दांत मांडणे हे एक शिवधनुष्यच आहे आणि ते विकास आमटे यांनी लीलया पेलले आहे. बाबा आमटेंच्या कविता, मते योग्य ठिकाणी उद्धृत करून विकास आमटेंनी या सदराची रंगत आणखीच वाढवली आहे.

मंदार ज. कुलकर्णी, पुणे.