संजय पवार (‘लोकरंग’, २८ सप्टेंबर) यांच्या लेखाचे ‘वाटप तुम्ही केलेत, जागा ‘आम्ही’ दाखवू’ हे शीर्षकच दाद घेऊन गेले. जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात एकदा कॉम्रेड डांगे बाळासाहेबांना उद्देशून म्हणाले होते, ‘सभा कशा उधळाव्यात, हे बाळने आम्हाला शिकवू नये. मी वर्ग घेईन त्या वर्गाला lok03बाळने यावे.’ त्यावर बाळासाहेबांनी ताबडतोब एका व्यंगचित्राच्या मध्यमातून डांगेंना हजरजबाबी उत्तर दिले होते, ‘वर्ग तुम्ही घ्या, पण धडा आम्ही शिकवू’. संजय पवारांच्या शीर्षकाने ती जुनी आठवण जागृत केली.
या लेखाद्वारे सर्वसामान्य मतदारांना जे काय म्हणायचे आहे, त्या कोंडलेल्या वाफेला संजय पवार यांनी वाट करून दिली आहे. जनतेला म्हणजेच मतदाराला, राजकीय पक्षांच्या दृष्टीने कस्पटाइतकीही किंमत नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर जे काय विचित्र आणि अनपेक्षित असे घडते आहे ते सगळे जनता आपल्या मनात नोंदवून ठेवत आहे. या वेळी सर्वसामान्यांच्या मनात लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी होता तितका उत्साह दिसणे कठीण आहे, कारण कुठल्याही एका पक्षावर जनतेचा आता विश्वास उरलेला नाही. तरीसुद्धा मतदार निरुत्साहाने का असेना, मतदान करेलच, कारण लोकशाही टिकवून धरण्याची जबाबदारी त्याचीच आहे हे तो जाणतो. सामान्य भारतीय मतदारासारखा बुद्धिमान, सजग, हुशार, अभ्यासू आणि पराकोटीचा अनाकलनीय मतदार मिळणार नाही. त्याला कोणी कधीही गृहीत धरू नये, हे बरे. या वेळी त्याचे मत कोणाला जाईल ते तो स्वत:लाही शेवटपर्यंत सांगणार नाही. या वेळी तरी तो पक्ष न पाहता ज्याचे काम आहे तो ‘माणूस’ पाहून त्याला आपला कौल देईल. ऐन वेळी पक्ष बदलून आपल्या पारंपरिक मतदारांना दगा देणाऱ्या संधिसाधूंना तो योग्य ती ‘जागा’ दाखवल्याशिवाय राहणार नाही. या वेळी सर्वाची अंकशास्त्राधारित गणिते चुकण्याची आणि मतदारांचा अंदाज घेणाऱ्या मोठमोठय़ा नामांकित संस्थांचे अंदाज या वेळी कोलमडून पडण्याची शक्यताच अधिक वाटते आहे. त्यातूनही अनपेक्षितपणे काहीतरी चांगलेच घडेल अशी आशा करू या.

नैतिकतेची ऐशी-तशी
संजय पवार यांचा ‘वाटप तुम्ही केलेत, जागा ‘आम्ही’ दाखवू’ हा लेख वाचला. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय गोंधळाचे त्यांनी अतिशय स्पष्ट चित्र रेखाटले आहे. युतीत आणि आघाडीत फाटाफूट झाल्यापासून नेत्यांमध्ये जणू पक्षांतराची स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे. त्यातही काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडून निवडून यायची जास्त अपेक्षा नसल्याने या पक्षांचे नेते शिवसेना किवा भाजपा यांपकी ज्यांच्याकडून तिकीट मिळेल तिकडे नुसते पळत सुटले. काही नेत्यांची तर इतकी वाईट अवस्था आहे की, आपण कोणत्या निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर होतो हे त्यांनादेखील कदाचित आठवत नसेल. नतिकता, पक्षनिष्ठा असे शब्द जणू यांनी कधी ऐकलेच नाहीत. यांची निष्ठा केवळ सत्तेच्या चरणीच यांनी अर्पण केलेली आहे.
कालपर्यंत एकमेकांचे गोडवे गाणारे भाजप-शिवसेना आज एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. कालपर्यंत एकत्र सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आज एकमेकांचे दोष दिसत आहेत. आठवलेंसारख्या गोंधळी नेतृत्वामुळेच आंबेडकरी विचारांची वाट लागली याची जाणीव शिवसेनेला शिवशक्ती-भीमशक्तीचा जागर करताना झाली नव्हती? पृथ्वीराज चव्हाण बिल्डरांना झुकते माप देतात हे अजितदादांना सत्तेत असताना कळत नव्हते? एवढाच जर एकमेकांचा त्रास होत होता तर तुम्ही कालपर्यंत एकत्र का होता? केवळ सत्तेसाठी? याचे उत्तर या चारही पक्षांच्या नेत्यांपकी कोणी देऊ शकेल? उलट त्याला या नेत्यांनी एक गोंडस नावदेखील शोधून काढलेय- राजकीय अपरिहार्यता. या नावाखाली त्यांनी काहीही करावे आणि जनता ते निमूटपणे सहन करेल हे त्यांनी गृहीतच धरलेले आहे.
आज हे पक्ष एकमेकांच्या नावाने खडे फोडत आहेत. परंतु उद्या निकाल लागल्यावर जर कोणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत भेटले नाही तर हेच पक्ष परत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणार. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी-भाजप, काँग्रेस-शिवसेना, भाजप-मनसे यासारखी नवी युती जन्माला आल्यास जनेतेने त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नये. कारण हा खेळ फक्त आणि फक्त सत्तेचाच आहे. इथे जनता, महाराष्ट्र, विकास या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. पण राजकारण्यांनी नतिकता सोडली, म्हणून मतदारांनी सोडण्याची काहीच आवश्यकता नाही. जनतेने मनात आणले तर ती काय करू शकते हे दाखवून देण्याची हीच खरी योग्य वेळ आहे.
– विनोद थोरात, जुन्नर.

वाचनाची गोडी कशी लागेल?
डॉ. प्रतिभा कणेकर यांचा ‘उद्याचे वाचक घडविण्यासाठी’ (लोकरंग, १४ सप्टेंबर) हा लेख वाचला. अमेरिकेत सजग बालवाचक घडविण्याच्या दृष्टीने अनेक कल्पक उपक्रम कसे राबवले जातात, याची लेखिकेने उत्तम माहिती दिली आहे. परंतु आपल्या देशातही असे प्रयत्न केले जावेत ही अपेक्षा व्यक्त करताना लेखिकेने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित केला आहे. तो असा की, अशा प्रकारे वाचनाची गोडी फक्त शिक्षण मातृभाषेतून असेल आणि ते अभिमानाने घेतले जात असेल तरच लावता येणे शक्य आहे. आपल्या देशात बहुसंख्य बालके ही एक तर आपल्या मातृभाषेला तिलांजली देऊन इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत किंवा इंग्रजी माध्यमातील महागडे शिक्षण आपल्याला परवडत नसल्याने मातृभाषेतील दुय्यम दर्जाचे शिक्षण आपण घेत आहोत या गरसमजात आणि न्यूनगंडात बुडालेली आहेत.
भारतीय राज्यकत्रे व भारतीय सर्वसामान्य पालक हे गुलामगिरीची मानसिकता व अज्ञान यांनी ग्रस्त आहेत आणि ते मिळून बालकाच्या मातृभाषेतून शिकण्याच्या नसíगक हक्काची पायमल्ली करीत आहेत. वाचनाची गोडी लागणे हा शिक्षणाचाच भाग आहे व त्यासाठी मातृभाषेतून शिक्षणाला पर्याय नाही हे आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. देशाच्या पंतप्रधानांना पाठय़पुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तके किती मुले वाचतात, असा प्रश्न देशभरातल्या विद्यार्थ्यांना विचारावासा वाटतो. शिक्षणाने प्रथम मेंदू प्रगल्भ होतो व त्यानंतर यश, कीर्ती व पसा मिळतो; परंतु तेवढा धीर आमच्याजवळ नाही. शिक्षणातून आम्हाला थेट पोट व खिसा भरायचा आहे. त्यापायी मेंदू रिकामा राहिला तरी आम्हाला चालणार आहे. म्हणूनच मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व शिक्षणशास्त्रज्ञ जीव तोडून सांगत असतानासुद्धा मातृभाषेला शिक्षणात आम्ही दुय्यम स्थान देतो. स्वत:लासुद्धा नीट न येणाऱ्या इंग्रजी भाषेतून बालकांनी शिकावे, असा अट्टहास करतो. अशा प्रकारे इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्यांना त्या भाषेतील पुस्तकांच्या वाचनाची गोडी लावावी तर इंग्रजी ना मातृभाषा, ना राज्यभाषा, ना विचार करण्याची भाषा, ना घरात, दारात, परिसरात कुणाशी संवादाची भाषा, ना शिक्षकांनाही ती उत्तम येते. कशी गोडी लागणार? मातृभाषेतील वाचनाची गोडी लावावी तर ती दुय्यम स्थान असलेली. बालकांना फक्त कामापुरती बोलता येते. लिहा-वाचायला फारशी शिकवलेली नाही. आईला दूध येत नाही आणि मोलकरणीचे दूध प्यायला प्रतिष्ठा आड येते. आई आणि मोलकरीण यांच्यात आपण गफलत तर केलेली नाही ना, हा विचार करण्याइतकी समजही आता राहिलेली नाही. त्यामुळे गोडी कोणत्या भाषेतील वाचनाची लावणार? ‘लंकेत सोन्याच्या विटा’ तशी टेक्सासमध्ये वाचनाची गोडी आहे. आमच्याजवळही सर्वकाही होते, पण ते देऊन आम्ही ‘शिक्षण’ घेतो आहोत. सोन्याच्या विटा देऊन आम्ही करवंटय़ा विकत घेतो आहोत.
– उन्मेष इनामदार, डोंबिवली.

जुन्या दर्जेदार कृतींबद्दल अनास्था
सर्वप्रथम, सई परांजपे यांचे पुनर्भेटीबद्दल स्वागत. ‘अडोस पडोस’ या मालिकेविषयीचा त्यांचा लेख (लोकरंग, ५ ऑक्टोबर) वाचला. खरे तर ही मालिका माझ्या बालपणी प्रसारित होत असल्यामुळे तिच्याबद्दलच्या काही आठवणी नाहीत. पण या लेखामुळे इंटरनेटवर किंवा इतरत्र कुठे मालिका बघायला मिळेल का, याची ओढ लागली. मात्र, सई परांजपे यांनी आधीच्याच काही लेखांत नमूद केल्याप्रमाणे, याही मालिकेचे भाग किंवा इतर काही संबंधित साहित्य उपलब्ध नाही, हे वाचून मन खट्टू झाले.
भारतात, साधारणत: सर्वच क्षेत्रांमध्ये आणि विशेषत: कला क्षेत्रात केलेल्या कामाचे ढोबळ मानाने आर्थिक उदारीकरणापूर्वीचे आणि नंतरचे असे दोन भाग जर केले, तर पूर्वीच्या कामांचा संग्रह करून ठेवल्याचे अभावानेच आढळेल. असे का? आपण संस्कृतीचे, परंपरांचे ठायीठायी गोडवे गात असतो, मग त्याच संस्कृतीच्या आधुनिक पाईकांनी केलेल्या कामाचे जतन का होत नाही? कला क्षेत्रात आजही नवनवे प्रयोग होतात, पण बेगडी दिखाऊपणा (खासकरून दूरचित्रवाणीवर) इतका वाढला आहे, की सई परांजपे यांच्या मालिकेसारख्या उत्तमोत्तम कलाकृती या नवनिर्मात्यांना दाखवून त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालायची वेळ केव्हाच येऊन ठेपली आहे.
‘जुने ते सोने’ असे आपण म्हणतो, मग जुन्या दर्जेदार कृतींबद्दल ही अनास्था का?
– परेश वसंत वैद्य, मुंबई.