24 January 2021

News Flash

अखंडत्वाचा संकल्प

भू-सांस्कृतिक एकक म्हणून भारताने आपली ओळख अध्यात्माधारित एकात्म दृष्टीमुळे टिकवली.

 

डॉ. मनमोहन वैद्य

सह-सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

भू-सांस्कृतिक एकक म्हणून भारताने आपली ओळख अध्यात्माधारित एकात्म दृष्टीमुळे टिकवली. हे वेगळेपण विश्वात ‘हिंदूत्व’ म्हणून ओळखले जाते.. सत्तेतून येणाऱ्या हेकटपणाऐवजी अखंडत्वाची प्रतीके जपावीत..

काही दिवसांपूर्वी मुंबईतील ‘कराची स्वीट मार्ट’ या दुकानाच्या मालकास एका दुकानाचे नाव बदलण्यासाठी धमकावण्यात आले. पाकिस्तान नेहमीच भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करीत असतो, म्हणून हे नाव बदलले पाहिजे असे या शिवसैनिकाचे म्हणणे होते. दुकानदाराने संघर्ष टाळला आणि कराची हे नाव कागद चिकटवून झाकले.

या घटनेपासून शिवसेना अधिकृत रूपात दूरच राहिली आहे असेही वाचनात आले. ही बातमी वाचल्यानंतर त्या शिवसैनिकाची क्षुद्र मनोवृत्ती, इतिहासाच्या माहितीचा अभाव आणि सत्तेमुळे आलेला उर्मटपणा पाहून दया आली.

भारताच्या इतिहासाची त्यांना थोडी जरी माहिती असती तर त्या दुकानदाराचे पूर्वज कोणत्या परिस्थितीत कराचीचा व्यवसाय सोडून भारतात येण्यास प्रवृत्त झाले याचे स्मरण झाले असते. त्यांच्यासारखे दहा नोकरही कदाचित कराचीतून पलायनाची असहाय अवस्था येण्यापूर्वी अशा व्यावसायिक घराण्यात काम करत असतील. हिंदू समाजाच्या आणि तत्कालीन भारतीय नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे किंवा असहायतेमुळे त्यांना आपल्याच देशात निर्वासितासारखे यावे लागले. अन्य कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब न करता त्यांनी आपला व्यवसाय उभा केला आणि देशाच्या समृद्धीत, नवरोजगारनिर्मितीत स्वत:चे योगदान दिले. सिंध, पंजाबातून आलेल्या या मंडळींनी कष्ट सहन करत करत देशाचे भांडार समृद्ध केले आहे. समाजातील सर्व वर्गाना आजही उपयोगी पडणाऱ्या अनेक शैक्षणिक आणि आणि व्यावसायिक संस्था-प्रतिष्ठाने उभारली आहेत. आपण जेथून आलो त्या स्थानाचे स्मरण करणे हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे, जेणेकरून योग्य वेळ आणि सामर्थ्य प्राप्त केल्यानंतर तेथे पुन्हा जाऊ शकू.

फाळणी कृत्रिम

१४ ऑगस्ट या दिवशी ‘अखंड भारत स्मृती दिन’ साजरा केला जातो. या वेळी भारताच्या फाळणीच्या करुण कहाण्या सांगितल्या जातात, पुन्हा एकदा अखंड भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला जातो. कदाचित ही गोष्ट त्यांना माहीत नसावी. योगी अरविंद हे फाळणीच्या वेळीच म्हणाले होते की, ‘ही फाळणी कृत्रिम आहे आणि कृत्रिम गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या नसतात. एक दिवस भारत पुन्हा एकदा अखंड होईल.’ आम्हाला असाहाय्यतेतून यावे लागले आणि आम्ही पुन्हा कराचीला जाणार आहोत असा संकल्प असणे हा काही गुन्हा नाही. येत्या पिढय़ांनाही या संकल्पाचे स्मरण राहावे म्हणून ‘कराची’ नाव ठेवणे चुकीचे नाही. इस्रायली लोक १८०० वर्षे आपल्या भूमीपासून दूर होते. दरवर्षी नववर्षांचे स्वागत करताना पुन्हा एकदा इस्रायलला जाण्याच्या संकल्पाचा ते १८०० वर्षे पुनरुच्चार करत राहिले आणि आज इस्रायल हा एक बलसंपन्न देश आहे.

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया आणि जिहादी शक्तींचे समर्थन करणाऱ्या, राष्ट्रविरोधी हेतूंना छुपी मदत करणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत, मुंबईतही आहेत. त्यांचे कार्य पाहून कोणाही देशभक्ताचे डोके अवश्य भणभणायला हवे होते. मुंबईच्या रझा अकादमीच्या सदस्यांनी शहीद स्मारकाला लाथा मारून नुकसान केल्याचा फोटो असाच होता. पण त्याचा कोणा ‘शिवसैनिका’ला राग आल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

भू-सांस्कृतिक एकक

‘अखंड भारत’ हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. हा राजकीय विस्तारवादाचा मुद्दा नाही हे प्रथम समजून घेतले पाहिजे. इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरू होण्यापूर्वी भारतात कोणा एकाच राजाचे राज्य नव्हते. तरीही भारत एक होता. भारत हे शतकांपासून भू-सांस्कृतिक एकक राहिले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपणा सर्वाना जोडणाऱ्या जीवनाच्या अध्यात्माधारित एकात्म आणि सर्वागीण दृष्टीमुळे भारताची एक वेगळी ओळख आणि व्यक्तिमत्त्व निर्माण झाले आहे. हजारो वर्षांपासून जगाला हे ज्ञात आहे. भारताची ही ओळख किंवा वेगळेपण हे विश्वात ‘हिंदुत्व’ म्हणून ओळखले जाते. एखाद्या राजकीय पक्षाची ‘हिंदुत्वा’ची असणारी घोषणा ही वेगळी बाब आहे. वास्तविक, या भू-सांस्कृतिक एकतेची ओळख असणाऱ्या हिंदुत्वाचे स्मरण राहिले तर या अशा हलक्या प्रतिक्रिया येणारच नाहीत. विख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ एंगस मेडिसनने आपल्या ‘वर्ल्ड हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक्स’ या शोधनिबंधात म्हटले आहे की, इसवी सनाच्या पहिल्या ते सतराव्या शतकापर्यंत जागतिक व्यापारात भारताचा सर्वाधिक (३३ टक्के) सहभाग होता. हेच ते भारताचे भू-सांस्कृतिक (एकक) क्षेत्र. दुसऱ्या शतकात ज्यू, सहाव्या शतकात पारसी आणि आठव्या शतकात सीरियन ख्रिश्चन भारताच्या विविध भूभागांमध्ये आश्रयासाठी आले. तेथील राजे वेगळे होते, लोक वेगवेगळ्या भाषा बोलत असत, वेगवेगळ्या देवीदेवतांची उपासना करीत असत. तरीही धार्मिक, भाषिक आणि वांशिक दृष्टीने परकीय असणाऱ्या पीडित आणि आश्रयार्थ आलेल्यांसोबत भारताचे वागणे एकसारखे, स्वागत-सन्मानाचे आणि स्वीकाराचे होते. कारण भारत भू-सांस्कृतिकदृष्टय़ा एक होता. हिंगळाज देवी मंदिर, ननकाना साहिब गुरुद्वारा आजच्या पाकिस्तानात, ढाकेश्वरी मंदिर आजच्या बांगलादेशात, पशुपतीनाथाचे मंदिर, सीतेचे जन्मस्थान जनकपुरी आजच्या नेपाळमध्ये आहे. रामायणाशी संबंधित कित्येक स्थाने आजच्या श्रीलंकेत आहेत. ब्रह्मदेश, श्रीलंका, तिबेट, भूतान अशा प्रदेशांत राहणाऱ्या बौद्ध धर्मीयांची श्रद्धास्थाने भारतात आहेत. भारतीय लोक कैलास-मानसरोवराची यात्रा कित्येक वर्षे करीत आहेत. या सर्व स्थळांची तीर्थयात्रा या भू-सांस्कृतिक एककात राहणारे लोक कित्येक वर्षे श्रद्धेने करीत आहेत.

इतकेच नव्हे तर भारतीय परिवारांतील मुलांच्या नामकरणातही या भू-सांस्कृतिक एकतेचे दर्शन आपल्याला घडते. कर्नाटकमधील एक कुटुंब गुजरातमध्ये राहात असे. त्यांच्या दोन मुलींची नावे सिंधू आणि शरयू अशी होती. शरयू नदी कर्नाटकात नाही आणि सिंधू नदी आजच्या भारतात नाही. पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करतो त्यामुळे तिथे वाहणाऱ्या नदीचे नाव तुम्ही ठेवू शकत नाही असे म्हणत त्यांच्या मुलीचे नाव बदलण्याची धमकी देण्यापर्यंतही एखादा पोहोचला असता.

२०१४ नंतरच्या  उल्लेखनीय हालचाली!

आज भारताच्या शेजारी देशांचा विचार केला तर लक्षात येते की भारताशी सांस्कृतिक संबंध नाकारून कोणताही देश सुखी नाही. या सर्व देशांचे सुख, त्यांची संपन्नता, सुरक्षा आणि शांतता ही भारतासोबत राहण्यातच आहे. कारण ते केवळ भारताचे शेजारी देश नाहीत, हे सर्व देश शतकांपासूनच्या भारताच्या भू-सांस्कृतिक एककाचा अविभाज्य भाग होते. परंतु ते प्रत्यक्ष साकारण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. २०१४ नंतर भारताच्या या दृष्टीने करण्यात आलेल्या हालचाली उल्लेखनीय आणि आश्वासक आहेत.

२०१४च्या शपथग्रहण समारंभात सर्व शेजारी देशांच्या प्रमुखांची उपस्थिती व त्यानंतर सर्वानी मिळून आर्थिक शक्तीच्या रूपात उभे राहण्यासाठी आवश्यक परस्पर साहाय्याकरिता भारताने केलेल्या हालचाली जगाने पाहिल्या आहेत. या सर्वाचे राजकीय अस्तित्व कायम ठेवून भू-सांस्कृतिक एकक म्हणून भाव मजबूत केला तर ते पूर्वीप्रमाणेच एक आर्थिक शक्ती म्हणून उभे राहील. आजच्या पाश्चिमात्य तथाकथित विकसित देशांमधील आर्थिक समृद्धी ही अत्याचार, लूट आणि गुलामीच्या अमानवी व्यापारावर आधारित आहे असे इतिहास सांगतो. परंतु लूट, अत्याचार, जबरदस्ती जमिनीवर कब्जा करणे हा भारताच्या या भू-सांस्कृतिक एककाच्या क्षेत्राच्या आर्थिक संपन्नतेचा आधार कधीच नव्हता. अमेरिकेत राहणारे चीनचे राजदूत हु शी (१८९१-१९६२) यांनी म्हटले आहे की, भारताचा २००० वर्षे चीनवर ताबा होता, तोसुद्धा एकही सैनिक न पाठवता.

त्रिनिदाद ते जमैका..

कॅरेबियन देशांमध्ये १५० वर्षांपूर्वी मजुरी करण्यासाठी इंग्रजांनी भारतीय मूळ असणारे लोक पाठवले. त्रिनिदाद, गयाना, सुरिनाम, जमैका आणि बार्बाडोस अशा देशांनीही भू-सांस्कृतिक एकक या नात्याने एकत्र ओळख अबाधित ठेवली आहे. त्यांचा इतिहास फार प्राचीन नाही, पण इतिहासबोध एक आहे. म्हणूनच शासनव्यवस्था, चलन, सैन्य हे सर्व वेगवेगळे असूनही एक भू-सांस्कृतिक एकक क्षेत्र म्हणून त्यांच्या काही बाबी एकसमान, परस्परपूरक आहेत, एकमेकांच्या देशात जाण्यायेण्याच्या सुलभ सोयी आहेत.

भारताच्या भू-सांस्कृतिक एककाचा इतिहास हजारो वर्षे जुना, आर्थिक समृद्धीचा, सांस्कृतिक संपन्नतेचा, मानवी दिशादर्शक अशा दीपस्तंभासारखा आहे. या बृहद-भारतास पुन्हा एकदा तेच स्थान प्राप्त करून द्यायचे असेल तर या भू-सांस्कृतिक एककाचा विसर होता कामा नये. स्थळे, व्यक्ती यांच्या नावाद्वारे त्यांच्या स्मृती जतन करणे आवश्यक आहे. क्षुद्र मानसिकता, इतिहासाच्या माहितीचा अभाव व सत्तेपायी आलेला  हेकटपणा या सगळ्याचा निषेध करताना, त्याला विरोध करताना उपाय करत या भू-सांस्कृतिक एकतेस स्मरत तिला गौरव आणि पुन्हा श्रेष्ठ स्थान प्राप्त करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करणे आवश्यक आहे.

लेखातील सर्व मते वैयक्तिक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:09 am

Web Title: article on integrity resolution abn 97
Next Stories
1 संबंधांच्या फेरमांडणीचे आव्हान
2 ‘हिंदू-प्रशांत’ धोरणाचा प्रवास
3 नवप्रकल्पांतून नवसंजीवनी..
Just Now!
X