07 July 2020

News Flash

जीवदान देणारी टाळेबंदी

करोना महामारीला रोखण्यात प्रमुख उपाययोजना म्हणून टाळेबंदी करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स या देशांनी टाळेबंदी (लॉकडाऊन) करूनही, अमेरिकेतील मृतांची संख्या एक लाखांहून अधिक; या देशांपैकी सर्वात कमी बळी स्पेनमध्ये २७ हजारांहून अधिक आहेत. हे भीषण वास्तव लक्षात घेता, भारताने टाळेबंदी योग्य वेळी जाहीर केली आणि त्याचा परिणामही चांगलाच झाला, हे मान्य केले पाहिजे..

करोना महामारीला रोखण्यात प्रमुख उपाययोजना म्हणून टाळेबंदी करण्यात आली. भारतात झालेल्या टाळेबंदीच्या उपाययोजनेचे जगाने कौतुक केले आहे. तसेच करोना महामारीच्या संकटाविरुद्ध संपूर्ण जग एकवटले आहे. जगातील सर्व राष्ट्रांनी करोनाविरुद्धच्या लढय़ात भारताला अग्रस्थानाचा मान दिला असल्याचे आज जगात चित्र आहे. ही अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिनंदनास पात्र आहेत.

साथीच्या रोगावर प्रतिबंध म्हणून टाळेबंदीची उपाययोजना जगात पहिल्यांदाच करोना महामारीला रोखण्यासाठी चीन, स्पेन, इटली आदी देशांमध्ये करण्यात आली. भारतातही पहिल्यांदाच ‘टाळेबंदी (लॉकडाऊन)’ हा शब्द सामान्यजनांच्या कानी पडला. ‘भारत बंद’चे आवाहन अनेकदा जनतेने ऐकले आहे, अनुभवले आहे. पण एखाद्या साथरोगाला अटकाव करण्यासाठी संपूर्ण देशात लागू झालेली टाळेबंदी हा प्रकार पहिल्यांदाच भारतीय जनतेने अनुभवला. त्याच वेळी, जगातील अनेक देश टाळेबंदी पहिल्यांदाच अनुभवत होते. आता टाळेबंदीचे निर्बंध उठविण्याची सुरुवात झाली असून त्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. पाचवी टाळेबंदी म्हणजे टाळेबंदीचे निर्बंध उठविणारा पहिला टप्पा ठरला आहे. आता आणखी दोन टप्प्यांत आपल्या देशातून टाळेबंदी उठविण्यात येईल असा अंदाज आहे. तरी करोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करताना करण्यात आलेल्या टाळेबंदीचे महत्त्व सदैव अनन्यसाधारण राहणार असून सदैव संस्मरणीय राहणार आहे.

विळखा तोडण्यात यश!

करोना महामारीने जगात मृत्यूचे थैमान घातले असताना टाळेबंदी भारतीयांना जीवदान देणारी ठरली आहे. संपूर्ण भारतात योग्य वेळी टाळेबंदी लागू करून करोना संसर्गाची महासाथ रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आले आहे. टाळेबंदी केली नसती तर भारतात लक्षावधी लोक करोना महामारीमुळे मृत्युमुखी पडले असते.

कोविड-१९ या विषाणूमुळे महामारीच्या स्वरूपात जगावर महासंकट उभे राहिले. भारतालाही या महामारीचा विळखा पडणे स्वाभाविक होते. पण भारतात योग्य वेळी टाळेबंदी लागू केल्याने करोनाच्या साथीचा विळखा तोडण्यात भारताला यश आले आहे. आजही जगात ७१ लाखांहून अधिक लोक करोनाग्रस्त (अ‍ॅक्टिव्ह केसेस) आहेत. जगातील १९० देश करोना महामारीच्या संकटात सापडले आहेत. जगभरातील चार लाख सहा हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आतापर्यंत भारतात अडीच लाख लोक करोनाबाधित झाले आहेत, तसेच करोनामुळे भारतात आतापर्यंत सुमारे सात हजार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. करोना संकटाचा सामना करताना अमेरिका (१,१२,४८९ मृत्यू), तसेच युरोप खंडामधील ब्रिटन (४०,५४२ मृत्यू), इटली (३३,८९९), फ्रान्स (२९,१५५), स्पेन (२७,१३६ मृत्यू) या प्रगत राष्ट्रांमध्ये झालेल्या मनुष्यहानीच्या तुलनेत भारतात स्थिती चांगली नियंत्रणात आहे. यामुळेच जगातील अनेक राष्ट्रांनी करोना रोखण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी टाळेबंदी लागू करून करोना महामारीची साथसाखळी तोडली आहे.

करोना रोगामुळे जगभरात आजवर बळी गेलेल्यांची संख्या इतकी आहे की, एवढे बळी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही गेले नव्हते. जगातील १९० देश करोनाविरुद्ध युद्ध लढत असून हे जणू तिसरे विश्वयुद्ध ठरले आहे. या तिसऱ्या विश्वयुद्धात जगाचे नेतृत्व भारत करीत आहे असे आज चित्र आहे. करोनाला रोखण्यासाठी भारताने उत्कृष्ट उपाययोजना केल्याबद्दल जग भारताचे कौतुक करीत आहे.

करोना महामारीच्या प्रभावी मुकाबल्यासाठी आवश्यक औषधांचा कच्चा माल भारतात उपलब्ध आहे. त्याचा पुरवठा जगातील अनेक राष्ट्रांना भारताने केला. भारत सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे आयुर्वेदिक घरगुती काढे, औषधे, हळद-दूध यांच्या सेवनाचे सल्ले देण्यासोबत आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथीच्या औषधाचेही वाटप केले. कोविड-१९ विषाणूची बाधा होऊ नये यासाठी दोन हात शारीरिक अंतर ठेवा; मुखपट्टी (मास्क) वापरा; सॅनिटायझर वापरा; साबणाने हात स्वच्छ धूत राहा, या खबरदारीच्या उपायांचा प्रचार-प्रसार भारतात घराघरांपर्यंत करण्यात आला. भारताने करोना महामारीला रोखण्यात संपूर्ण जगात सर्वात श्रेष्ठ प्रभावी प्रयत्न केल्यामुळे जगाने भारताचा गौरव करणे स्वाभाविकच होते.

नुकताच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यकारी मंडळाच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान भारताला प्रदान करण्यात आला असून भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पक नेतृत्वाखाली भारताने करोनाशी लढाई सुरू केली, तसेच त्याआधी ‘आयुष्मान भारत’सारखी आरोग्य क्षेत्रातील धोरणे आखली, यामुळेच हे पद भारताला मिळू शकले.

‘गो करोना, गो..’ने वाढवलेले मनोबल

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या विशाल देशात एकाच वेळी टाळेबंदी लागू करून ती यशस्वी करणे प्रचंड अवघड काम आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कल्पक नेतृत्वाच्या कौशल्याने ते यशस्वी केले. पंतप्रधान मोदींनी करोना महामारीचा अजगर भारताभोवती विळखा घालणार हे ओळखले आणि ते रोखण्यासाठी त्यांनी देशव्यापी टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम २२ मार्च रोजी देशभर एक दिवसाची जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) जाहीर केली. ही जनसंचारबंदी प्रचंड यशस्वी झाली. त्यातून जनतेला टाळेबंदीसाठी मानसिकरीत्या तयार करण्यात आले. जनता संचारबंदीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता सर्व देशाने थाळीनाद केला. त्यातून देश एकसंध आहे हे दिसून आले. एकजुटीने करोनाविरोधात लढण्याची एकजुटीची भावना प्रत्येकाच्या मनात अधिक दृढ झाली. प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक म्हणून, राष्ट्र म्हणून एकजुटीने करोनाविरोधातील लढाई लढण्यास उद्युक्त झाल्यामुळेच टाळेबंदी यशस्वी झाली. त्याचप्रमाणे, ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजता दिवे लावून ही राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत अधिक प्रखर तेजाने तळपू लागली. त्या रात्री ‘गो करोना, गो..’ ही मनोबल वाढवणारी घोषणा देशभरच्या गावागावांत दुमदुमली. करोनाविरोधातील भारत देशाचे युद्ध टाळेबंदीच्या माध्यमातून लढत असताना त्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्कृष्टपणे केले. टाळेबंदीच्या काळात त्यांनी ‘मन की बात’मधून भारतीयांशी संवाद साधत करोनाविरुद्धचा लढा अधिक प्रभावी केला. त्यातून ७० दिवस कोणतेही अनुचित प्रकार न होता भारतीय जनतेने टाळेबंदी यशस्वी केली आणि अजूनही टाळेबंदीचे पालन होत आहे.

आता आत्मनिर्भरतेकडे..

टाळेबंदीच्या काळात गरिबांसाठी पॅकेज जाहीर करून नि:शुल्क आणि अल्प दरात अन्नधान्य रेशनिंग दुकानांद्वारे देण्यात आले. या काळात उद्योगधंद्यांचे झालेले नुकसान, आर्थिक विश्वाची झालेली हानी भरून काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटी रुपयांचे महापॅकेज जाहीर करून ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची घोषणा केली आहे. करोनामुळे होणारी जीवितहानी टाळेबंदीमुळे वाचली आहे; तसेच करोनामुळे झालेली आर्थिक-औद्योगिक हानी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या २० लाख कोटी महापॅकेजमुळे भरून निघणार आहे.

करोना महामारीच्या संकटात टाळेबंदीमुळे भारतीयांना जीवदान मिळाले असून टाळेबंदीने शिकविलेले नियम यापुढेही नेहमीच पाळून आपल्या जीवनशैलीत बदल घडवू या. टाळेबंदीच्या आठवणी कडूगोड असल्या तरी इतिहासात टाळेबंदीची नोंद भारतीयांना जीवदान देणारी म्हणून होणार आहे हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 12:09 am

Web Title: article on life saving lockdown ramdas athawale abn 97
Next Stories
1 स्वस्थ-सुदृढ भारतासाठी!
2 पोलिसांसाठी, जनतेसह!
3 ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यासाठी..
Just Now!
X