22 February 2019

News Flash

‘इंडिया’-‘भारता’तील सापेक्षतावाद

निमशहरी भागांत वा गावाकडे राहणारे अनेक सुखवस्तू नागरिकही स्वत:ची ‘भारता’त गणना करतात

 

२४ डिसेंबरच्या पुरवणीतील ‘उपराष्ट्रवादाचे उपाख्यान’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांचे स्वरूप आणि त्याचे निवडणुकीवरील परिणाम लक्षात येण्याकरिता त्याचे आणखी काही कंगोरे आणि त्यातील सापेक्षता समजून घेतली पाहिजे. केवळ शहरात राहतो म्हणून कोणी आपोआपच ‘इंडिया’वासी होत नाही, आणि खेडय़ात राहणारे सगळेच ‘भारत’वासीही नसतात. निमशहरी भागांत वा गावाकडे राहणारे अनेक सुखवस्तू नागरिकही स्वत:ची ‘भारता’त गणना करतात आणि त्यांच्या मनीच्या ‘इंडिया’मध्ये जाण्याची त्यांची इच्छा असते. (कधी कधी ‘त्यांच्या मनीचा इंडिया’ म्हणजे चक्क परदेशही असतो!) राजकीय पक्ष या सगळ्याचा अचूक फायदा उठवत असतात. सत्ताधारी पक्ष अनेकांना आपण ‘भारता’तून ‘इंडिया’त गेलो असे पटवून देऊन ‘फील गुड’ वातावरण निर्माण करू पाहतो, तर विरोधी पक्ष ‘भारता’त राहणाऱ्यांना त्यांच्या ‘भारतीयत्वा’ची (!) सतत जाणीव करून देत असतात. स्वत:ला ‘भारता’चे प्रतिनिधी म्हणविणाऱ्यांची व्यक्तिगत आयुष्यातील जीवनशैली पूर्णपणे ‘इंडियन’ असते. किंबहुना, ‘भारता’चे नाव घेत असे ‘इंडियन’च देशावर राज्य करतात. स्वत:ला ‘भारतीयां’चा म्हणविणारा पक्ष भारतीयांची संख्याच कशी जास्त राहील हेच पाहणार, हे आता मतदार ओळखू लागले आहेत. स्वत:ला ‘इंडिया’चा म्हणविणारा पक्ष (स्वत:च्या विस्ताराकरता) जास्तीत जास्त ‘भारतीयां’ना ‘इंडियन’ बनवू पाहील असा आशावाद त्यांच्या मनात असतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात आपापला ‘इंडिया’ गाठायची असलेली आस अशा पक्षांच्या नेमकी पथ्यावर पडताना दिसते. आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताइतकीच गुंतागुंत आपल्या देशात (म्हणजे ‘भारत’ आणि ‘इंडिया’मध्ये) यासंदर्भात बघायला मिळते!

प्रसाद दीक्षित, ठाणे

भाजपसमोरील आव्हाने

‘उपराष्ट्रवादाचे उपाख्यान’ हा लेख वाचला. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मी सौराष्ट्र, कच्छ तसेच दक्षिण गुजरातमधील सुरत या ठिकाणी निवडणूक अभ्यास दौरा केला होता. त्यामुळे या लेखातील ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या द्वंद्वाधारे दाखविलेल्या वास्तवाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. गुजरातमधील पाटीदार समाजात, विशेषत: ग्रामीण भागात या निवडणुकीच्या संदर्भात धार्मिक अस्मितेची जागा जातीय अस्मितेने घेतली होती. त्यात राहुल गांधी यांनी भाजपला अनपेक्षित अशी धार्मिक जाणीव/ओळख सार्वजनिकरीत्या प्रकट करण्याची रणनीती वापरल्यामुळे भाजपचे ध्रुवीकरणाचे अस्त्र बोथट झाले. राजकोटमधील नरेंद्र मोदी यांच्या सभास्थानाच्या बाहेर ‘ा१ ेी १ी’्रॠ्रल्ल ेींल्ल२ ल्लं३्रल्ल ऋ्र१२३’ असे वाक्य असणारे बरेच फलक लावलेले होते. म्हणजेच भाजप इतका बॅकफुटवर गेला की त्यांना ‘ऱ्हेटोरिक’ बदलावे लागले. आणि अर्थात शहरांमध्ये भाजपला त्याचा लाभही झाला. नेमक्या याच रणनीतीमुळे ‘काँग्रेसला अहमद पटेल यांना मुख्यमंत्री करायचे आहे..’ असा अपप्रचार भाजपने शेवटच्या टप्प्यात केला. या रणनीतीचा एक भाग म्हणून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही मोदींना खोटेनाटे आरोप करावे लागले. माझ्या मते, काँग्रेसचे हे नवीन धर्मधोरण भाजपला आव्हान देणारे ठरेल.

दुसरे आवर्जून नमूद करावे असे निरीक्षण म्हणजे तरुणांचा रोष. गुजरातमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागांतही तिशीच्या आतील युवक भाजपला विरोध करताना दिसले. हितसंबंध गुंतलेल्या जुन्या पिढीपेक्षा हा तरुणवर्ग आक्रमकपणे प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करण्याच्या मानसिकतेत आढळतो. जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल ही त्याची ठळक उदाहरणे. याच तरुणवर्गाला मोदी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भुरळ पाडण्यात यशस्वी ठरले होते. आता मात्र या वर्गाचा वाढत जाणारा रोष हेही भाजपसमोरील आव्हान असेल.

भाऊसाहेब आजबे, पुणे

गुजरात कवित्वातले अनुत्तरित प्रश्न

‘उपराष्ट्रवादाचे उपाख्यान’ हा लेख ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ अशी जनतेच्या प्रश्नांची गुजरात निवडणुकीच्या निकालांतून स्पष्ट झालेली दरी उघड करतो. या लेखामुळेच आणखीही काही प्रश्न मनात येतात, ज्यांचा उल्लेख या लेखात नाही. त्यामुळे ते प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

१. शेतमालाचे पडलेले भाव, त्यामुळे वाढलेली बेकारी आणि पीक विमा संरक्षण न मिळाल्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे हाल हे मुद्दे लेखात अधोरेखित झाले आहेत. हे प्रश्न शहरांत नसल्यामुळे गावाकडच्या आणि शहरवासीयांच्या मतदानात ‘भाजपच्या विरुद्ध’ आणि ‘भाजपच्या बाजूने’ अशी मतांची विभागणी झाली, हे मान्य केलं तर नोटबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीचा परिणाम शहरातल्या छोटय़ा व्यापाऱ्यांवर तसेच मजुरांवर झाला नाही, असा निष्कर्ष काढायचा का?

२. ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ अशी विभागणी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत का दिसून आली नाही, हाही प्रश्न उपस्थित होतो. हिमाचलमध्ये तर ‘इंडिया’च्या तुलनेने ‘भारत’ अधिक आहे. पण तिथे मात्र भाजपला भरघोस मतदान झालं. त्यामुळे पाटीदार, दलित, ठाकूर असे जाती/समूहाचे राजकारण जे गुजरातेत शक्य होते, ते करण्यात या खेपेस काँग्रेस भाजपपेक्षा अधिक यशस्वी झाली, हे बहुधा गुजरातच्या निकालामागचे अधिक सबळ कारण असावे असे वाटते.

राजीव मुळ्ये, मुंबई

First Published on December 31, 2017 12:44 am

Web Title: readers reaction on lokrang articles 8