वास्तवदर्शी ‘बक्षिसी’

दासू वैद्य यांचा ‘यमक आणि गमक’ सदरातील ‘बक्षिसी’ हा लेख वाचला. लेखकाने पुरस्काराच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या हा विषय हाताळला. खूप बरे वाटले. एक सृजनशील कवी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलतो आहे, पोटतिडकीने भूमिका मांडतो आहे, ही गोष्ट आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्म्याला सुखावणारी आहे. मात्र, शासनाला पुरस्कार परत करून एकांगी निषेध करणाऱ्या मंडळींना गेल्या दहा वर्षांपासून आत्महत्या करणारे त्यावेळचे शेतकरी दिसले नाहीत. असो.

दासूंनी ‘बक्षिसी’ या लेखात मांडलेली भूमिका योग्य आहे. खऱ्या अर्थाने मातीत राबणारा शेतकरी इथे पुरस्कृत झालाच नाही, हे खूप मोठे सत्य त्यांनी मांडले आहे. शेतकऱ्याकडे शासनाला परत  करण्यासाठी पुरस्कारासारखं काहीच  नाही. जे होते ते तो देऊन चुकलाय. आता तो अडगळ झालाय.. धोरणामुळे आणि खोटय़ा प्रतिष्ठेमुळे! काही दिवसांनी या शेतकऱ्यांच्या केवळ स्मृतीच उरतील. दुसरं काय?
– प्रभाकर हरकल, परभणी.

 

भावलेलं मुक्तचिंतन

अंबरीश मिश्र यांनी भवताल आणि दुर्गाबाईंच्या साहित्यसंचिताबद्दल केलेलं मुक्तचिंतन फार भावलं. धर्मवादी व धर्मनिरपेक्षवादी असे दोन गट पूर्वीपासूनच आहेत. यात पुन्हा दोन प्रकार पडतात. एक कट्टर व दुसरे मवाळ. बाकी जनसामान्यांना अशा तत्त्वांबद्दल काही देणेघेणे नसते. पण ज्या परंपरा व प्रथांचा पगडा त्यांच्यावर असतो त्या दिशेने ते तात्पुरते चुंबकाप्रमाणे आकर्षित होतात. पण काही काळानंतर त्यांच्यातील कार्यकारणभाव जागृत होतो. प्रत्यक्ष जीवन जगताना वरीलपैकी कोणते तत्त्व जीवन सुसह्य करण्यासाठी जास्त उपयोगी पडते याचा ते विचार करतात आणि हळूहळू ते अनुचित प्रथा-परंपरांपासून दूर जातात. तर काही जण कट्टर होऊन विशिष्ट तत्त्वांच्या गटात सामील होतात. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प असते.

जेव्हा वैज्ञानिक क्रांती होते, माणसांच्या जीवनात आधुनिकता येते; विशेषकरून स्त्रियांच्या- तेव्हा या प्रथा-परंपरांचा दाब वाढण्यास पोषक काळ येतो. हळूहळू त्यातलं नावीन्य संपतं. ते अंगवळणी पडतं  तेव्हा हा दाब कमी होतो. हा काळ पडझडीचा असतो आणि त्याचा सामनाही करावा लागतो.

हा काळ लांबवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात. तसेच तो संपवण्यासाठीही प्रयत्न केले जातात. पण तो संपवू इच्छिणाऱ्यांना प्रवाहाच्या विरुद्ध पोहावे लागते.
– हेमंत पराडकर