अनिल देशमुख

Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
Good availability of betel leaf from overseas at affordable rates
परराज्यांतील पानांमुळे विड्यांना रंग; जाणून घ्या… कुठून येतात राज्यात पाने?
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

महाराष्ट्राचे गृहमंत्री

टाळेबंदीच्या दोन महिन्यांहून अधिक काळात राज्यातील रहिवाशांची काळजी वाहणाऱ्या पोलिसांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यांना संसर्गबाधा होऊ नये, यासाठी सरकार पावले उचलते आहे आणि जनतेचे सहकार्यही हवेच आहे..

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी आहे. या काळात राज्याचा गृहविभाग आपल्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या घोषवाक्याला अनुसरून अहोरात्र कार्यरत आहे, याचा मला अभिमान आहे. संपूर्ण देशात २५ मार्चपासून करोना प्रतिबंध करण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आणि ती अजूनही सुरू आहे. करोनाचा प्रभाव लक्षात घेता, ही टाळेबंदी आता ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली. टाळेबंदीमुळे नागरिक मोठय़ा प्रमाणात अस्वस्थ झाले आहेत. काही ना काही कारणांनी ते घराबाहेर पडत आहेत. महत्त्वाच्या कामाखेरीज त्यांनी रस्त्यावर येऊ  नये यासाठी पोलीस २४ तास रस्त्यांवर उभे राहून रस्त्यांवरील गर्दीचे नियंत्रण करीत आहेत. पोलीस कर्मचारी हेदेखील तुमच्या-आमच्यासारखे माणूसच असून त्यांनाही कुटुंब आहे. राज्याचे संपूर्ण पोलीस दल हे एक मोठे कुटुंबच असून गृहमंत्री या नात्याने मी त्याचा कुटुंबप्रमुख आहे. या टाळेबंदीमध्ये मी स्वत: मुंबईसह १८ जिल्ह्य़ांत भेटी देऊन त्या ठिकाणी कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. ते करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. या जिल्ह्य़ांमध्ये त्या-त्या ठिकाणचे विभागीय आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, इतर अधिकारी, बहुतेक जिल्ह्य़ांमध्ये तेथील पदाधिकारी यांच्यासह करोनासंदर्भात आढावा बैठक घेतली.

‘संकटकाळी खऱ्या मित्राची ओळख होते’ म्हणतात; तसेच आमच्या पोलिसांनी आपल्या कृतीतून पोलीस हा जनतेचा खरा मित्र व हितचिंतक असल्याचे दाखवून दिले आहे. यापुढेही ते त्यांची सेवा याच निष्ठेने आणि समर्पणाच्या भावेनेने देत राहतील, याची मला पूर्णत: खात्री आहे. मी आवर्जून हे सांगतो की, मुंबईसह महाराष्ट्रातील सव्वादोन लाख पोलीस बांधवांनी, गेले दोन महिने कामाचे तास, सुट्टी, प्रवासाची सोय-गैरसोय, कामावर येण्या-जाण्याकरिता असलेल्या वाहतुकीच्या अडीअडचणी या कशाचीही पर्वा न करता, अथक परिश्रम करून आपल्या कठोर कर्तव्याचा नवा आदर्श महाराष्ट्रातील जनतेसमोर निर्माण के ला आहे. याचा आम्हा सर्वाना अभिमान आहे. दिवसा कडक ऊन झेलून पोलीस दल आपले कर्तव्य कमालीच्या निष्ठेने पार पाडत आहे. तसेच रात्रीची गस्तही अत्यंत काटेकोरपणे अमलात आणली जाते. कुठेही हयगय न करता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. काही ठिकाणी किरकोळ अपवादात्मक बाबी घडल्या असतील, त्या मी नाकारत नाही; पण प्रामुख्याने आमचे पोलीस प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्याची नोंद संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे.

मला पूर्ण जाणीव आहे की, या आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलातील प्रत्येकावर कामाचा ताण पडलेला आहे. पण पोलीस न डगमगता, कशाबद्दलही, कसलीही तक्रोर न करता अथकपणे आपले कर्तव्य चोख व जबाबदारीने पार पाडत आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. पोलिसांवर आलेला ताण लक्षात घेता, राज्य शासनाने केंद्रीय राखीव पोलीस दलाची मदत घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानुसार केंद्राला विनंती करण्यात आली. त्याला तात्काळ प्रतिसादसुद्धा मिळाला. आता केंद्रीय पोलीस दलाच्या काही तुकडय़ा राज्यात दाखल झाल्या असून, त्या प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर, मालेगाव, अकोला, अमरावती या लाल क्षेत्रांत तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध शहरांमध्ये असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांतसुद्धा या तुकडय़ांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य पोलीस दलाला मदत व दिलासा मिळाला आहे. शेवटी हे युद्ध आहे व ते सर्वाना मिळून लढावे लागणार आहे.

अतिशय दु:खद अंत:करणाने मला हे नमूद करावे लागत आहे की, करोनाविरुद्धच्या या लढाईत आमच्या काही पोलीस योद्धय़ांना आपला जीव गमवावा लागला. यात एक अधिकारी व ११ कर्मचारी आहेत. त्या सर्वाना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

मी अशी ग्वाही देतो की, आमच्या पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कु टुंबाच्या मागे महाराष्ट्राचे गृह खाते व महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्रातील जनता ठामपणे उभी आहे. या आजाराचा मुकाबला करताना दुर्दैवाने जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांस दहा लाख पोलीस कल्याण निधीतून आणि पाच लाख अ‍ॅक्सिस बँक आणि ५० लाख राज्य सरकार असे एकंदर ६५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. राज्य सरकारचे ५० लाख रुपये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करून घेतले आहेत. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावीत असताना हजारपेक्षा जास्त पोलीस बंधू-भगिनी यांना करोना विषाणूचा संसर्ग झाला असून ते करोनाशी लढत आहेत. तब्येत ठीक झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरत आहेत. मी पोलीस दलातील प्रत्येकाला हे सांगू इच्छितो की, पोलिसांचा जीव हा आमच्यासाठी सर्वोच्च आहे, म्हणून स्वत:ची काळजी घ्या. राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी करोना पार्श्वभूमीवर विविध सुविधा देण्यात येत आहेत.

पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाने प्रामुख्याने पुढील बाबी केल्या आहेत. राज्यातील पोलिसांना विविध कोविड रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार मिळावेत, याकरिता एक कोविड हेल्पलाइन पूर्ण राज्यात जिल्हानिहाय सुरू करण्यात आली. या हेल्पलाइनद्वारे तज्ज्ञांकडून समुपदेशन व मार्गदर्शन केले जाते. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी ही जिल्हानिहाय एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड, हॅण्ड ग्लोव्ह्ज, ड्रोन कॅमेरा अशा आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलिसांसाठीदेखील अशाच आवश्यक वस्तू मोठय़ा प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत. याखेरीज बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी अल्पोपाहार व पॅकबंद पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात येते. पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तूंची कमतरता पडू नये, म्हणून कोविड-१९ प्रतिबंधात्मक वस्तूंच्या खरेदीकरिता पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत. पोलीस बांधवांना करोनाविरुद्ध लढण्यासाठी, त्यांची प्रतिबंधात्मक शक्ती वाढावी तसेच शारीरिक क्षमता टिकून राहावी यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक औषधांचे वाटपदेखील करण्यात येत आहे. कोविडबाधित पोलिसांना पोलीस कल्याण निधीतून एक लाख रुपयाची अग्रिम रक्कम दिली जात आहे. कोविडसंदर्भात साधनसामग्री घेण्याकरिता राज्यात पोलीस विभागाला ११ कोटी रुपयांचे अनुदान कार्यालयीन खर्चापोटी देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र पोलीस कुटुंब योजनेंतर्गत कोविड-१९ उपचार राज्यातील नामांकित रुग्णालयांत करण्यात येत आहेत.

कोविडबाधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत घटक प्रमुखांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत याकडेही लक्ष आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाशीदेखील संवाद साधला जातो. ५० वर्षांवरील १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना जनतेशी संपर्क येईल अशी कोणतीही कामे दिली जात नाहीत. तसेच ५५ वर्षांवरील २३ हजार पोलिसांना कोणत्याही प्रकारे पगारात कपात न करता रजा घेण्याची परवानगीदेखील देण्यात आलेली आहे. कोविडसंदर्भात काही लक्षणे दिसल्यास अथवा शंका आल्यास मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या सहकार्याने दोन ठिकाणी ताप तपासणी केंद्रेदेखील सुरू केली आहेत. या ठिकाणी पोलीस व त्यांचे कुटुंब येऊन तपासणी करू शकतात.

पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सुविधांमध्ये कोणतीही कसर न सोडण्याचा प्रयत्न गृहविभागामार्फत, शासनामार्फत होत आहे. नागरिकांनीदेखील पोलिसांना योग्य ते सहकार्य करून करोनाविरुद्धच्या लढय़ात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन मी करतो.