दिलीप वळसे पाटील (गृहमंत्री* , महाराष्ट्र राज्य)

महाविकास आघाडीच्या सरकारसाठी संवादाचा पूल ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने बांधला. यापूर्वीही सत्तेवर असताना ग्रामविकासाला, शेतीपूरक विकासाला या पक्षाने प्राधान्य दिले. बदनामीच्या मोहिमा समाजमाध्यमांतून जरूर चालतात, परंतु आरोप करणाऱ्यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही.. यापुढेही हा पक्ष अनेक पातळ्यांवर कार्यरत राहून सामान्य माणसांच्या अडचणी निवारण्याला प्राधान्य देईल..

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनिमित्त झालेला विराट मेळावा, ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक ऐतिहासिक घटना होती. महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेल्या शरद पवार यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतर पुढील वाटचाल स्वतंत्रपणे करण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा वाटचालीसाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता होती; त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. परंतु एका राजकीय पक्षाची स्थापना एवढय़ापुरतीच ती घटना मर्यादित नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून उभा राहिलेल्या आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेतून घडलेल्या महाराष्ट्राचे वैभव, प्रतिष्ठा वाढवण्याची ही सुरुवात होती. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा टिकवून ठेवण्यासाठीची पराकाष्ठा होती.

अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतीय राजकारणाने एक वेगळे वळण घेतले होते. समाजाला धार्मिक ध्रुवीकरणाकडे घेऊन जाणारे राजकारण शिरजोर होऊ पाहात होते. पुरोगामी महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारधारेपासून तोडण्याचे प्रयत्न होत होते, ते रोखण्याची आवश्यकता होती. देशाच्या पातळीवरही प्रबळ बनलेल्या या शक्तींना रोखण्याची आवश्यकता होती. काँग्रेसपासून वेगळे होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर धर्मनिरपेक्ष राजकारणाचा प्रवाह क्षीण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु दोन्ही काँग्रेसनी स्वतंत्र निवडणुका लढवल्यानंतर लगोलग काँग्रेससोबत सरकार स्थापन करून सगळ्या शंकांना तिलांजली दिली गेली. महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष पक्षांच्या राजकारणाची पुनस्र्थापना केलीच, परंतु नंतर देशाच्या पातळीवरही तीच दिशा कायम ठेवली.

महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे, दीड वर्षांपूर्वी ही गोष्ट अनेकांना अविश्वसनीय वाटत होती. परंतु अविश्वसनीय वाटते, तेच प्रत्यक्षात आणण्याची क्षमता आणि कौशल्य शरद पवार यांच्याकडे आहे. केंद्रातल्या सत्तेच्या बळावर भाजपने संख्याबळ नसतानाही अनेक राज्यांत फोडाफोडी, सरकार पाडापाडी करून सत्ता स्थापन केली. परंतु महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले, याचे श्रेय नि:संशयपणे शरद पवार यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके योगदान काय, असा प्रश्न विचारणाऱ्यांना सांगावेसे वाटते, की राष्ट्रवादी काँग्रेसने संवादाचा पूल बांधला, म्हणून महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. सीएए आणि एनआरसीच्या मुद्दय़ावरून देशभरात अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना महाराष्ट्रात साधा ओरखडाही उमटला नाही, हे केवळ महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्यामुळेच घडू शकले, हे लक्षात घ्यावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेनंतर लगेचच सत्तेत आला. सत्तेचे फायदे असतात तसेच तोटेसुद्धा असतात. १९९९ ते २०१४ अशी पंधरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेत राहिला. काँग्रेस हा देशपातळीवरील मोठा पक्ष असल्यामुळे सरकारचे नेतृत्व काँग्रेसकडे राहिले, तरी सरकारचा प्रभाव पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीच आघाडीवर राहिले. त्याच बळावर २००४च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करण्यात आले. आधी आर. आर. पाटील आणि नंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासामध्ये महाराष्ट्र देशपातळीवर आघाडीवर राहिला. केंद्राच्या पातळीवरचे अनेक पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले. शौचालय बांधणीच्या कामात देशपातळीवर महाराष्ट्राने आघाडी टिकवली. ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात निकोप आणि निरोगी वातावरण निर्माण केले. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वार्थाने प्रगतिपथावर गेलेला दिसतो. गुटखाबंदी, डान्सबारबंदी असे धाडसी निर्णय आम्ही घेतले. विविध शेतीपूरक व्यवसाय, राज्यातील वाढलेले औद्योगिकीकरण, आधुनिक शेतीला प्रोत्साहन व चालना, फलोत्पादन, कृषीमाल प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन व चालना, पाणलोट क्षेत्र विकास, ग्रामीण विकास, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे सहकारी संस्थांचे जाळे, तंत्रशिक्षणाची सोय, महिला सक्षमीकरणासाठीचे विशेष धोरणात्मक निर्णय, जादूटोणा विरोधी कायदा, सर्व समाज घटकांना समान न्यायाची भूमिका अशी सरकारच्या कामाची मोठी यादी देता येईल. महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासाची दखल अन्य राज्यांनी व देशाने घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे इथे कर्तृत्वाला संधी मिळते. मी राजकारणात येण्याच्या आधीपासून पवार आणि वळसे-पाटील कुटुंबीयांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तेव्हापासून मी त्यांची कार्यशैली जवळून पाहतो आहे, छोटय़ातल्या छोटय़ा घटकावर त्यांचे बारीक लक्ष असते. क्षमतेनुसार कार्यकर्त्यांना ते संधी देत असतात. कार्यकर्त्यांचे वैचारिक प्रबोधन व्हावे, यासाठीही ते सातत्याने आग्रही असतात.

मी वर उल्लेख केल्याप्रमाणे सत्तेचे फायदे असतात तसेच तोटेही असतात. सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांसाठी काम करीत असताना संघटना बांधणीकडे तेवढय़ा प्राधान्याने लक्ष दिले गेले नाही. शिवाय पंधरा वर्षांच्या सलग सत्तेमुळे ‘अँटी-इन्कबन्सी’ही होती. तशात भाजपने नव्याने उपलब्ध झालेल्या समाज माध्यमांचा दुरुपयोग करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून बदनामीची मोहीम राबवली. २०१४च्या निवडणुकीत त्याचा राजकीय फायदा भाजपला झाला, मात्र त्यांनीच विरोधात असताना केलेल्यांपैकी एकही आरोप त्यांना सिद्ध करता आलेला नाही हेही लक्षात घ्यावे लागेल. आताही पुन्हा तेच धोरण पुढे राबवताना राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी मोहिमांवर मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामध्ये त्यांना तात्पुरते यश येत असल्याचे चित्र दिसत असले तरी ते फार काळ टिकणार नाही, याची मला खात्री आहे.

एकीकडे विरोधक बदनामीचा एककलमी कार्यक्रम राबवत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र करोनाकाळात अनेक पातळ्यांवर कार्यरत राहून सामान्य माणसांच्या अडचणी निवारण्याला प्राधान्य देत आहे. यामागे अर्थातच शिकवण आहे, ती आमचे नेते शरद पवार यांची. ६० टक्के समाजकारण आणि ४० टक्के राजकारण ही त्यांची शिकवण आहे. त्यामुळेच एकीकडे विरोधक राजकारणग्रस्त होऊन रोज नवनवे आरोप करीत असताना आमच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विचलित न होता, सेवाकार्यात व्यग्र आहेत. यातून राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीचे प्रशिक्षण होत आहे, जी उद्याच्या महाराष्ट्राचे आशास्थान आहे. पवारसाहेबांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत तरुण नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे आणि आजसुद्धा त्यांचे आणि पक्षाचेही नव्या कर्तबगार तरुण कार्यकर्त्यांकडे लक्ष असते. राष्ट्रवादी काँग्रेस हा २२ वर्षे वयाचा पक्ष आजच्या महाराष्ट्राचा प्रमुख पक्ष आहेच; परंतु उद्याच्या महाराष्ट्राचा पक्ष म्हणून त्याची जडणघडण व्हावी, असे प्रयत्न अनेक आघाडय़ांवर सुरू आहेत.

* या लेखातील मते वैयक्तिक असून पक्षाच्या नुकताच साजरा झालेल्या वर्धापनदिनानिमित्त तो लिहिला गेला आहे.