04 August 2020

News Flash

चांगुलपणाला कार्यक्षमतेची जोड!

देशातील स्वातंत्र्योत्तर लोकशाही राजकारणात ‘राजकीय पक्ष’ हे एक लोकतांत्रिक संस्था म्हणून जसे विकसित व्हायला हवे होते, तसे झाले नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

विनय सहस्रबुद्धे

भाजपचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य

‘मळलेल्या वाटेने’ न जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाचे, विशेषत: त्यांच्या नेतृत्वशैलीचे विश्लेषण पुरेसे झालेलेच नाही.. आव्हाने अनेक असताना त्यांनी स्वत:ची छाप कोणत्या गुणांच्या आधारे उमटवली, याची चर्चा २२ जुलै रोजी झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त तरी सुरू व्हावयास हवी..

देशातील स्वातंत्र्योत्तर लोकशाही राजकारणात ‘राजकीय पक्ष’ हे एक लोकतांत्रिक संस्था म्हणून जसे विकसित व्हायला हवे होते, तसे झाले नाहीत. तसे न होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यातील एक म्हणजे ‘निवडणूकशाही,  म्हणजेच लोकशाही’ हे आपल्या व्यवस्थेत अप्रत्यक्षपणे रुजलेले घातक समीकरण. याच समीकरणापोटी विचारधारेचा मूलभूत आधार नसलेले अनेक राजकीय पक्ष एकाच साच्यातून काढलेल्या शिल्पकृतींसारखे दिसू लागले. त्याची स्वाभाविक परिणती म्हणजे राजकीय नेतृत्वाचा साचेबद्धपणा! दिसण्याच्या, वागण्या- बोलण्याच्या आणि एकुणात वागण्याच्या बाबतीत राजकीय नेते सारखेच भासू लागले. मराठी-हिंदी चित्रपटांनी या साचेबद्धतेला खतपाणी घालून राजकीय नेत्यांबद्दलच्या जनधारणा (पब्लिक पर्सेप्शन) आणखी विकृत केल्या.  वयाची शंभरी पार केलेले केशवराव धोंडगे असोत वा रामभाऊ म्हाळगी, दत्ता ताम्हाणे, नरसय्या आडम असे राजकीय नेते असोत; त्यांच्या व्यक्तिमत्त्वांच्या, नेतृत्वशैलीच्या बाबतीत ‘ते अपवाद आहेत’ असे मानून जनचर्चेच्या परिघातून ते वगळलेच गेले. शिवाय यापैकी  बहुसंख्य हयातभर विरोधी बाकांवर बसलेले आणि ‘सत्तेत नसताना आदर्श घालून देणे तर सोपेच असते’ ही आणखी एक भ्रामक धारणा. या सगळ्याचा परिणाम म्हणजे राजकीयदृष्टय़ा उल्लेखनीय यश मिळवूनही ‘मळलेल्या वाटेने’ जाणे नाकारणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्यांच्या राजकारणाची, नेतृत्वशैलीची विश्लेषणाच्या पातळीवर झालेली उपेक्षा!

कालच देवेंद्रजींचा वाढदिवस साजरा झाला. ते आता पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करताहेत, पण इतक्या तरुण वयात इतक्या झपाटय़ाने स्वकर्तृत्वावर पुढे आलेला नेता  महाराष्ट्रात तरी विरळाच. त्यांचे वडील राजकारणात होते, हे खरे असले तरी देवेंद्र फडणविसांचे घवघवीत यश हे ‘वडिलोपार्जित संपत्ती’सारखे घराणेशाहीजन्य नाही. वडिलांकडून त्यांनी ‘राजकारणाला सेवेचं साधन’ मानण्याचा संस्कार घेतला, ‘अ.भा.वि.प.’ मध्ये लोकनेतृत्वाचे धडे घेतले आणि प्रशासनाची बाराखडी गिरवली, ती नागपूर शहराचे सर्वात तरुण महापौर झाल्यानंतर. आणि खरं सांगायचं तर महापौर  झाल्यानंतरचा त्यांचा प्रवास हा ‘ही नेव्हर लुक्ड बॅक’ या प्रकारचा; सतत आणखी प्रगतीचा, उन्नतीचा आणि मुख्य  म्हणजे राजकारण आणि प्रशासन या दोन्ही बाबतीत विकसित होत गेलेल्या  प्रगल्भतेचा!

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा आसमंतात एक साशंकता होती. मुख्यमंत्री तरुण, तडफदार असले तरी अननुभवी होते. नागपूर महापालिका चालविणे वेगळे आणि राज्याचा गाडा हाकणे निराळे. शिवाय भाजपाला एकहाती बहुमत नव्हते. कर्तृत्वापेक्षा मुख्यमंत्री कोणत्या समाजाचे आहेत त्याची ‘दबी जुबान में’ चर्चा करण्यात विरोधकांना जास्त रस! शिवाय शेतकरी आत्महत्या, सिंचनातील अनुशेष, मुंबईतील रखडलेले प्रकल्प,  भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनिक यंत्रणा आणि मुख्य  म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून बहुसंख्य ठिकाणी विरोधकांचा वरचष्मा, असे प्रतिकूलतेचे अनेक घटक दबा धरून होते. शिवसेना हा मित्र-पक्ष; पण त्यांच्याकडूनही अस व्हावे असे दबावाचे राजकारण सुरू होतेच. प्रशासनातही ‘नेहमीचे सत्ताधारी तर आम्हीच आहोत’ ही अव्यक्त भावना!  आव्हानांची ही मालिका कमीच म्हणून की काय, मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आंदोलने आणि मोर्चे यामुळे वातावरणात आणखी एक तणाव.

पण लोकप्रश्नांची समग्र आणि सुयोग्य जाण, विकासाच्या राजकारणाशी असलेली टिकाऊ बांधीलकी, मुळातला स्वागतशील- संघटनशील स्वभाव, प्रशासनावर पकड मिळविण्याचे कसब आणि अंगावर आलेल्याला, आवेश आणि आविर्भाव टाळून त्यालाही समजणार नाही अशा शिताफीने शिंगावर घेण्याची निडर वृत्ती या भांडवलावर देवेंद्रजींनी स्वत:ची अशी एक नेतृत्वशैली यशस्वीपणे विकसित  केली. माणसाच्या मनात एक सकारात्मकता असेल तर ती चेहऱ्यावर उमटतेच. त्यांच्या चेहऱ्यावरचे सुप्रसिद्ध ‘स्मितहास्य’ त्याच प्रकारचे!

विकास-प्रशासनाच्या विषयात देवेंद्र फडणविसांचा भर दीर्घ पल्ल्याच्या आणि ठोस परिणामदायी योजनांवर राहिला आहे. ‘जलयुक्त शिवार’ या त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे हजारो गावांच्या शिवारातील भूजलाची पातळी वाढली, गावे हळूहळू  टँकरमुक्त होत गेली आणि मुख्य म्हणजे ‘लोकसहभाग केंद्रित’ ग्रामीण संरचनात्मक विकासाचे एक मॉडेल यशस्वीपणे उभे राहिले.

मुंबई व अन्य महानगरातील मेट्रो-जाळ्याची उभारणी हेही त्यांच्या दूरदृष्टीचे आणि निर्णायकतेचे उदाहरण म्हणता येईल. सरकारी यंत्रणा तीच,  नियम वा कायदेही जुनेच आणि भांडवलाच्या उपलब्धतेबद्दलच्या मर्यादाही त्याच. पण तरीही देवेंद्रजींनी मेट्रो प्रकल्प असाधारण वेगाने  पुढे नेला तो राजकीय इच्छाशक्तीच्या ठामपणाच्या बळावर.

विदर्भाच्या अनुशेषाची चर्चा आपल्याकडे होत राहते, पण मुंबई महानगरीच्या संरचना विकासाचा पराकोटीला गेलेला अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भाच्या सुपुत्राला कंबर कसावी लागली, हे मुंबईबद्दल मालकी हक्काच्या भावनेतून बोलणाऱ्या सर्वानीच लक्षात घेण्याजोगे आहे.

शेतीच्या विषयात तर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संदर्भातील मुख्यमंत्री समितीचे अध्यक्षपदच फडणविसांकडे आहे. त्यांनी महाराष्ट्रात कर्जमाफीसारख्या संवेदनशील विषयावर बँकांना नव्हे, तर शेतक ऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी आणि शेतमालाला वाजवी आधारभूत भाव मिळावा, पण तरीही भाववाढ होऊ नये यासाठी केलेले प्रयत्न या संदर्भात उल्लेखनीय आहेत.

मुंबईतील गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचा प्रश्न असो वा वर्षांनुवर्षे रखडलेल्या मोनो रेल प्रकल्पाला गती देण्याचा; मुख्यमंत्र्यांची विचारपूर्वक निर्णय घेण्यातील तत्परता आणि निर्दोष अंमलबजावणीवर असलेला त्यांचा भर पूर्वीच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत विशेष  नजरेत भरणारा आहे.

गेली पाच वर्षे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी ना स्वत:च्या वा आपल्या गोतावळ्याच्या  शिक्षणसंस्था उभ्या केल्या, ना साखर कारखाने उभारले, ना ज्ञातीबांधवांच्या मतपेढय़ा उभ्या केल्या. त्यांनी चौकटीबाहेरचे  राजकारण केले आणि अल्पावधीत आपल्या कामाचा सखोल ठसा उमटविला.

समाजातल्या वंचित, शोषित आणि उपेक्षित बांधवांविषयीची प्रामाणिक कळकळ हे फडणविसांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वाचे  वैशिष्टय़! या कळकळीपोटीच आदिवासी वा शेतकरी मोर्चाला ते स्वत: तरी सामोरे गेले किंवा ज्येष्ठ मंत्र्यांना तरी सामोरे जाण्याचे त्यांनी निर्देश दिले. उन्हातान्हातून पायपीट करत मुंबईत दाखल  झालेल्या मोर्चेक ऱ्यांना त्यातून दिलासा मिळाला.

राज्यकर्त्यांची ही संवेदनाच त्यांच्या विचारांची दिशा ठरवित असते. त्या विचारातूनच मग हाती घेतलेल्या कामासंदर्भात एक कार्यनिष्ठा निर्माण होते. त्या कार्यनिष्ठेतून मध्यरात्रीसुद्धा मेट्रोच्या भूमिगत मार्गाच्या कामांची प्रगती समक्ष पाहण्यासाठी ते उपनगरांचा प्रवास करतात.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून शेकडो गरीब रुग्णांना असाध्य व्याधींमधून मुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली, तीही या प्रामाणिक कळकळीतूनच.

महाराष्ट्राने अनेक कर्तबगार मुख्यमंत्री बघितले आहेत आणि जवळजवळ तेवढय़ाच संख्येत सचोटीचे, प्रामाणिक राजकारणीही बघितले आहेत. पण सज्जन राजकारण्यांमध्ये प्रशासकीय चातुर्य किंवा कार्यक्षमता अभावानेच आढळते आणि चतुर सत्ताधारी ‘सचोटीच्या मार्गाने आम्ही गेलो तर यशस्वी कसे होणार’, असा वरवर निरुत्तर करणारा प्रश्न विचारतात. देवेंद्रजींनी चांगुलपणा आणि चातुर्य (चलाखी नव्हे!) यांची सांगड घालून यशस्वी सत्ताधारी ‘असेही’ असू शकतात याचा अनुकरणीय वस्तुपाठ घालून दिला आहे.

पन्नाशीच्या उंबरठय़ावर त्यांना सर्वोत्तम शुभेच्छा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 12:12 am

Web Title: article on cm devendra fadnavis by vinay sahstrabuddhe abn 97
Next Stories
1 पाच लाख कोटी डॉलरचा मार्ग!
2 कल्याणासाठी प्रभावी नियोजन
3 मोहिमेवरील माणूस!
Just Now!
X