01 April 2020

News Flash

पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य

मतदार  यादीतील नावे वगळण्याची पक्रिया राबवताना संबंधितांना नोटीस पाठविल्या जातात

दिलीप शिंदे

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,  महाराष्ट्र राज्य

मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यांत काळजी घेतली जाते आहे..

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक पक्रिया संपूर्णपणे पारदर्शक व्हावी आणि कोणत्याही शंकेला वाव राहू नये यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्च्याकडून, तसेच जिल्हास्तरावरील सर्व निवडणूक कार्यालयांमार्फत विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. भारताच्या लोकशाही व्यवस्थेला समर्थ आणि सक्षम करण्यासाठी पारदर्शी पक्रिया आणि नि:पक्षपाती यंत्रणा यांचा अत्यंत महत्त्वाचा हातभार आहे. आपल्या देशातील निवडणुका या पूर्ण पारदर्शकरीत्या व प्रभावीपणे राबवल्या जातात. त्याचे सबंध जगात कौतुक केले जाते व याचा अभ्यासही वेगवेगळ्या पातळीवर होतो. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची पक्रिया सुरू आहे. ही निवडणूक पारदर्शकरीत्या व्हावी व राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार आणि समाजातील सर्वच घटक यांच्या कोणत्याही शंकेला वाव राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मागदर्शनाखाली राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मतदान केंद्र पातळीपर्यंतच्या यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना राबविते.

संपूर्ण पक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर पारदर्शीपणा असतो. अगदी मतदार यादी तयार करण्यापासून ते ती अंतिम करेपर्यंत त्याचप्रमाणे मतदान यंत्रांची तपासणी करण्यापासून ती केंद्रावर पोहोचविण्यापर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येते.

निवडणुकीतील पारदर्शकता वाढावी यासाठी प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग घेतला जातो. निवडणूक पक्रियेमध्ये मतदार याद्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामध्ये नाव असल्याशिवाय मतदान करता येत नाही.  याद्यांची तपासणी, त्यामध्ये वगळणी, दुरुस्ती अशा सारख्या प्रत्येक बाबी राजकीय पक्षाच्या, बूथ लेव्हल एजंटच्या समक्ष केल्या जातात. मतदार यादीचा मसुदा तयार करताना बूथ लेव्हल अधिकारी यांच्या जोडीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. यादी विषयक आलेल्या प्रत्येक लहान-सहान आक्षेपांची नियमानुसार तपासणी इत्यादी करून पूर्तता केली जाते व याद्या अधिकाधिक अचूक आणि त्रुटीरहित राहतील याची काटेकोर काळजी घेण्यात येते.

यंदाच्या निवडणुकीसाठी राज्यभरातील राजकीय पक्षांच्या एक लाखाहून अधिक बूथ लेव्हल एजंटची नियुक्ती करण्यात आली होती. मतदार  यादीतील नावे वगळण्याची पक्रिया राबवताना संबंधितांना नोटीस पाठविल्या जातात, आक्षेप मागविले जातात. या आक्षेपांची पूर्तता झाल्यावरच नावे वगळली जातात. यादी तयार झाल्यावर प्रारुप यादी प्रसिध्द होते त्यावरही हरकती, सूचना मागविल्या जातात. निर्णय घेऊन यादी अंतिम होते व ती सर्व राजकीय पक्षांना मोफत देण्यात येते.

मतदान यंत्रांची सुरक्षितता

सर्व मतदान यंत्रांच्या प्रथम पातळीवरील तपासणी म्हणजे  ‘फर्स्ट लेव्हल चेक’ करताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. सर्व यंत्रे उत्तम स्थितीत आहेत किंवा नाहीत हे त्यांना प्रत्यक्ष स्ट्राँग रूममध्ये नेऊन दाखविले जाते. एवढेच नव्हे तर या ठिकाणी काही यंत्रांवर मॉक पोल घेऊन यंत्रांची व व्हीपॅटची चाचणी देखील करण्यात येते. प्रतिनिधीच नव्हे तर माध्यमांसमोर देखील ही चाचणी करण्यात येऊन यंत्रांच्या योग्यतेविषयी खात्री करून देण्यात येते.

विधानसभेसारख्या निवडणुकीत जिल्हा स्तरावरून, तालुका व सर्वदूर ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांसाठी मतदान यंत्रे पाठविण्यात येतात. या पक्रियेतसुद्धा राजकीय पक्षांच्या उमेदवारांना/प्रतिनिधींना सहभागी करून घेतले जाते. मतदान यंत्रांच्या सर्व हालचालींची माहिती, राजकीय पक्षांना आगाऊ  वेळ देऊन कळविण्यात येते. त्यांच्या समक्ष ही यंत्रे निवडणूक कामासाठी तयार केली जातात. विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची पाठवणी करण्याआधी, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर त्यांचे रँडमायझेशन (सरमिसळ) केले जाते. ही यंत्रे कोणत्या तालुक्यात  जातील आणि तेथून कोणत्या मतदार केंद्रात जातील याची माहिती व मतदान यंत्रांचे क्रमांक या प्रतिनिधींच्या समक्ष संगणकीय प्रणालीद्वारे काढली जातात व याद्य सर्व पक्षांना देण्यात येतात. मतदान यंत्रांची रवानगी मतदान केंद्रांवर करताना देखील पारदर्शकता पाळण्यात येते. तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, माध्यमे यांच्या समक्ष वाहनांमधून ही यंत्रे नेली जातात. या वाहनांवर ॅढर यंत्रणेव्दारा हालचालींचे निरीक्षण केले जाते. अशा वाहनांसोबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जाता येते.

प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानापूर्वी व्हीव्हीपॅट यंत्रांवर मॉकपोल घेण्यात येतो. या वेळेस सुद्धा उमेदवार / प्रतिनिधींचा सहभाग असतो. दिवसभर मतदानाची पक्रिया सुरू असताना मतदान केंद्रांमध्ये देखील पूर्णवेळ या प्रतिनिधींची उपस्थिती असते.  मतदान संपल्यावर या प्रतिनिधींच्यासमोर मतदान यंत्रे सीलबंद केली जातात. त्यावरील सिलवर त्यांच्या स्वाक्षऱ्या  घेतल्या जातात.

सीलबंद केलेली मतदान यंत्रे मतदान केंद्रातून ‘स्ट्राँग रूम’मध्ये नेली जातात तेव्हाही त्यांची सोबत करण्याची मुभा उमेदवार, प्रतिनिधींना असते. या प्रतिनिधींच्यासमोर ‘स्ट्राँग रूम’ सीलबंद केली जाते. व कुलुपावर सील लावून त्यावर त्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येतात. ही सर्व पक्रिया व्हीडीओ कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डही केली जाते. ‘स्ट्राँग रूम’ ही सीसीटीव्हीच्या देखरेखीत असल्याने तेथील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते. या स्ट्राँग रूमला केवळ एकच दरवाजा असतो. हत्यारी  सुरक्षेचे तीन कवच सभोवती असतात. निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना ‘स्ट्राँग रूम’भोवती २४ तास पहारा देता येतो.

मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्राँग रूम उघडून यंत्रे बाहेर काढली जातात. त्यानंतर या यंत्रांचे सील त्यांच्या समक्षच उघडण्यात येते. मतमोजणी पक्रियेतील प्रत्येक बाब त्यांना दाखवली जाते. मतमोजणी करताना प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच व्हीव्हीपॅट यंत्रांतील पावत्या मोजल्या जातात. अशी यंत्रे प्रतिनिधींच्या समक्ष लॉटरीव्दारा निवडली जातात. त्यानंतरच अंतिम निकाल तयार केला जातो. मतमोजणीच्या दिवशी सर्व  ठिकाणी प्रत्येक उमेदवार, प्रतिनिधींना स्थान दिले जाते. या दिवशीचे संपूर्ण व्हीडीओ चित्रीकरण देखील केले जाते.

निवडणूक पक्रिया आणखी प्रभावी, पारदर्शक व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘सी-व्हिजील’ या अ‍ॅपद्वारे आचारसंहिता भंगाच्या कोणत्याही घटनेचे चित्रीकरण करून भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठविता येते. या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाते. या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही केली जाते.

मतदारांपर्यंत तंत्रज्ञान..

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा ‘kelectrolsearch.inl’ तसेच ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती तत्काळ मिळू शकते.  उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे, शपथपत्रे, त्यांच्या मालमत्तेचा-गुन्ह्यांचा इ. तपशील नामनिर्देशन पत्रे भरली त्याच दिवशी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली  जातात.

दिव्यांग मतदारांना ‘पीडब्ल्यूडी अ‍ॅप’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे दिव्यांग व्यक्तीचे मतदान म्हणून नोंदणी, मतदार यादीतील नावाचे हस्तांतरण, नावामध्ये सुधारणा, नाव वगळणे, व्हील चेअरसाठी विनंती आदी बाबी साध्य होतात.

राज्यात सुमारे दहा हजार मतदान केंद्रावरील संपूर्ण पक्रियेचे रीअल टाईम वेब कास्टिंग करण्यात येत आहे. या केंद्रात बसविलेल्या कॅमेऱ्याव्दारा जिल्हा निवडणूक अधिकार / निवडणूक निर्णय अधिकारी / मुख्य निवडणूक अधिकारी / निवडणूक आयोग संपूर्ण पक्रिया थेट पाहू शकतात व नियंत्रण ठेवू शकतात.

‘सुविधा अ‍ॅप’ हे खास राजकीय पक्षांसाठी विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रचार सभा, मिरवणुका आदी बाबींसाठी परवानगी घेता येणे सुलभ झाले आहे. कोणाचा अर्ज कोणत्या वेळी  प्राप्त झाला व परवानगी कोणास कधी मिळाली याची माहिती मिळते.

या सर्व सुविधा आणि सर्व उपाययोजनांद्वारे मतदान आणि मतमोजणी पक्रिया पारदर्शक करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि मतदारांनी अत्यंत निर्भयपणे या पक्रियेत सहभागी व्हायला हवे. सर्वाचा अधिकाधिक सहभाग या पक्रियेला आणि पर्यायाने आपल्या लोकशाहीला अधिक बळकट, सक्षम, समर्थ करू शकेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 2:23 am

Web Title: additional chief electoral officer dilip shinde article about transparency on top priority on assembly election zws 70
Next Stories
1 स्वच्छताक्रांती थांबणार नाही..
2 वाढता विश्वास, वाढत्या आकांक्षा!
3 वाढीव दंडाची तरतूद जनहितासाठीच!
Just Now!
X