२२ मेच्या पुरवणीत मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्ताने लिहिलेले श्याम मनोहर आणि प्रा. राजेश्वरी देशपांडे यांचे लेख वाचले. श्याम मनोहरांचा लेख सबगोलंकारी वाटला, तर प्रा. देशपांडे यांचा लेख उत्तम असला तरी त्यात निव्वळ सैद्धान्तिक मांडणी तेवढी दिसली. खरे तर यानिमित्ताने मोदी राजवटीचा रोखठोक पंचनामा करणारा लेख अपेक्षित होता.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी कॉंग्रेसच्या भ्रष्ट व निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढत सत्तारोहण केले. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांची उधळण प्रचार आणि मीडिया प्रसिद्धीवर केली गेली. कॉंग्रेस त्यावेळी सत्तेत असूनही त्यांनी मीडिया प्रसिद्धीवर एवढा पैसा खर्च केला नव्हता. देशातील सर्व वर्तमानपत्रांतून मोदींच्या पान-पानभर जाहिराती तसेच वाहिन्यांवरही आक्रमक प्रचार केला गेला. एवढा पैसा त्यांनी कोठून आणला, असा प्रश्न सर्वसामान्यांनाही तेव्हा पडला होता. सत्तेवर आल्यावर तर काय विचारूच नका. जनतेचे शेकडो कोटी रुपये सध्या मोदींच्या रोज होणाऱ्या जाहिरातबाजीवर खर्च होत आहेत. प्रत्यक्षात त्या प्रमाणात त्यांनी काही कर्तृत्व करून दाखविले आहे का, हा मात्र कळीचा मुद्दा आहे.
आज ‘अच्छे दिन’ आल्याचे जे डांगोरे पिटले जात आहेत त्यात प्रत्यक्ष मोदींचा वाटा किती? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव प्रचंड घसरल्याने देशाचे परकीय चलन प्रचंड प्रमाणात वाचले आहे. यात मोदींचे कर्तृत्व ते काय? हे जर मनमोहनसिंग यांच्या कार्यकालात घडते तर असेच ‘अच्छे दिन’ त्यांच्याही काळात अनुभवास आले असते. कॉंग्रेसची राजवट भ्रष्ट होती. मान्य! परंतु त्यात त्यांच्या मित्रपक्षांनी केलेले घोटाळेही त्यांना भोवले, हेही तितकेच खरे. पण आज भाजप सरकारमधील अनेकांवर भ्रष्ट आचार तसेच समाजात धार्मिक उन्माद निर्माण करण्याचे आरोप होऊनही मोदींनी त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. सतत नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या मोदींकडून जनतेने एवढी साधी अपेक्षा करणेही गैर आहे काय?
दुसरी गोष्ट : मोदी जे म्हणतात की, कॉंग्रेसने त्यांच्या ६० वर्षांच्या राजवटीत काहीच केलेले नाही; तर मग आज देशाची जी काही (प्रचंड भ्रष्टाचार जमेस धरूनही) प्रगती झालेली आहे, ती काय आकाशातून टपकली? त्यात कॉंग्रेसचा काहीच वाटा नाही? तसं असतं तर देश १९४७ साली जिथे होता तिथेच आजही असायला हवा होता!
गेल्या दोन वर्षांत मोदींनी दररोज घोषित केलेल्या नवनव्या योजनांपैकी किती योजनांचा जनतेला प्रत्यक्षात लाभ झाला आहे याचा हिशेब कोणमांडणार? ‘जन-धन’सारख्या योजना बॅंकांच्या माथी मारून बॅंकांना ही खाती चालू ठेवण्याकरता येणारा प्रचंड खर्च कोण सोसणार? त्या ओझ्याने एक दिवस बॅंका बुडाल्या तर त्याला जबाबदार कोण? आणखी एक : विजय मल्ल्यासारखी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणारी व्यक्ती सरकारच्या डोळ्यांत धूळ फेकून परदेशी पळून गेली, यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. सरकारने अशा करबुडव्या व्यक्तीला मुळात देश सोडूच कसा दिला? याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरते आहे खास.
आपली प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी उठसूठ परदेश दौरे करणाऱ्या मोदींना देशातील दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी मात्र वेळ नाही. या दौऱ्यांनी नेमके काय साध्य केले याचाही कधीतरी लेखाजोखा मांडला जायला हवा. रिझव्‍‌र्ह बॅंकेचे गव्हर्नर राजन यांनी देशाच्या सद्य:परिस्थितीबद्दल वस्तुस्थितीवर आधारित मतं व्यक्त केली की मोदी समर्थकांच्या नाकाला मिरच्या तेवढय़ा झोंबतात.
मीडियानेही मोदीभ्रमातून बाहेर पडून जनतेपुढे देशातील घटना-घडामोडींसंबंधात वस्तुस्थिती मांडायला हवी. अन्यथा बघेल बघेल आणि जनताच २०१९ च्या निवडणुकीत मोदींना धडा शिकवेल.
– विश्वास पूर्णपात्रे