News Flash

वेगवान उत्क्रांती..

देशवासीयांना आता माहीत आहे की, ‘मोदी है तो मुमकिन है’. हाच तो आत्मविश्वास, जो पुढे जाण्यास कारणीभूत होतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्राणवायू संयंत्राचे उद्घाटन (संग्रहित, ‘पीआयबी’ छायाचित्र)

गजेन्द्रसिंह शेखावत (केंद्रीय जलशक्ती मंत्री)

नळजोडण्या वा सांडपाणी असो की प्राणवायू किंवा चाचणी-प्रयोगशाळांची उपलब्धता.. आकडय़ांची प्रचंड झेपच मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात घेतलेली दिसेल; कारण आधीची सारी सरकारे परिस्थितीशरण होती पण मोदी सरकार हे स्वच्छ हेतूने, आत्मविश्वासपूर्ण पावले टाकत देशाची सांस्कृतिक आणि बौद्धिक उत्क्रांती करणारे आहे..

असे म्हणतात की, इतिहास म्हणजे मानवी उत्क्रांतीची, उन्नतीची नोंद असते (इंग्रजी भाषेतील ‘इव्होल्यूशन’ या शब्दाला आपल्या हिंदी आणि अन्य भाषांत उत्क्रांती आणि उन्नती असे दोन शब्द आहेत). उन्नती ही मानवाने आपल्या आयुष्यात सुधारणा केल्याशिवाय होऊ शकत नाही, किंबहुना आयुष्य हे आपले आपण घडवायचे आहे याची जाणीव ज्यांना आहे ते उन्नती केल्याशिवाय राहात नाहीत! इतिहासाची वाटचाल एरवीही काळासह सुरूच असते पण उन्नतीच्या संधी कधीकधी काळच अचानकपणे देत असतो. काही घटनाक्रम असे घडतात की माणूस बदलतो, आधी कधी घडले नव्हते असे बदल होतात! अशीच एक घडामोड २०१४च्या मे महिन्यात घडली होती, तिचा सातवा वर्धापन दिन आपण साऱ्यांनी नुकताच साजरा केला.. ही घटना म्हणजे अर्थातच, केंद्रात झालेला सत्तापालट. मोदी सरकारची सात वर्षे हा उन्नतीचा काळ राहिला आहे. ही उन्नती जशी नव-भारताची आहे तशीच ती आत्मनिर्भरतेची उन्नती आणि अंत्योदयाचीही उन्नती आहे. ‘कमीत कमी सरकार, जास्तीत जास्त शासकता’ची (मिनिमम गव्हर्न्मेट, मॅग्झिमम गव्हर्नन्स) देखील उन्नतीच आहे. मोदी सरकारच्या या सुपरिचित घोषणांमधून या सरकारच्या  प्राधान्यक्रमांचा आराखडा स्पष्टपणे दिसून येतो. मोदी सरकारची यशोगाथा लिहिण्यासाठी एखाद्या लेखाची जागा पुरणारी नाहीच, त्यामुळे विस्तारभयास्तव येथे केवळ या कामाच्या एकाच वैशिष्टय़ाकडे लक्ष देऊ. हे वैशिष्टय़ म्हणजे- वेगवान उन्नती!

ज्या झपाटय़ाने देशभरच्या घरोघरी नळांमधून पाणी येऊ लागले, त्याचे वर्णन करण्यासाठी ‘वेगवान उन्नयन’ किंवा ‘वेगवान उन्नती’खेरीज दुसरा कोणता चांगला शब्दप्रयोग करू शकतो का आपण? आधीच्या ७० वर्षांत फक्त साडेतीन कोटी घरांनाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असे, परंतु गेल्या अवघ्या २१ महिन्यांतच साडेचार कोटी घरांपर्यंत नळजोडण्या पोहोचल्या आहेत. हे सरकार सत्तेवर आले, तेव्हा आपली अर्थव्यवस्था १.८५ ट्रिलियन डॉलरचीच होती, तीही ५५ वर्षांनंतर! पण मोदी सरकारने अवघ्या पाचच वर्षांत या अर्थव्यवस्थेमध्ये आणखी एक ट्रिलियन डॉलरची भर घातली. ‘जन धन योजने’मुळे देशातील ४२ कोटी लोकांनी प्रथमच बँक खाते उघडले. ही बँक खाती हे मोठेच पायाभूत काम ठरते, कारण या खात्यांच्या पायावरच २०१४ पासून आतापर्यंत १५.४७ लाख कोटी रुपये थेट लाभार्थीपर्यंत जाऊ शकले आहेत.

देशातील सांडपाणी व्यवस्थेचे काम ३८.७ टक्के झालेले होते, ते पाचच वर्षांमध्ये १०० टक्क्यांवर गेले. स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) आठ कोटी जोडण्या देऊन या सरकारने, महिलांना स्वयंपाकघरातील धुराच्या त्रासापासून मुक्ती दिली. सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ योजनेमुळे आजतागायत २५.५ अब्ज संगणकीकृत व्यवहार झालेले असून, डिजिटल व्यवहारांच्या विश्वात भारताला ध्रुवासारखे अढळपद मिळालेले आहे. ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)’मुळे बांधल्या गेलेल्या घरांची संख्या १.९४ कोटी आहे आणि आरोग्य विम्यासाठी वाटप झालेल्या ‘आयुष्मान भारत कार्डा’ची संख्या तर १५.९ कोटी असून यापैकी १.८ कोटी लोकांनी तर कुठल्या ना कुठल्या दुखण्यामुळे, आजारामुळे या योजनेचा लाभही घेतलेला आहे.

सरकारच्या यशाची, कामाची, उपलब्धींची ही यादी बरीच मोठी आहे; परंतु महत्त्वाचा प्रश्न असा की, भारतात मूलभूत बदल असा काय घडून आला? नोकरशाही तर पूर्वीचीच आहे, लोकही तेच आहेत, राज्यघटना तीच असून घटनात्मक जबाबदाऱ्या आणि दायित्वेही बदललेली नाहीतच, मग या देशात बदलले तरी काय? साधे उत्तर असे की, आधीच्या सरकारांप्रमाणे सत्तेतच समाधान मानून जेवढय़ास तेवढे काम करणारे हे सरकार नव्हे! उदाहरणार्थ, कामगारांसाठीचे ४४ निरनिराळे कायदे आणि त्यांमधील १,४५८ उपकलमे यांचे सुसूत्रीकरण करण्यापासून आधीच्या सरकारांना काही कोणी अडवले नव्हते, पण फक्त चारच कायदे आणि ४८० कलमे अशा प्रकारे या सुसूत्रीकरणाचे काम याच सरकारने केले.. जणू हे सरकार येईपर्यंत हे काम थांबूनच राहिले होते!

ज्या ‘चलता है’ प्रवृत्तीने भारताला फार काळ ग्रासले होते, ती या सरकारला अजिबात खपणारी नाही. या प्रवृत्तीमुळे देश कसा मागे पडला, याची उदाहरणे अनेक देता येतील. ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ निर्देशांकाच्या यादीतील १४२वे स्थान कुणालाच खुपले नाही किंवा गंगा नदी किती प्रदूषित झाली आहे हेही कधी कोणाला दिसलेच नाही, कारण ही ‘चलता है’ प्रवृत्ती. मोदी सरकारमुळे या प्रवृत्तीला थारा उरलेला नाहीच, उलट स्वच्छ हेतूंनी, आत्मविश्वासपूर्णरीत्या पुढे जाण्याची सवय आता रुजलेली आहे. देशवासीयांना आता माहीत आहे की, ‘मोदी है तो मुमकिन है’. हाच तो आत्मविश्वास, जो पुढे जाण्यास कारणीभूत होतो. आज देशातल्या लोकांना असा विश्वास आहे की, त्यांचे हित हेच सरकारने हृदयस्थ केलेले आहे.. ‘साफ नियत, सही विकास’.

हाच तो आत्मविश्वास, जो यापूर्वी या देशाला कधीही मिळाला नव्हता, मग ते ‘स्टार्टअप’- नवउद्यम- असोत की राष्ट्रीय सुरक्षा. याच आत्मविश्वासात सरकारने थेट गळशीर पकडून ‘अनुच्छेद ३७०’ रद्दबातल ठरविले आणि अखेर त्या भागात शांतता प्रस्थापित झाल्याचे तेथील जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकांतून दिसून आले. नवउद्यमांचे आगर किंवा ‘स्टार्टअप हॉटस्पॉट’ अशी जगामध्ये भारताची ख्याती आता होते आहे. हाच तो आत्मविश्वास, जो भारतातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आता दिसून येतो. कारण, नशिबाच्या हवाल्यावर अवलंबून राहाणे, परिस्थितीचे शिकार होणे हे आता आपण थांबवलेले आहे. अगदी आताच्या, कोविडच्या परिस्थितीतही आपण परिस्थितीला शरण जाणे नाकारलेच.

आज भारत स्वत:च्या देशात लस-निर्मिती तर करतो आहेच, पण आधीच्या तुलनेत महत्त्वाच्या फरकाची बाब म्हणजे, कालसुसंगत असे एक सुनिश्चित ‘लस-धोरण’ आता आपल्याकडे आहे. या लस-धोरणामुळेच तर आपण याआधीच २६ कोटी लस-मात्रा दिलेल्या आहेत आणि येत्या डिसेंबपर्यंत सर्वच्या सर्व लोकसंख्येचे लसीकरण हे लक्ष्य आपण ठेवू शकतो आहोत. ही देशासाठी ऐतिहासिक उपलब्धी ठरणार आहे. आपण आपल्या देशामधील चाचणी-प्रयोगशाळांची संख्या एकवरून २,४६३ पर्यंत वाढवली; २३ मेपर्यंत- म्हणजे साधारण महिन्याभरापूर्वीच- आपण १५,००० मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा करू शकलो; ५०,००० कृत्रिम श्वसनयंत्रे (व्हेन्टिलेटर) निर्माण करू शकलो आणि अतिदक्षता-सज्ज रुग्णशय्यांची (आयसीयू बेड्स) संख्या २,१६८ वरून ८१,००० अशी वाढवू शकलो. देशाला घेरून टाकू शकणारे असे संकट आपल्यापुढे असताना आपण अजिबात मागे हटलो नाही, जराही वाकलो नाही!

मानववंशशास्त्रज्ञांचे असे मत आहे की, मानवामध्ये बुद्धीचा विस्तार हा पुढे मानवी उत्क्रांतीला किंवा उन्नतीला कारणीभूत ठरला. मानवप्राणी आपल्या बुद्धीने आपल्या शारीरिक दौर्बल्यावर मात करू शकला, म्हणून तर या भौतिक जगावर मानव राज्य करू लागला. कल्याणकारी योजनांच्या झपाटय़ासह सात वर्षे पूर्ण करून आता पुढली वाटचाल करणाऱ्या या सरकारनेसुद्धा, आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक उत्क्रांतीचा वेग वाढविला आहे. हेच या सरकारचे ऐतिहासिक असे कार्य ठरेल, त्यासाठीच हे सरकार पुढल्या काळातही लक्षात राहील आणि वर्तमानकाळात, लोकांच्या प्रेमादराचा विषय राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 1:01 am

Web Title: bjp leader gajendrasinh shekhawat article about development in narendra modi government zws 70
Next Stories
1 उद्याच्या महाराष्ट्राचा पक्ष
2 खरिपासाठी राज्य सज्ज..
3 भ्रष्टाचारमुक्त नव्या भारताकडे
Just Now!
X