राम माधव

भाजपचे केंद्रीय सरचिटणीस आणि ‘इंडिया फाऊंडेशन’चे प्रमुख

करोना विषाणू संसर्ग जगभर पसरल्यानंतर चीन-अमेरिका सहकार्य पोकळ ठरले आहे, एक नवी विश्वरचना गरजेची ठरते आहे. अशा काळात मोदी यांच्या नेतृत्वाचे गुण जगाला दिसतील असेच आहेत. लोकशाही पद्धतीनेच नेतृत्व करण्याचा मोदी यांचा आग्रह, हा भारतास नव्या विश्वरचनेच्या पायाभरणीत अग्रस्थान देणाराच आहे..

शंभरहून अधिक वर्षांपूर्वी युरोप, अमेरिका वा युरोपीय देशांच्या वसाहती येथे दुसऱ्या देशांतून येणाऱ्या लोकांना ना पारपत्राची गरज असे ना व्हिसाची. मात्र पहिल्या महायुद्धानंतर हे सारे बदलले- राष्ट्रांच्या सीमा अधिक कठोर झाल्या. आर्थिक कुंठितावस्था आणि पाठोपाठ मंदीही आली. राष्ट्रवाद आणि काहीसा अतिरेकी राष्ट्रवाद बोकाळून आणखी एक महायुद्ध अटळ ठरले. त्या दुसऱ्या महायुद्धानंतर, आपली एकमेकांशी जुळलेली- पण संस्थात्मक स्वरूपाची अशी जागतिक व्यवस्था तयार झाली. गेल्या ६५ वर्षांत, कित्येक अडथळे पचवीत तीच विश्वव्यवस्था तगून राहिलेली आहे.

‘कोविड-१९’च्या महासाथीने मात्र या विश्वव्यवस्थेला होत्याचे नव्हते करून टाकणारे आव्हान दिले, असे मानले जाते. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात देश आपापल्यापुरतेच पाहात होते, एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू होती, तसे आता दिसते आहे आणि यापुढे जगातील देश हे अधिक बंदिस्त, संकुचित राष्ट्रवाद जपणारे होतील, अशी भाकिते राज्यशास्त्राच्या काही अभ्यासकांनी केलेली आहेत. अर्थशास्त्रज्ञांनीही आर्थिक जागतिकीकरण आणि मुक्त व्यापार यांच्यावर संक्रांत आल्याचा सूर लावलेला आहे.

हा निराशावाद कोठून आला? निव्वळ करोना-कुळातील एखाद्या विषाणूमुळे? नक्कीच नव्हे.

विजोड सहकार्य

घडले आहे ते असे : महाशक्तीशाली समजल्या जाणाऱ्या दोन देशांच्या आत्मविश्वासाला डळमळीत करणारे हादरे दिलेले आहेत. अमेरिकेतील ‘हूवर इन्स्टिटय़ूशन’मधील इतिहासकार नायाल फग्र्युसन यांनी ज्या देशद्वयाला ‘चिमेरिका’ म्हटले होते, ते हे दोन देश. गेल्या दशकभरात चीन आणि अमेरिका यांनी आर्थिक संबंधांचे जे काही प्रारूप दाखवून दिले, त्याची तुलना फग्र्युसन यांनी ‘निचिबेइ’ (अर्थ : अमेरिकन-जपानी) या जपानी शब्दाने ओळखल्या जाणाऱ्या व २० व्या शतकाच्या अखेपर्यंत टिकून राहिलेल्या जपान-अमेरिका आर्थिक सहकार्याशी केलेली आहे. ‘चिमेरिका’ हे अगदीच विजोड कसे होते, हे करोना विषाणूमुळे उघड झाले इतकेच.

आज चीनच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले जात आहेत. हे आरोप असे की, घातक विषाणूला सीमा ओलांडू देऊन महासाथ फैलावण्यामागे चिनी नेतृत्वाने केलेली लपवाछपवी हेच कारण आहे. अगदी गेल्या आठवडय़ापर्यंत चीनमध्ये करोनाबाधितांची संख्या ८२,००० आणि बळी ४,५०० असे आकडे सांगितले जात होते. वॉशिंग्टन शहरातील ‘अमेरिकन एन्टरप्राइझ इन्स्टिटय़ूट’ या थिंक-टँकमधील विश्लेषक डेरेक सिझर्स यांच्या दाव्यानुसार, प्रत्यक्षात चीनमध्ये तब्बल २९ लाख बाधित असू शकतात.

आजचा चीन हिटलरी जर्मनीसमान

काही देश आंतरराष्ट्रीय रीतीभातींची बूज राखत नाहीत. चीन हा त्यांपैकी एक. हा देश ‘ऐतिहासिक अनुभवसंचित’ म्हणून माओने १९४९ साली सत्ता काबीज केली त्या क्रांतीपासून पुढे आत्तापर्यंतच्या अनुभवाआधारे चालणारा देश आहे. चीनचा विश्व-दृष्टिकोन हा तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर आधारलेला दिसतो : एक म्हणजे ‘जीडीपी-वाद’, दुसरे म्हणजे चीनकेंद्रितता आणि तिसरे चीन हा अपवादात्मकच मानण्याचे तत्त्व. या तिन्हींचा उगम त्या क्रांतीपासूनचाच आहे.

१९८० च्या दशकात डेंग शिआओपिंग यांनी म्हणे, आर्थिक प्रगती हेच सर्वात महत्त्वाचे तर्कशास्त्र असल्याचे म्हटले होते. याला चिनी अर्थशास्त्रज्ञ ‘जीडीपी-वाद’ (सकल राष्ट्रीय उत्पादन वाढवत राहणे) म्हणतात. ‘चीनकेंद्रित’ राजकारण हे माओने स्वयंपूर्णतेचा पुरस्कार करीत  स्वातंत्र्य व स्वायत्ततेचा नारा दिला, तेव्हापासूनचे आहे. ‘ओड टु द मदरलँड’ (‘मातृभूमीस..’) हे चिनी गीतकार वांग शेन यांचे गाजलेले देशभक्तिपर गीत ‘महान आणि सुंदर’ अशा ‘अमुच्या प्रिय गृहा’सारख्या चिनी भूमीचे वर्णन, ‘उच्च उन्नत शिखरे, विस्तीर्ण मैदाने, यांगत्सी आणि हुआंग नद्यांच्या दुथडीने’ असे करते आणि प्रत्येक चिनी नागरिकाची मानसिकता ही अशा अभिमानावर आधारलेली असते. चीन हा अपवादात्मकच मानणे म्हणजे, इतर कुणीही आम्हाला काही शिकवूच शकत नाही, असा पराकोटीचा विश्वास. चीन स्वत:च्याच शहाणपणाने चालणार आणि आपले प्रश्न आपणच सोडवणार, हा आग्रह चिनी नेते धरतात.

जगाकडे पाहण्याची चिनी राष्ट्रवादी दृष्टी ही इतिहासात पाहू जाता दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीला समांतर आहे. वांशिक श्रेष्ठत्ववाद आणि ‘आर्यन’ हे अपवादात्मकच आहेत असे मानण्यासाठी इतिहासाची साक्ष काढणे, हे सारे जर्मनीत घडत असल्याचे १९३० च्या दशकात जगाला दिसत होते. ‘सूदटेनलॅण्ड’ (दक्षिणतमभूमी) म्हणवल्या जाणाऱ्या व आज चेक प्रजासत्ताकाचा भाग असणाऱ्या जर्मन-भाषक प्रदेशावर हिटलरने कब्जा केला, तेव्हा उर्वरित युरोपीय देशांनी संघर्षांऐवजी नरमाईचे धोरण स्वीकारले. ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीसारखे देश जेव्हा म्युनिक करार साजरा करीत होते, तेव्हा रूझवेल्ट (अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष) दुरून सारे पाहत होते. ‘‘जगभरातील लाखो जन तुमच्या कृतीला मानवतेची एक ऐतिहासिक सेवाच मानतील, असे मला वाटते,’’ अशी स्तुतीही रूझवेल्ट यांनी केली होती.

ट्रम्प जागे झाले, पण..

मात्र यानंतर अवघ्या वर्षभरात, स्वत:च दिलेले ‘यापुढे एकही आक्रमण नाही’ असे वचन हिटलरने मोडले आणि दुसरे महायुद्ध सुरू झाले, हे आश्चर्यकारक म्हणता येणार नाही. त्या वेळी- सन १९३९-४० मध्ये ब्रिटन ज्या भूमिकेत होता, ती आज अमेरिकेची भूमिका आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता जागे झालेले दिसतात खरे, पण त्याआधी त्यांनी अमेरिकेच्या राज्यांमध्ये करोना विषाणूला थैमान घालू दिले. अगदी फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा दिवस (२९ तारीख) उजाडला तरीसुद्धा, साऊथ कॅरोलायना राज्यात ट्रम्प हे त्यांच्या समर्थकांपुढे भाषण करीत होते की, विषाणूचा अमेरिकेत फैलाव वगैरे इशाऱ्यांमध्ये विचलित होण्यासारखे काहीही नाही. माध्यमांनी ही ‘नवी अफवा’ पसरविली असून या माध्यमांनी आता ‘भयोन्माद’ वाढवू नये, असेही ट्रम्प म्हणाले होते. दुसरीकडे, ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ रस्ते प्रकल्पाच्या लाभांसाठी चीनला कवटाळणारी युरोपीय राष्ट्रे आता महासाथीशी झुंजण्याचे प्रयत्न करीत आहेत.

विशेष म्हणजे, या संसर्गाचा धोका परतवून लावण्यासाठी ज्या देशांनी कंबर कसली ते बहुतेक आशियातील लोकशाही देश आहेत. दक्षिण कोरियाने या मार्गावर आघाडी घेऊन, एका दिवसात अमेरिकेपेक्षाही अधिक करोना-चाचण्या केल्या. सिंगापूरनेही चाचण्यांचा वेग वाढवून विषाणूबाधेची चिन्हे शोधून काढण्याचा प्रयत्न प्रचंड प्रमाणावर केला. हाँगकाँग आणि तैवान यांना यापूर्वीच्या ‘सार्स’ या साथरोगातील बळींचा अनुभव असल्यामुळे त्यांनी करोनाशी लढण्यासाठी वेळीच पावले उचलून कार्यक्षमता दाखविली.

इस्लामद्वेष नव्हे, नवा वस्तुपाठ

दुसरीकडे भारताने, करोनाच्या आव्हानाशी लढण्यासाठी लोकशाही कार्यप्रवणता कशी वापरावी, याचा एक वस्तुपाठ जगाला घालून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने या लढाईत अग्रस्थानाचे नेतृत्व दिले. लोकांनीही पूर्ण सहकार्य केल्यामुळे टाळेबंदी आणि सामाजिक अंतर यांची अंमलबजावणी यशस्वी झाली. १३० कोटी लोकसंख्येच्या या देशात (ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार) २९,४५३ प्रत्यक्ष बाधित (अ‍ॅक्टिव्ह केसेस) आहेत. मोदी यांनी कोठेही मनमानी किंवा एकाधिकारशाही केलेली नाही, परंतु काही जण या कार्यपद्धतीविषयी मुद्दामच ‘इस्लामद्वेष’ वगैरे म्हणत चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा भडकाऊ वातावरणातदेखील मोदी यांनी शांत, समतोल वृत्ती आणि आशावाद यांचे दर्शन घडविले. मोदींनी सिद्धच केले की, लोकशाहीत जर द्रष्टे नेतृत्व असेल, तर उदारमतवादी मूल्यांशी तडजोड न करतासुद्धा हे प्रश्न सोडविता येतात.

आज जी नवी विश्वरचना जन्म घेऊ पाहते आहे, तीमध्ये भारत हा अमेरिका वा जर्मनीसारख्या अन्य देशांच्या सहकार्याने, ज्याला मोदी ‘मानवकेंद्री विकासासाठी सहयोग’ म्हणतात त्यावर आधारलेल्या जगाची बांधणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जसे ‘अटलांटिक चार्टर’ संमत झाले, तशा नव्या सामंजस्याची आज गरज असून पर्यावरण, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि लोकशाही उदारमतवाद हे त्याचे पायाभूत घटक असू शकतात.

चीन आज जगभरच तिरस्काराचा विषय ठरला असला आणि त्या देशांतर्गतही अस्वस्थता असली, तरीही चीनला अद्याप संधी आहेच. चिनी कम्युनिस्ट पक्षात ज्याला ‘लुक्षिआन दाउशेन्ग’ किंवा नेतृत्वसंघर्ष म्हणतात, त्याला काही जण निव्वळ सत्तासंघर्ष समजतील, पण प्रत्यक्षात पक्षाच्या नव्या भूमिकांसाठीचा तो संघर्ष असतो. असे प्रसंग भूतकाळातही बरेच आले होते. आजघडीला जगाने तशाच, परंतु आणखी भल्या भूमिकासंघर्षांची आशा चीनकडून ठेवावी काय?