‘अर्थशास्त्री आंबेडकर’ हा (१० एप्रिलची लोकरंग पुरवणी) गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. आंबेडकरांचे हे अनोखे रूप त्यांचे अनुयायी असलेल्या अर्थतज्ज्ञांना माहिती आहे, परंतु इतक्या नेमकेपणाने आतापर्यंत ते कोणी मांडल्याचे आठवत नाही. बाबासाहेबांचा विद्यार्थीदशेतील परखडपणा ते किती प्रज्ञावंत होते याचेच दर्शन घडवतो. अर्थविषयक प्रबंध लिहिण्याच्या काळात बाबासाहेबांची आर्थिक स्थिती ठीक नव्हती. पत्नी मुंबईत अनेक कष्टाची कामे करून उदरनिर्वाह चालवीत होती. स्वत: आंबेडकर काटकसर करून शिक्षण घेत होते. धनंजय कीरकृत आंबेडकरांच्या चरित्रात असे लिहिले आहे की, ‘‘पोटास चिमटा घेऊन ते ग्रंथ विकत घेत असत. प्रवासासाठी पैसे खर्च न करता ते मैलोन् मैल पायपीट करून ग्रंथालयातून दुर्मीळ ग्रंथ आणत. ज्या बाईंकडे ते राहत असत, त्या बाई त्यांना सकाळी न्याहारीसाठी चहा, पावाचा एक तुकडा, त्या तुकडय़ाच्या टोकाला चिंचोक्याएवढा मुरांबा एवढेच देई.’’ अशा परिस्थितीत एवढा परखडपणा- तोही आपण ज्यांच्या गुलामगिरीत आहोत त्या देशाच्या विद्यापीठात दाखविणे कोणा सामान्य व्यक्तीला शक्यच नव्हते. इंग्रजांच्या देशात जाऊन ‘सुवर्ण विनिमयाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या देशाची लूट करत आहात’ हे त्यांच्या गळी उतरवणे, हे केवळ असामान्यच
काम होय.
याशिवाय बाबासाहेबांची इतरही अनेक रूपे आहेत. त्यांनी मुंबईत शेअर बाजाराविषयी सल्ला देणारी कंपनी काढली होती. ते वकील होते. तसेच ते कामगार नेतेही होते. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून मुंबईच्या गिरणी कामगारांचे प्रश्न हाती घेतले होते. साम्यवाद्यांच्या राजकीय कारणांसाठीच्या ऊठसूठ संपालाही त्यांचा विरोध होता. अशा संपांतून कामगारच भरडला जात होता. या संपांमुळे विपन्नता येऊन कामगारांच्या अब्रूवरही घाला पडत असे. अशा एका संपाविरोधात त्यांनी रा. ब. सी. के. बोले यांच्यासह कामगार विभागात प्रचारही केला होता. परंतु त्यातून साम्यवाद्यांना समज काही आली नाही. याच ऊठसूठ संपामुळे पुढे गिरणी कामगार क्षेत्रात शिवसेनेचा पाया घातला गेला. पुढे तर संपामुळे केवळ गिरणी कामगारच नव्हे, तर संपूर्ण गिरणगावच देशोधडीला लागले.
त्यांच्या अंगी प्रज्ञेबरोबर अपार करुणाही होती. एका सभेत महिलांना संबोधित करताना ते म्हणाले होते, ‘‘केस स्वच्छ धुवत जा. नीटनेटके राहत जा. कपडे फाटके असले तरी ते स्वच्छ वापरत जा. तुम्हाला असे का वाटते, की तुमचा मुलगा चपराशी बनावा. तो कलेक्टर बनावा असे का वाटू नये?’’ असे ते आईच्या ममतेने जनतेला उपदेश करीत. स्त्रीहक्कांविषयीही ते जागरुक होते. ते मजूरमंत्री असतानाच महिलांना हक्काची बाळंतपणाची रजा त्यांनी मंजूर केली होती. जर आपल्या देशात अस्पृश्यतेसारखी हीन प्रथा नसती तर त्यांच्या विचक्षण प्रज्ञेचा व प्रतिभेचा देशाला अधिक चांगला फायदा होऊ शकला असता.
– दिनकर जाधव, मीरा रोड.

आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा यथार्थ मागोवा
‘अर्थशास्त्री आंबेडकर’ या लेखात बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांचा मागोवा घेतला गेला, हे बरे झाले. कारण केवळ बहुजन समाजच नव्हे, तर बहुतांशी भारतीय समाज त्यांच्या आर्थिक विचारांबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांना विशिष्ट साच्यात बंद केल्याबद्दलही या लेखात मत मांडले गेले आहे. आज पुरोगामी भारताचा आणि विशेषत: महाराष्ट्राचा डिंडिम वाजवताना डॉ. बाबासाहेबांसारख्या महामानवाला विशिष्ट जातीची लेबले चिकटवणे योग्य आहे काय? बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी करताना त्यांनी सांगितलेला पुरोगामी विचार सगळ्या समाजाने अवलंबायला हवा.
– गणेश तारळेकर, सातारा.

..तर अनेक फाळण्या होतील!
‘आपणास आणखी एक पाकिस्तान हवे आहे काय?’ हा रवि आमले यांचा लेख वाचला. या लेखाकडे तर्कबुद्धिनिष्ठ रॅशनॅलिझम आणि सृजनबुद्धिनिष्ठ रॅशनॅलिझम अशा दोन दृष्टिकोनांतून पाहणे आवश्यक आहे असे मला वाटते. तर्कबुद्धीच्या निकषांनुसार त्यातले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या फाळणीसंदर्भातले विचार योग्यच वाटतात. तर्कबुद्धिनिष्ठ अशा डॉ. आंबेडकरांच्या फाळणीविषयक हिंदू-मुस्लिमांच्या संदर्भातील विचारांचे विश्लेषण खूप आत्मीयतेने दत्तोपंत ठेंगडी वगैरे रा. स्व. संघातील मंडळींनीही केले आहे. त्यांच्या लेखनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘भारतमाता की जय’ किंवा ‘राष्ट्रवादा’विरुद्ध होते असे दिसून येत नाही. अर्थात् लेखकाची मते आणि संघ परिवारातील मंडळींची मते यांत फरक असू शकतो. इथे मुद्दा आहे तो निव्वळ तर्कबुद्धिनिष्ठ अशा दोन व्यक्तींत एकवाक्यता नेहमीच खूप कमी असते. उदाहरणार्थ गोपाळ कृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक.
भारताच्या फाळणीकडे पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन आहे सृजनबुद्धिनिष्ठ रॅशनॅलिझमचा. हा रॅशनॅलिझम मानतो, की तर्कबुद्धी मजबूत, पण आंधळी असते. तर सृजनबुद्धी पांगळी, परंतु अंतर्मुख-बहिर्मुख दृष्टी बाळगून असते. तर्कबुद्धी आणि सृजनबुद्धी यांची समतोल बेरीज आपल्याला सुयोग्य निर्णयापर्यंत पोहोचवते. परस्परविरोधी धारणांमधील समतोल ऐक्यऊर्जा तयार करते, हे वैश्विक सत्य याच तर्कबुद्धी आणि सृजनबुद्धीच्या समतोल ऐक्यातून तयार झाले आहे. भारतात कधीकाळी अर्धनारी नटेश्वर विचाराने हे सत्य सांगितले. चीनने त्याला ‘यिन यँग थिअरी’चे रूप दिले.
प्रत्येक कलेतून एक रसिक-संवाद साधण्याची प्रक्रिया मार्गस्थ होत असते. तिला आपण ‘कम्युनिकेशन’ म्हणतो. या प्रक्रियेला बिलगून अभिव्यक्त होण्याचीही प्रक्रिया सुरू असावी लागते. तिला आपण ‘एक्स्प्रेशन’ म्हणतो. या दोन परस्परविरोधी प्रक्रियांचे मीलन कुठल्याही कलेत चैतन्य फुलवीत असते. जिथे विविध कलांचे राष्ट्रजीवनाशी दृढ नाते जाणीवपूर्वक जोपासले जाते तिथे राष्ट्रचैतन्य निर्माण होत असते. त्यातही लोकांना आपली वाटणारी दृश्यकला आणि तिच्यातली लावण्यनीती (डिझाइन स्ट्रॅटेजी) खूप महत्त्वाची.
ज्या देशात या लावण्यनीतीविषयक चैतन्याचा अभाव निर्माण होतो, तिथे एक अनुत्पादक नकारात्मक पोकळी तयार होते. तिच्यात फक्त उपद्रवी विचारांची वादळे तेवढी तयार होतात. ती पोकळी फक्त सिंहावलोकनी पुरोगामित्वानेच नाहीशी होऊ शकते. अशा पुरोगामित्वात पोकळी पूर्ण काळातील लावण्यानीतीविषयक अभिजाततेचा वेध घेण्याची ताकद असते. ती पुन्हा लाभली की सांप्रदायिकतेला दूर ठेवून धर्म किंवा सेक्युलॅरिझम यांच्या सोबतीने विकास घडत जातो. इ. स. ५०० ते इ. स. १४०० या काळातील युरोपमधील पोकळी अशाच सिंहावलोकनी पुरोगामित्वाने संपवली.
शिवछत्रपतींचा काळ सोडला तर भारतातही विशिष्ट चैतन्यहीन पोकळी आढळून येते. योग्य वेळी डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व हिंदू समाजाला लाभले असते तर ही पोकळी लवकर भरून आली असती. पण ही झाली जर-तरची भाषा! विद्यमान परिस्थितीत जर पुन्हा एका पाकिस्ताननिर्मितीच्या शक्यता असतील, तर त्या राष्ट्रवादाच्या बुलंद आवाजामुळे नाहीत; त्या आहेत जगात संपलेल्या, परंतु भारतात शिल्लक असलेल्या मार्क्‍सवादी पुरोगामित्वामुळे. त्या पुरोगामित्वामुळेच सोव्हिएट रशियन साम्राज्याची शकले झाली. चीनने मार्क्‍सवादी मतप्रणालीचा वेळीच त्याग केला. फक्त हुकूमशाही ठेवली.
देशातले हिंदू- मुसलमान ज्या दिवशी ‘घट’ म्हणजे अनुत्पादक पोकळी नाहीसा करणारा मानवनिर्मित अवकाश हे सर्जनशील सत्य जाणतील, तेव्हाच नव्या फाळणीच्या शक्यता संपतील, हे आपण लक्षात घ्यावे. भारताची फाळणी झाली, कारण सृजनहीन पोकळी आणि राष्ट्र-अवकाशाचे भान हिंदू-मुसलमानांना आले नाही म्हणून. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फक्त एकच काय, अनेक फाळण्या होत राहतील.. भारत- पाक या दोन्ही देशांत!
– रवी परांजपे, पुणे.

पाकिस्तानची निर्मिती व बाबासाहेब आंबेडकर!
पाकिस्तानची निर्मिती होऊन आता ७० वर्षे झाली, पण अनेक भारतीयांच्या मनात तो सल अजूनही सलत आहे. पाकिस्तानच्या निर्मितीला महात्मा गांधी किंवा इतर काँग्रेस नेतृत्व जबाबदार आहे असे अजूनही मानत त्यांना दोष देणारे अनेक लोक पाहायला मिळतात. आता हिंदुराष्ट्रवादी भाजप केंद्रात सत्तेवर आला असून ‘हिंदुस्थानात राहणारे ते सर्व हिंदू’ अशी विधाने हिंदुत्ववादी मंडळींतील जबाबदार नेते मंडळी करत असतात. त्यामुळे मुस्लीम समाज स्वत:ला आपल्याच देशात असुरक्षित मानतो. त्यामुळे त्या समजाचे अशा रोज नवनवीन होणाऱ्या हिंदु- राष्ट्रवादाच्या घोषणांमुळे पाकिस्तान निर्माण होण्याच्या काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. आणखी एक पाकिस्तान हवे काय, असा धक्कादायक प्रश्न लेखकाने वाचकांना विचारला आहे.
फाळणीच्या दरम्यान बाबासाहेबांनी देशाच्या फाळणीवर जे पुस्तक लिहिले आहे, त्यात त्यांनी भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सैन्यातील मुस्लीम सैन्य वेगळे झालेले बरे, त्यामुळे लष्करात बंड होण्याची भीती टाळण्यासाठी आणि परिणामत: भारतास सुरक्षितता प्राप्त होण्यासाठी देशाच्या फाळणीला त्यांचा पाठिंबा होता, हे लेखकाने नमूद केलेले आहे. तसेच लोकांनीही काँग्रेसला ५०-६० वर्षे राज्यावर बसवून त्यांच्या कृतीला पाठिंबाच दिला होता.
हिंदुराष्ट्रवादी पक्ष केंद्रात एकहाती सत्तेवर आल्याने हिंदूप्रेमी संघटनांना हिंदू धर्माचेच राज्य आले आहे असे वाटते. त्यामुळे ‘भारत माता की जय’ म्हणा, अन्यथा पाकिस्तानात जा, अशी अविचारी विधाने जाहीरपणे ते करू लागले आहेत. यातूनच पुन्हा देशाची फाळणी होऊ शकण्याची परिस्थिती निर्माण होऊ पाहत तर नाही ना, याचा विचार होणे गरजेचे वाटते.
पण मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे- भारतातील इतक्या प्रचंड संख्येने असणाऱ्या मुस्लिमांचे करायचे काय? पाकिस्तानपेक्षाही आपल्याकडील मुस्लिमांची संख्या जास्त आहे. याचा अर्थ बहुसंख्य मुस्लिमांनी द्विराष्ट्रवादाला विरोध केल्याचे स्पष्ट होते. जरी आपण ‘पाकिस्तानात जा’ असे म्हटले तरी पाकिस्तानने त्यांचा स्वीकार करायला नको काय? त्यांना मुस्लिमांबद्दल प्रेम आहे असे नसून त्यांना बांगलादेश निर्मितीचे उट्टे काढायचे आहेत. त्यासाठी ते भारत तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक राजकारणात मुस्लीम देशांचे असलेले वर्चस्व व आपल्या देशाचे मुस्लीम देशांवर असलेले अवलंबित्व यामुळे भारतातील मुस्लिमांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही. तसेच दुय्यम नागरिकत्वही देऊ शकत नाही. पाकिस्तान किंवा बांगलादेश त्यांचा स्वीकार करायला तयार नाही. तसेच त्यांना समुद्रातही लोटून देता येणार नाही. मग दुसऱ्यांदा देशाची फाळणी हाच धोकादायक पर्याय म्हणून शिल्लक राहतो. त्यामुळे पुन्हा दंगे, स्थलांतरे व निष्पाप लोकांच्या कत्तली हे दु:स्वप्न अनुभवावे लागणार काय?
त्यावेळी बॅ. जिनांची मुस्लीम लीग देशाच्या फाळणीला कारणीभूत झाली. आता तेच पाप हिंदू संघटनांच्या हातून होणार काय, अशी भीती वाटू लागली आहे. रामजन्मभूमीच्या आंदोलनापासून मुस्लीम समाजाचे ध्रुवीकरण सुरू झाले व आज ते दुसऱ्या फाळणीच्या स्तरावर घेऊन जाणार की काय, अशी भीती खऱ्या राष्ट्रप्रेमींना वाटते आहे.
 प्रसाद भावे, सातारा.