‘लोकरंग’ (१७ एप्रिल) मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल का?’ या मंगला आठलेकर यांच्या लेखाला वाचकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या लेखावरील काही निवडक प्रतिक्रिया.

तर्कशुद्ध मांडणी
डॉ. मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल का?’ हा स्त्रियांच्या मंदिरप्रवेशावरचा लेख वाचला. लेख फार आवडला. खरे तर माझेच विचार इतक्या सुरेख रीतीने, सुसंबद्ध व तर्कशुद्ध मांडणी करत त्यात मांडले आहेत असे वाटले. खासकरून स्त्रियांना कोणत्या समाजसुधारणा व धर्मसुधारणा हव्या आहेत किंवा हव्या असाव्यात, हे या लेखात स्पष्ट झाले आहे.
– मंगला नारळीकर, पुणे

परखड लेख
हा नितांतसुंदर असा लेख वाचनात आला. लेख अतिशय आटोपशीर असूनही विस्तृत असा साधला आहे. नेमक्या शब्दांचा वापर केल्यामुळे आटोपशीर व विषयाशी संबंधित प्रत्येक मुद्याची चर्चा लेखात झाली आहे. फुले-आगरकर-आंबेडकर आदी समाजसुधारकांनी नाकारलेला देव स्वत:ला पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी भजावा, ही फार मोठी विसंगती आहे. लेखिकेने याच विसंगतीवर नेमके बोट ठेवले
आहे. ‘नुकतंच कुठे उजाडत असताना परत अंधाराकडे चाललेला हा प्रवास आहे.’ हे वाक्य अतिशय बोलके आहे.
मला वाटते, या विसंगतीचे मूळ देवसंकल्पनेशी जोडल्या गेलेल्या उदात्ततेच्या गृहीतकात आहे. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ ते ते सर्व ईश्वरस्वरूप आहे ही भावना भल्याभल्यांच्या मनातून जात नाही. एकदोन उदाहरणांनी हा मुद्दा स्पष्ट करता येईल. ‘मातृदेवो भव’ या वचनात आधी देवाची उदात्तता गृहीत आहे आणि नंतर आईला त्याच्या बरोबरीचे स्थान दिले गेले आहे. मला वाटते, यात मातेचा अपमान आहे. आईला आईच राहू दिले तर काय बिघडते? ‘संकटात मित्र देवासारखा धावला’ या विधानात मित्राला देवाच्या दावणीला का जोडावे लागावे? मित्र ‘मित्रा’सारखाच का धावू नये? देव ही कुणी अद्भूत व उदात्त शक्ती आहे ही धारणा जर समाजमनातून हद्दपार झाली तर लेखिकेने संभावना केल्याप्रमाणे स्त्री-पुरुष समानता साधण्यासाठी चौथराप्रवेशासारख्या तद्दन फालतू चळवळींची आवश्यता उरणार नाही व त्यामुळे इतर विधायक कार्याकडे समाजाची शक्ती वळविता येईल.
– भालचंद्र काळीकर

अंजन घालणारा लेख
या लेखाद्वारे पुरोगामित्वाच्या नावाखाली समानतेच्या हक्कासाठी निर्थक कर्मकांडांची धार्मिक ठिकाणे निवडून आपली शक्ती व वेळ व्यर्थ घालविणाऱ्या प्रसिद्धीप्रेमी स्त्रियांवर, तसेच टीआरपी मिळविण्याकरिता दिवसभर असे प्रसंग वारंवार दाखवून चर्वितचर्वण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर आपल्या प्रभावी शब्दशैलीने पद्धतशीररीत्या कोरडे ओढून, संबंधितांना जो आपण शहाणपणा शिकविला आहे तो खरोखरच स्तुत्य आणि वाखणण्याजोगा आहे.
प्रतिकूल परिस्थितीत परिणामांची पर्वा न करता, कसल्याही प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता, सनातनवादी व पुरातन प्रथा परंपरांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या खऱ्याखुऱ्या पुरोगामी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार्याची व शिकवणुकीची या तथाकथित पुरोगामी मंडळीना आपण यानिमित्ताने आठवण करून देऊन त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे.
मेघश्याम राऊळ, वसई.

हा तर शुद्ध दुटप्पीपणा!
शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर वगैरेबद्दलच्या बातम्या वाचून माझ्या मनात जे विचार येत होते तेच विचार लेखिकेने या लेखात नेमक्या शब्दांत मांडले आहेत. माझ्या आजूबाजूच्या अनेक स्त्रियांना मी हेच विचार सांगत होते. पण एकीलाही ते पटले नाहीत. सगळ्या जणी या फालतू प्रकारच्या विजयामुळे हुरळून गेलेल्या आढळल्या. हे बघून माझ्याच विचारात काहीतरी चूक आहे की काय, असे मला वाटायला लागले होते. परंतु या लेखामुळे मला माझे विचार बरोबर असल्याचा पुरावा मिळाला.
जे जे काही पुरुष करतात ते करण्याचा अट्टहास म्हणजे अजाणतेपणी पुरुषांचे वर्चस्व मान्य करण्यासारखेच आहे, हा लेखातील विचार मला नेहमीच पटतो. स्त्रियांना, त्यांच्या ठायी जन्मजात असलेल्या अनेक गुणांचा अभिमान असलेला मला तरी आढळून आला नाही. जर स्वत:लाच स्वत:चा अभिमान नसला तर लोकांना तो का आणि कसा वाटणार?
दुसरे असे, की स्त्रियांना जर समानतेचे इतके अप्रूप आहे तर याच स्त्रिया स्त्री-आरक्षणाचा पुरस्कार का करतात? काही क्षेत्रात समानता हवी, जे काही पुरुषांना मिळते ते आम्हाला हवे असे म्हणायचे आणि दुसरीकडे आम्ही दुर्बल असल्यामुळे आम्हाला आरक्षण हवे म्हणायचे हा तर शुद्ध दुटप्पीपणा आणि स्वार्थीपणा झाला. मी सक्षम आहे आणि घराचा संपूर्ण आर्थिक भार पेलायला समर्थ आहे, मला पूर्ण वेळ घर सांभाळणारी पत्नी किंवा साधीशी नोकरी करून घराला थोडासा हातभार लावणारी पत्नी चालेल असे अनेक पुरुष म्हणतात. मग समानतेच्या या जमान्यात मी घराचा पूर्ण आर्थिक भार पेलेन; मला साधी नोकरी करून घरकाम सांभाळणारा नवरा चालेल, असे म्हणणाऱ्या कितीशा मुली आहेत? जेव्हा त्या लग्नाला उभ्या राहतात, तेव्हा त्यांना स्वत:पेक्षा कमी शिकलेला, कमी पगार मिळवणारा, बुटका किंवा कुठल्याच बाबतीत स्वत:पेक्षा डावा नवरा नको असतो. अनेक नवऱ्यांना काही झाले तरी रोजच्या रोज तीच ती कंटाळवाणी नोकरी चालू ठेवण्यावाचून पर्याय नसतो. पण अनेक (मध्य आणि उच्च मध्यम वर्गीय) स्त्रियांना आर्थिक भार त्यांच्यावर न पडल्यामुळे आवडीप्रमाणे स्वत:ला पाहिजे त्या प्रकारचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य असते. ही असमानता नव्हे काय?
मुळात असमानता ही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात आहेच. मात्र थोडा तरतमभाव वापरून कुठल्या असमानतेमुळे खरोखरच जीवन बिकट बनले आहे याचा थोडासा विचार करावा लागेल. लेखात म्हटल्याप्रमाणे, ज्या असमानतेमुळे माझ्या जीवनात काडीचा फरक पडत नाही त्या असमानतेविरुद्ध लढण्यात आपण आपली शक्ती का वाया घालवावी? अरब देशात असलेल्या असमानतेमुळे खरोखर स्त्रियांचे रोजचे जीवन कठीण बनले आहे. ही किंवा इतर तत्सम असमानता खूप मोठी आंदोलने करून नाहीशीच करायला हवी. खरे तर अनेक देवळांमध्ये गर्भगृहात प्रवेश नाकारल्यामुळे स्त्रियांची गर्भगृहातील पूजाअर्चेपासून सुटका झाली आहे असे समजून त्याबद्दल आनंद मानायला हवा.
गिरिजा बोरकर , अमेरिका.

पुरुषवर्गासाठीही मार्गदर्शक
या लेखात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांची वास्तविकतेला धरून केलेली अतिशय व्यावहारिक मांडणी व परामर्श खरोखरच शब्दातीत आहे. या लेखात मांडलेली मते स्त्री-पुरुष, जात, धर्म या सगळ्यांपेक्षा स्त्री-उन्नती, धर्मसुधारणा इत्यादी विचारांनी भारावलेली आहेत, हे स्वच्छ कळते आहे. लेखातील मते केवळ समस्त स्त्रीवर्गासाठीच नव्हे, तर समस्त पुरुषवर्गालादेखील आपल्या चुका सुधारून स्वत:च्या, धर्माच्या नि एकूण समाजाच्या उन्नतीसाठी मार्गदर्शक आहेत.
श्रीधर जाखलेकर, पुणे.

अंधश्रद्धा वाढवणारे उद्योग
हा लेख मनाला अगदी पटला. आता शनीच्या चौथऱ्यावर जाणं हा बायकांचा प्राधान्यक्रम असणार आहे का? ग्रामीण तसेच शहरी स्त्रियांचेही अनेक प्रश्न असताना हा अव्यापारेषु व्यापार कशासाठी? त्यामुळे नक्की काय फरक पडणार आहे त्यांच्या आयुष्यात? सुशिक्षित महिला हे अंधश्रद्धा वाढवणारे उद्योग करून नक्की काय साधू पहात आहेत? आणि त्या तिथून निघून गेल्यावर सगळं पूर्वपदावर येणार नाही कशावरून? की येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवणं हाच मूळ उद्देश आहे? अंधश्रद्धा हटवण्याला जास्त कष्ट पडतात त्यापेक्षा ती पसरवणं सोपं असतं. फालतू आंदोलनं करण्याचा अधिकार या तथाकथित पुरोगामी बायकांना कोणी दिला?
– नंदिनी बसोले

अनिष्ट रूढींमध्ये ‘समानता’ नको
या लेखातील मुद्दे पटले. विद्या बाळ यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यावर मलाही आश्चर्य वाटले. आधीच गढुळलेल्या सामाजिक वातावरणात अनिष्ट रूढींसाठी समानतेची ‘लढाई’ लढण्याने काय साध्य झाले? ही केवळ तत्त्वाची लढाई नव्हती.
विशाखा पाटील

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…

loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?