सचिन कुंडलकर यांच्या ‘करंट’ या सदरातील लेख हे बऱ्याच वेळा एकांगी व भरकटलेले असतात. त्यांच्या लिखाणातून वैफल्य व एकटेपणाची भावना सतत प्रकट होत असते. ते असो. परंतु ‘समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी’ या लेखातील त्यांची मते पटली नाहीत. प्राध्यापकवर्गाला प्रामाणिकपणे समाजसेवा करणाऱ्यांबद्दल आदर आहे.. असतो. त्यातून बाबा आमटेंच्या घराण्याला देवत्व बहाल केले गेले असेल तर त्याबद्दल कुणाला पोटदुखी का व्हावी? तरी बरं, कुंडलकर यांच्या सदरासोबतच डॉ. विकास आमटे यांचे ‘संचिताचे कवडसे’ हे सदरही प्रसिद्ध होत असते. डॉ. आमटे यांचे लेख वाचून कोणीही व्यक्ती भारावून जाईल.

हल्ली चित्रपटांशी संबंध आला की काही जणांना आपण लेखक, विचारवंत झाल्यासारखे वाटते आणि ते कुठल्याही विषयावर भाष्य करू लागतात. तथाकथित प्राध्यापक मंडळी समाजकार्यात आपला खारीचा वाटा उचलत असतातच. पण याबाबतीत आमटे कुटुंबीय वा इतरांच्या पासंगाला आपण पुरे पडू शकत नाही याची नम्र जाणीवही त्यांना असते. म्हणून ते अशांना आदरापोटी देवत्व बहाल करतात. एका परीने ते त्यांना स्फूर्ती देण्याचे काम करतात. मात्र, त्यांना एवढे नक्कीच कळते, की ज्या विषयात आपला अधिकार नाही त्यात किमान कुणावर अनाठायी टीका तरी करू नये!

– प्रा. रेखा वाटवे-पराडकर, ठाणे</strong>

भावनिक कल्लोळ समाजस्वास्थ्यासाठी हानीकारक

‘लोकरंग’मधील (२६ नोव्हेंबर) ‘मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा!’ हा अभिराम भडकमकर यांचा लेख वाचला. ‘तमाशाने कुणी बिघडत नाही किंवा कीर्तनाने कुणी सुधारत नाही हे अर्धसत्य आहे,’ असे भडकमकर यांनी म्हटले आहे. हा अनिर्बंध स्वातंत्र्याच्या पुरस्काराचा एका अर्थी प्रतिवाद आहे. एरवी संयमी असलेले लोकही वाङ्मय वाचताना असंयमी कसे होतात, हे प्लेटोने दाखविले आहे. रुसो-व्हॉल्टेअर यांच्या लिखाणामुळे जनजीवन ढवळून निघाले. इब्सेनच्या ‘नोरा’ने (‘डॉल्स हाऊस’ या नाटकातील मुख्य पात्र) जोराने दार आपटल्यामुळे संपूर्ण युरोप हादरले. ‘आनंदमठ’ इत्यादी साहित्यकृतींनी अनेकांना प्रेरणा दिली. धार्मिक किंवा विद्वेषी लिखाणामुळे दिशाभूल होऊन आणि भडकवले जाऊन संघर्ष झाले आणि होत आहेत. झाकीर नाईक किंवा ‘सनातन प्रभात’ यांच्या अभिव्यक्तीचा पुरस्कार कितपत उचित आहे?

अभिव्यक्तीचे समाजावर दीर्घकालीन आणि खोलवर परिणाम होतात. त्यामुळे रशियन लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन असोत की इंग्रजी लेखक सलमान रश्दी किंवा १९८९ साली चीनमधील तिआनमेन चौकात सरकारी दडपशाहीविरुद्ध निदर्शने करणारे चिनी नागरिक असोत; राज्यसत्तेने जोपासलेल्या मूल्यांना धोका आहे असे भासले की प्रत्येक(च) राज्यसत्ता ती अभिव्यक्ती चिरडण्याची (केविलवाणी ठरली तरीही) नेहमीच आणि यथाशक्ती धडपड करते. स्वातंत्र्याच्या किंवा नियंत्रणाच्या नावाने भावनिक कल्लोळ हे समाजस्वास्थ्यासाठी हानीकारक आहे. स्वातंत्र्य किंवा नियंत्रण हे व्यापक समाजहितासाठी कसे आवश्यक आहे, त्याची तर्कशुद्ध आणि वाजवी कारणे एवढय़ापुरतीच चर्चा मर्यादित राहायला हवी.

‘सर्वसंबंधितांची नेमकी काय भूमिका आहे याबाबत अजूनही गोंधळ कायम आहे.. आविष्कार स्वातंत्र्यवादी हुसेन यांनी विरोध होताच गाणे मागे घेणे’ अशामुळे सरकार तसेच कट्टरतावादी दबावगटांची दहशत फोफावते. ‘कलावंतांनी मोकळेपणाने व्यक्त होताना’ ती अभिव्यक्ती ‘मानवजातीच्या उत्क्रांतीसाठी’ गरजेची असणे आवश्यक आहे. ही खबरदारी घेतली तर  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कारासाठी ठाम उभे राहणे आणि त्यासाठी व्यापक पाठिंबा मिळणे सोपे होईल.

– राजीव जोशी, नेरळ

पण नाठाळ कलावंतांचे काय?

‘मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा!’ हा लेख वाचला. लेखात म्हटलेला ‘मोकळेपणा’ प्रामाणिक कलावंत व कलाकृतींसाठी ठीक आहे; पण नाठाळ कलावंतांचे काय? जाणूनबुजून समाजमन दुखवून गल्ला गोळा करणाऱ्यांचे काय? समलैंगिक स्त्रियांची नावे नेमकी सीता व राधा अशीच ठेवून समाजात कुठली ‘फायर’ लावण्याचा प्रयत्न संबंधितांकडून होत असतो? कलावंताने आपली इमानदारी पैसे-प्रसिद्धीसाठी गहाण टाकायची आणि त्याला आविष्कार स्वातंत्र्य म्हणायचे, ही फसवणूक आहे. अशा कलावंतांना महत्त्व देण्यात अर्थ नाही. त्यांनी अतिरेक केला आणि त्यांना अतिरेकी प्रत्युत्तर मिळाले तर आम्हा प्रेक्षकांना दु:ख न करण्याचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे.

– प्रशांत कुलकर्णी, कोल्हापूर</strong>

सावध ऐका पुढल्या हाका!

‘लोकरंग’मधील (३ डिसेंबर) ‘भग्नता, बंदूक, उदोउदो’ हा मिलिंद म्हैसकर यांचा लेख वाचताना सद्य:परिस्थितीचे प्रतिबिंब त्यात दिसत होतेच; मात्र हा लेख भावी काळातील भयंकरतेचे सूचनही करतो. सगळीकडे मानवी मानसिकता झपाटय़ाने बदलते आहे. स्वार्थ, आर्थिक प्रगती, चंगळवाद जोपासताना आणि परमार्थ, नीतिमूल्यं, माणुसकी हरवताना आपण काय कमावत आणि काय गमावत आहोत याचा विचार जेव्हा होईल तेव्हा पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. पण आपण वेळीच सावध झालो तर सकारात्मक विचारांनी आणि आचारणातील सुधारणांनी जग बदलू शकते. सध्या तरी विकास आणि विनाशाच्या संधिप्रकाशात जग वाटचाल करीत आहे.

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

विखुरलेपणाचा लाभ उपद्रवींना!

‘मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा!’ हा अभिराम भडकमकर यांचा लेख वाचला. त्यातून एका सर्जनशील, व्यासंगी कलावंताची तळमळ व्यक्त झाली आहेच; शिवाय सत्ताधारी वर्गाच्या निगरगट्टपणावरही नेमके बोट ठेवले गेले आहे. भरडले गेलेल्यांएवढेच या क्षेत्रातील अग्रणी विखुरलेले आहेत, एककल्ली आहेत. मग या विखुरलेपणाच्या शापाचा लाभ उठवत सारेच उपद्रवी एकेकाला खिंडीत गाठतात. बाकी सारे हताशपणे बोटे मोडत बसतात. प्रसंगी आसुरी आनंदही घेतात.

लेखात घेतला गेलेला ऐतिहासिक आढावा साऱ्याच सत्ताधाऱ्यांना एका ओळीत आणून बसवतो, हेही एका अर्थाने बरे झाले. लेखात बहुतांश विचारी वर्गाची अस्वस्थता टोकदारपणे मांडली आहे. पण यावर उपाययोजना कोण करणार? आता तरी शहाणपणाने आपसातले मतभेद विसरून

सारे संघटितपणे दबावगट निर्माण करणार का? हा दबावगटच यावर रामबाण उपाय शोधू शकेल. हिंसक कामांसाठी उपद्रवी नेतृत्व आज सर्वत्र पोसले जात आहे. परंतु रचनात्मक नेतृत्वाचे काय?

– कमलाकर सोनटक्के, मुंबई</strong>