22 November 2017

News Flash

कुंडलकरांचे स्त्री-चळवळीचे आकलन तोकडे..

१३ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मधील सचिन कुंडलकर यांचा ‘काहीही न करणारी मुलगी’ हा लेख वाचला.

सरिता आवाड | Updated: August 27, 2017 3:37 AM

१३ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मधील सचिन कुंडलकर यांचा ‘काहीही न करणारी मुलगी’ हा लेख वाचला.

१३ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मधील सचिन कुंडलकर यांचा ‘काहीही न करणारी मुलगी’ हा लेख वाचला. मनापासून जे करावेसे वाटते तेच करावे, काही काळ काही करू नये असे वाटले तर स्वस्थ बसण्यात काही गर नाही, असा आशय लेखात व्यक्त झाला आहे. हा मुद्दा पटण्यासारखाच आहे. पण हे स्त्रियांना तसेच पुरुषांनाही लागू आहे. प्रत्यक्षात लिखाणात मात्र स्त्रीवर्गावर आडून आडून शरसंधान केले गेले आहे.

रिकामेपण निवडणे चांगले. पण या रिकामपणाच्या आगेमागे कार्यमग्नता असेल तरच त्या रिकामपणाला अर्थ येतो. शेवटी दिलेल्या उदाहरणातही हुशार मत्रीण रिकामेपणाचा समारोप ‘वारी’ नावाचा कॅफे काढून करते. झेन तत्त्वज्ञानातला एक पदर प्रत्यक्षात आणते. याचा अर्थ रिकामपणातही तिचे चिंतन चालू होते. अत्रे यांनी गडकऱ्यांविषयीची आठवण लिहिताना म्हटलेले आहे, की मी जेव्हा स्वस्थ बसलेला दिसतो तेव्हाच कामात असतो, असे ते म्हणत.

हे सर्व लिहिताना लेखकाने स्त्रियांच्या चळवळीवर शेरेबाजी करण्याचे काहीच कारण नव्हते. आपण स्वस्थ बसलो नाही हे सांगणे महाराष्ट्रातल्या स्त्रीवादामुळे आहे, असा षटकार त्यांनी ठोकून दिला आहे. पण पुरेशा माहितीच्या अभावी चेंडू सीमारेषेच्या आत तर पडलाच; शिवाय अगदी सोपा झेलही त्यांनी दिला आहे. अजूनही बहुसंख्य स्त्रिया घरात काम करत असूनही आम्ही काहीच करत नाही, असे म्हणतात. या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्याचे मोठेच आव्हान चळवळीसमोर आजही आहे. चळवळ अद्यापि कालबा झालेली नसून तिच्यासमोरची आव्हाने अजून कायम आहेत. पुरुषांचे फाजील लाड करणाऱ्या बायका लेखकाला खुपतात. पण हे लाड का होतात? ही मानसिकता का तयार होते? हे प्रश्न त्याला का पडत नाहीत? फेमिनिझमची सांगड धुसफूस करत जगण्याशी घालण्याची फॅशन जगभरच्या पुरुषांमध्ये आहे. त्यातही बंगाल आणि महाराष्ट्रातल्या स्त्रियांवर प्रतिभावान असण्याची सक्ती असते असे म्हटले आहे. एक तर या दोन राज्यांना समाजसुधारकांचा मोठा इतिहास आहे. ही शेरेबाजी ऐकून बिचारे सुधारक ‘हेच काय फळ मम तपाला?’ असेच म्हणाले असते.

यानिमित्ताने उच्चभ्रू समाजातल्या पुरुषांचे स्त्रियांच्या चळवळीबद्दलचे आकलन समजले आणि माझ्यासारख्या चळवळीशी संबंधित स्त्रीला अजून खूप काम करणे बाकी आहे याची प्रकर्षांने जाणीव झाली.

– सरिता आवाड

मराठीतून व्यवहार व्हावेत

१३ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मधील ‘पैशाची भाषा..’ हा राजीव काळे यांचा लेख वाचला. भाषातज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे खरोखरच काही भाषा नामशेष होणार, ही वस्तुस्थिती आहे. त्यात मराठी भाषा नामशेष होणार नाही, हे मान्य केले तरी शुद्धलेखन, व्याकरण, शब्द, वाक्यरचना आदींचा काथ्याकूट करण्यापेक्षा सध्याच्या समाजमाध्यमांच्या युगात इतर भाषांतील प्रचलित शब्द घेऊन प्रथम मराठी भाषा टिकविण्यास अग्रस्थान द्यायला हवे. निदान आर्थिक व्यवहार देवनागरी मराठीत करावयास हवेत. म्हणजे मग आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्व वित्तसंस्था आपोआप त्या भाषेचा व लिपीचा मान राखतात. त्यांना आकर्षित करण्याकरिता निरनिराळ्या उपाययोजना करतात. त्याकरिता मराठी भाषाभिमानी जनतेने प्रथम बँक धनादेश, व्यवहार, विमा कंपन्या, शेअर, पोस्ट, म्युच्युअल फंड, गुंतवणुकीचे व्यवहार, रेल्वेपास, सरकारी- निमसरकारी- खाजगी करारनामे, कागदपत्रे, पारपत्र आदींवर मराठी-देवनागरीमध्ये सह्य कराव्यात. इमारती संकुलांत राहणाऱ्या मराठी माणसांनी संकुलप्रवेशद्वार, तसेच घराच्या दारावरील पाटीवर मराठीमध्ये नाव लिहावयास हवे. बँका, कंपन्या, सरकारी, निमसरकारी आस्थापनांमध्ये, कार्यालयांमध्ये, इमारतींच्या प्रवेशद्वारावरील नोंदवहीत नाव, वेळ, भ्रमणध्वनी क्रमांक यांची नोंद मराठीतच करावी. रेल्वे-बसप्रवासात, मॉल, दुकानांत, एवढेच नव्हे तर फेरीवाल्यांकडे खरेदी करतानाही मराठीतच बोलावयास हवे. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांशी मराठीतूनच बोलण्याचा आग्रह धरावयास हवा. त्यामुळे परप्रांतीय लोकही मराठीत बोलण्यास प्रवृत्त होतील. जास्तीत जास्त ठिकाणी मराठीत बोलणे, व्यवहार करणे आवश्यक आहे. मराठीचा न्यूनगंड झुगारून दिला पाहिजे.

१९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर मराठी ही राज्याची भाषा करण्याविषयी १९६४ मध्ये कायदा करण्यात आला. त्याचप्रमाणे न्यायालयाची भाषा ठरविताना २१ जुलै १९९८ रोजी अधिसूचना काढण्यात येऊन जिल्हास्तरावर मराठी भाषा ही न्यायालयीन कामकाजाची भाषा असल्याचे जाहीर केले गेले आहे. तेव्हा मराठीला सन्मानाने टिकवण्याकरिता जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार त्यातूनच करायला हवेत. रंगनाथ पठारे समितीने मराठी भाषेचे अभिजातपण सिद्ध करणारा अहवाल जुलै २०१३ मध्ये केंद्र सरकारला सादर केलेला आहे. मात्र, मराठी अस्मितावाले राज्यात (व केंद्रातही) सत्तास्थानी असूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अद्याप मिळालेला नाही, ही मोठीच खंत आहे. तूर्त मराठीतून अधिकाधिक व्यवहार करणे, हेच आपल्या हाती आहे.

– विजय ना. कदम, मुंबई

जेता कोणावर राज्य करेल?

६ ऑगस्टच्या ‘लोकरंग’ अंकातील संकल्प गुर्जर यांचा ‘दक्षिण आशियाचे अस्वस्थ वर्तमान!’ आणि सोबत सचिन दिवाण यांचा ‘भारत युद्धसज्ज आहे?’ हे दोन्ही लेख अस्वस्थ करणारे होते. गुर्जर यांच्या लेखातून भारत चहूबाजूंनी आपले वर्चस्व सिद्ध करू पाहणाऱ्या चीनने वेढला गेला असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र दिसते. तर दिवाण यांच्या लेखात भारताची संरक्षणसज्जता इतकी लाजिरवाणी झाली आहे, हे वाचून ‘ मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी अवस्था झाली आहे. खरे तर एकविसाव्या शतकात पारंपरिक पद्धतीने युद्ध होणे जवळपास अशक्यच वाटते आणि अणुयुद्ध करणेसुद्धा कुठल्याच देशाला परवडणारे नाही. कारण अणुयुद्धात भकास, उजाड झालेला देश जिंकून तुम्ही काय करणार? त्यामुळे सध्या चीन केवळ धमक्याच देतो आहे असेच वाटते. चीनने भारतावर आक्रमण केले तर अमेरिका स्वस्थ बसणार नाही. मग जे युद्ध होईल ते जगातले शेवटचे युद्ध असेल. सारे जग बेचिराख झालेले असेल. मग जेता कोणावर राज्य करेल? आशा करू या, आज ना उद्या चीन व अमेरिका संभाव्य युद्धाचे परिणाम जाणतील. राहता राहिला पाकिस्तान. तेथे लोकशाही असो वा लष्करशाही- त्यांना काश्मीर प्रश्न धगधगता ठेवण्यात मतलब आहे.

– प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, मुंबई

..तरच नव्या पायवाटा होतील

सचिन कुंडलकर यांच्या ‘करंट’ या सदरातील ‘काहीही न करणारी मुलगी!’ हा लेख वाचताना नेहमीच्याच चाकोरीबद्ध जगण्यात थोडासा सुखद दिलासा मिळाला. प्रत्येकाला आपल्या आवडीचे काम किंवा जीवनशैली मिळणे हे सद्य:परिस्थितीत व पूर्वीही कठीणच होते. ठरावीक साचाच्या जीवनपद्धतीत मिळालेल्या गोष्टींत समाधान मानणे ही वृत्ती सर्वत्रच दिसते आणि त्याला कोणाचाच इलाज नाही. फार थोडय़ा व्यक्तींना मनाप्रमाणे जगण्याचे, आवडीचे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळते. बाकीच्यांना प्रपंच करताना थोडेफार छंद जोपासण्याचा आनंद मर्यादित स्वरूपात मिळतो. त्याचा अतिरेक होऊ लागला की टीकाटिप्पणी सुरू होते. त्यातून अलीकडे तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा, ताणतणाव वाढत असताना वेगळे विचारही करण्याची शक्यता धूसर होत आहे. तरीही वेगळ्या वाटा शोधणाऱ्यांना, त्यावरून चालणाऱ्यांच्या जिद्दीला सलाम! त्यांच्या प्रवासाच्या कथा वाचूनही अनेकांना प्रेरणा मिळू शकते. आणि नेहमीच्या वाटा टाळून नवीन पायवाटा निर्माण होऊ शकतात.

-प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

गोकर्ण वृक्षही!

‘लोकरंग’मधील (३० जुलै) भरत गोडांबे यांच्या ‘गोकर्ण’ या लेखातून गोकर्ण वेलीबद्दल छान माहिती मिळाली. गोकर्ण वृक्षही असतो, हे मात्र अनेकांना माहीत नसते. गोकर्ण वृक्ष मध्यम आकाराचा असून त्याला हाताच्या तळव्यापेक्षा जरा छोटी फुले झुपक्यात लगडतात. फुलांचा रंग गुलाबी जांभळट असतो. या वृक्षाला शेंगा क्वचितच धरतात. त्यामुळे अभिवृद्धी गुटी कलमानेच करावी लागते. फुले पावसाळ्यातच लागतात. त्याचे शास्त्रीय नाव आहे-  Clitoria arborea. पनवेलमधील एका नर्सरीत मी तो मोठय़ा कष्टाने मिळवून लावला होता. त्याचे रोप मी पुण्यातील उंड्रीजवळील पुण्यधाम आश्रमात लावले आहे. या वृक्षाचे जन्मस्थान दक्षिण अमेरिका आहे.

– नंदन कलबाग (उद्यानतज्ज्ञ), पुणे .

जादूई दुनियेची सफर

‘स्वरभावयात्रा’ हे विनायक जोशी यांचे सदर नित्य वाचनात येते. जुन्या मराठी भावगीतांचा त्यांचा व्यासंग आणि अभ्यास उल्लेखनीय आहे. ते गीतातील वैशिष्टय़े आणि खुबी आपल्या रसाळ भाषेत उलगडून सांगतात आणि आमच्यासारख्या रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. मराठी भावगीतांना एक समृद्ध परंपरा आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात समाजमाध्यमांतून कधी कधी चांगल्या चाली ऐकायला मिळतात. कोणतेही गाणे लोकप्रिय होण्यासाठी त्यातले शब्द आणि भावना व्यक्त करण्याची क्षमता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. चांगले शब्द, चांगले संगीत आणि चांगले सादरीकरण यांचा एकत्रित परिणाम म्हणजे अभिजात कलाकृती. आणि साधारणपणे १९५० ते १९८० या काळात असंख्य कवी, संगीतकार आणि गायकांनी भावगीतांद्वारे मराठी मनावर जादू केली. अशा या जादूई दुनियेची सफर जोशी यांच्या या सदरामुळे घडत आहे. ‘मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार’ यासारख्या गीताचे संदर्भ आमच्या मनात इतकी वर्षे वेगळेच होते. पण जोशी यांनी त्या गीताच्या अंतऱ्यात असलेले सोंगटय़ांच्या खेळाचे संदर्भ वाचून त्या गीताच्या आस्वादाला एक नवे परिमाण मिळाले. कवी बी यांच्या ‘चाफा बोलेना’ या गीताबद्दलही हेच म्हणता येईल. आजच्या पिढीला फारसे परिचित नसलेले जे. एल. रानडे, वाटवे, नावडीकर, मोहनतारा अजिंक्य, सुमतीबाई टिकेकर वगरे गायकांवर लिहिलेल्या लेखांमुळे हे लेखन एक ऐतिहासिक दस्तावेज झालेले आहेत.

किशोर दीक्षित, मुंबई

First Published on August 27, 2017 3:37 am

Web Title: readers reaction on lokrang articles 4