गिरीश कुबेर यांचा ‘काँग्रेस + डावे = भाजप’ हा ‘लोकरंग’मधील (१९ मार्च) लेख वाचला. असं म्हणतात की, सत्तेपुढे सगळ्या गोष्टी गौण असतात. त्यातही सध्याच्या राजकारणात ‘साध्य’ महत्त्वाचं ठरून साधनांना गौणत्व प्राप्त झालं आहे. पक्षांची धोरणे ठरलेली असतात. ती राबविण्यासाठी सत्तेची गरज असते. अन् त्यासाठी त्यांना ही सत्ता प्राप्त करून देतील अशा घटकांची मदत घेण्यात काहीच गर वाटत नाही. खरा प्रश्न आहे तो सत्ताप्राप्ती केल्यावर राबवायच्या धोरणांचा. पण ते ती राबविण्याऐवजी टिकविण्यासाठी अभद्र गोष्टी करायला सुरुवात करतात. यावर उपाय हाच की, लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाने निर्भयपणे काम करणे अन् विचारी मंडळींनी आपले विचार निर्भीडपणे मांडत राहणे.

– विठ्ठल सातपुते, कोंढार

सगळेच पक्ष लुटारूंच्या टोळ्या

‘काँग्रेस + डावे = भाजप’ हा लेख वाचला. गुळाच्या ढेपेभोवती जसे मुंगळे जमतात तसे सत्तेभोवती सत्तेचे दलाल गोळा होत असतात. आतापर्यंत काँग्रेस पक्षाभोवती ते जमत असत. परंतु सत्तेचा लंबक जेव्हा भाजपकडे सरकला तेव्हा हे सगळे मुंगळे या ढेपीकडे वळले आहेत. डाव्यांचा अपवाद वगळला तर सगळे पक्ष हे लुटारूंच्या टोळ्याच आहेत. यातल्या एका टोळीकडून भ्रमनिरास झाला की लोक दुसऱ्या टोळीकडे जातात आणि पहिल्यापेक्षा जास्त लुटले व फसवले जातात. विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्ष झाला की त्याची भाषा बदलते. एकंदरच सामान्य माणसांसाठी हा फारच प्रतिकूल काळ दिसतो आहे.

राजकुमार कदम, बीड

सत्ताकारण आणि साहसवादाची सरमिसळ

या लेखात गिरीश कुबेर यांनी राजकीय सद्य:स्थितीचे योग्य वर्णन केले आहे. भाजपने, पर्यायाने नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी ‘केडर-बेस’ कार्यकर्त्यांच्या व स्वयंसेवकांच्या मदतीने सत्ताकारण व साहसवादाची बेमालूम सरमिसळ करत नवराष्ट्रवाद, गरीबकल्याणाच्या घोषणांचा भूलभुलय्या यांच्या माध्यमातून नव्या राजकारणाला सुरुवात केली आहे. सर्वर्थाने काँग्रेसीकरणाच्या वाटेने जात भाजपने निवडून येऊ शकेल अशा सर्वाना पक्षात पावन करून घेऊन देशातील राजकीय अवकाश व्यापला आहे. त्या तुलनेत विरोधी पक्ष व काँग्रेस पक्ष गलितगात्र आणि विस्कळीत अवस्थेत दिसतात. प्रभावी प्रचार यंत्रणेतून यशाच्या चढत्या कमानीमुळे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटल्याप्रमाणे, २०१९ नाही, तर २०२४ सालच्या निवडणुकीची तयारी करण्याची पराभूत मानसिकता या पक्षांत निर्माण करण्यात भाजपने यश मिळवले आहे.  लेखात अनवधानाने बसपच्या स्वामीप्रसाद मौर्य यांच्याऐवजी भाजपचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांचा बसपचे नेते असा उल्लेख आला आहे. केशवप्रसाद पूर्वीपासून भाजपत आहेत. निवडणूक काळात स्वामीप्रसाद मौर्य यांनी भाजपत प्रवेश केला होता.

– जयंत पाणबडे, पुणे

मागच्या बाकावरचे पुढे!

‘काँग्रेस + डावे = भाजप’ हा लेख वाचला. अत्यंत समर्पक पद्धतीने तो लिहिला आहे. मागील जवळपास पाच दशके देशावर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाची तत्त्वे, मूल्ये, विचारधारा यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण करत ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणणारा भाजप सत्तावादी होत चालला आहे. या पक्षास घोषणा, जाहीरनाम्यातील आश्वासने यांचा सोयीस्कररीत्या विसर पडत चाललेला आहे. गुंड व भ्रष्टाचाऱ्यांना पावन करून पदे बहाल करत सत्तेची गणिते जुळवायची, भावना गोंजारणाऱ्या घोषणा करून विकासाची गाजरे दाखवायची; हे जे पूर्वी काँग्रेसने केले तेच आज भाजप करतेय. फरक इतकाच, की मागच्या बाकावरचे आता पुढे आलेत. त्याचे ‘मार्केटिंग’ मात्र प्रभावीपणे होत आहे. या भोळीभाबडी जनता मात्र भाबडय़ा आशेने भाजपकडे बघते आहे.

 पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली

पार्टी विथ नो डिफरन्स..

भाजपची भाषा विकासाची असली तरी प्रत्यक्ष आचार मात्र स्वार्थाने बरबटलेलाच आहे, हे गोवा आणि मणिपूरमधील सत्ता बळकावण्यासाठी त्यांनी केलेल्या लांडय़ालबाडय़ांनी सिद्ध केलं आहेच. ‘मुख में राम, बगल में छुरी’ असेच त्याचे वर्णन करता येईल. फक्त डोळ्यांवर झापड आलेल्या आणि मोदीभक्तांनी निर्माण केलेल्या मोदी-उन्मादात वाहवत गेलेल्या भाबडय़ा जनतेला हे कळत नाहीये, इतकंच. भाजपचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध आहे, पण मल्ल्यांसारख्या कर्जबुडव्या उद्योगपतींवर कडक कारवाई करण्याची त्यांची हिंमत नाही. त्यांची बुडित खात्यातील कर्जे सरकार माफ करणार. आणि हे कुणाच्या जिवावर? तर बॅंकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या आणि प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या सामान्य लोकांच्या पैशांची उधळपट्टी करून! म्हणजे एकीकडे उद्योगपतींनी कर्जे बुडवायची आणि सरकारने जनतेच्या पैशांतून बॅंकांना त्याची भरपाई करायची.. हा कुठला न्याय? मग शेतकऱ्यांनीच काय पाप केलंय? का ते गरीब आहेत म्हणून? ते पक्ष चालवायला, निवडणुका लढवायला कोटय़वधी रुपयांच्या देणग्या देत नाहीत म्हणून? भाजपाने लोकसभा निवडणुकांपासून आजवर नुसत्या जाहिरातींवरच हजारो कोटी रुपये खर्च केले असतील. शिवाय, जनतेच्या पैशांची लूट करून दररोज वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या, सार्वजनिक स्थळे या ठिकाणी मोदींच्या रोजच्या नवनव्या घोषणा आणि त्यांच्या केलेल्या, न केलेल्या विकासकामांची टिमकी मिरवणाऱ्या जाहिराती झळकताना दिसताहेत, त्या वेगळ्याच. याचा रोकडा हिशेब गलितगात्र झालेले विरोधी पक्षही मागत नाहीयेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सध्या गुंगीत असलेल्या जनतेलाच कधीतरी याचा साक्षात्कार होईल आणि मग तीच खडसावून जाब विचारेल.

– विश्वास सरदेसाई, लोणेरे