प्रकाश जावडेकर

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री

मोदीजींनी आधीच योजना आखली, तपशीलवार नियोजन केले, अचूकपणे सराव केला आणि म्हणूनच, इतर अनेक प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताला ‘कोविड-१९’ संकटाचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य झाले..

समाजमाध्यमांची ताकद ओळखून त्याचा योग्य वापर करणारे पहिले राजकीय नेते असल्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले जाते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या यशासाठी त्यांनी समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर केला; त्यानंतरही समाजाला प्रेरणा देण्यासाठी आणि समाजासमोर सद्य:स्थिती ठेवण्यासाठी त्यांनी या साधनांचा उपयोग केला. ‘मन की बात’ या सर्वात लोकप्रिय कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी नभोवाणी माध्यमाचाही प्रभावी उपयोग केला.

जेव्हा चीनमध्ये करोना विषाणूचा संसर्ग झाला, तेव्हाच- डिसेंबर महिन्यातच- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोना विषाणू संसर्गाच्या साथीचा धोका जाणवला होता, हे मी खात्रीने सांगू शकतो. त्या वेळी भारतात कोणालाही हा संसर्ग झाला नव्हता. ३० जानेवारी २०२० या दिवशी भारतात करोनाचा पहिला बाधित आढळला; मात्र मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीनंतर ते आम्हाला सांगत होते की, ‘हा करोना विषाणू वा त्याचा संसर्ग चीनपुरता मर्यादित राहणार नाही. तो सर्वत्र पसरेल. हे फार गंभीर आहे आणि सर्वच जण त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे भारताने स्वत:ला सज्ज केले पाहिजे..’ भारताने देशात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासणीला सुरुवात केली, नंतर त्याची व्याप्ती वाढवली आणि काही दिवसांनंतर संसर्गाचा धोका वाढल्यामुळे हवाई आणि रेल्वे प्रवासही थांबविण्यात आला. संशयित प्रवाशांना मानेसर येथे गृह मंत्रालयाच्या सुविधालयात ठेवण्यात आले. त्या वेळी, पुढे स्थिती किती गंभीर होईल, हे आमच्या लक्षात आले. त्या दिवसापासून त्यांनी कोविड-१९ विरोधात लढा देण्यासाठी भारताला सज्ज करण्याची योजना अमलात आणण्यास सुरुवात केली.

कोविड-१९ साठी समर्पित रुग्णालयांची संकल्पना अस्तित्वात नव्हती. आजघडीला आपल्याकडे कोविड-१९ साठी समर्पित अशी सुमारे ७०० रुग्णालये आहेत. त्यात दोन लाखांहून जास्त अलगीकरण खाटा (बेड्स) उपलब्ध असून १५ हजार अतिदक्षता खाटा उपलब्ध आहेत.

कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वैयक्तिक सुरक्षा आच्छादने (पीपीई) आवश्यक असतात. भारतात हे अंगरखे उपलब्ध नव्हते. त्यामुळे सुरुवातीला आयातीची मोठी मागणी नोंदविण्यात आली. आजघडीला देशातील ३९ कारखान्यांत अशा आच्छादनांचे उत्पादन घेतले जाते. आतापर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त पीपीई संच वितरित झाले आहेत.

‘एन-९५’ वगळता भारतात कोणत्याही मास्कचे उत्पादन होत नव्हते. आजघडीला भारतात ६० लाख मास्क वितरित करण्यात आले आहेत. अनेक नव्या कारखान्यांत ‘एन-९५’ मास्कचे उत्पादन केले जात आहे, तसेच अनेक लहान एककांमध्ये सर्वसामान्यांच्या वापरासाठी घरगुती स्वरूपाचे मास्क तयार करणे व शिवण्याचे काम सुरू आहे.

तपासणीसाठी आपल्याकडे केवळ एक प्रयोगशाळा होती, जी पुण्यात होती. दररोज केवळ चार हजार चाचण्या शक्य होत्या. आजघडीला चाचण्या करून निकाल सांगणाऱ्या सुमारे ३०० प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. आज आपण दिवसाला ८० हजारांहून जास्त चाचण्या करू शकतो. आपल्याकडे केवळ ८,४०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध होते. सुरुवातीच्या काळात नोंदवलेल्या मागणीसह आता आपल्याकडे सुमारे ३० हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. भारतीय उत्पादकांनी व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करायला सुरुवात केली आहे आणि देशांतर्गत ३० हजार व्हेंटिलेटर्सचे उत्पादन अपेक्षित आहे.

या दरम्यान आपले पंतप्रधान सतत जगाच्या संपर्कात राहिले, त्यांनी विविध नेत्यांशी संवाद साधला, अनुभवांची देवाणघेवाण केली, एकमेकांकडून शिकले आणि उपयुक्त वाटणारी प्रत्येक गोष्ट त्यांनी अमलात आणली. त्याचबरोबर, त्यांनी टाळेबंदीचा आणि त्याच्या परिणामांचा विचार केला. म्हणूनच त्यांनी गरिबांसाठी एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे भरघोस पॅकेज जाहीर केले. भारतात सर्वात मोठा अन्नसुरक्षा कार्यक्रम अस्तित्वात आहे, त्याद्वारे समाजातील सर्वात असुरक्षित आणि गरीब अशा साधारण ८० कोटी लोकांना दोन/तीन रुपये प्रति किलो दराने पाच किलो गहू/तांदूळ दिले जातात. आता एप्रिल, मे आणि जून महिन्यांत, या सर्वाना प्रति व्यक्ती १५ किलो तांदूळ/गहू तसेच तीन किलो डाळ मोफत देण्याचे त्यांनी ठरवले आहे. याद्वारे प्रत्येक घरात अन्नधान्य असेल, याची काळजी त्यांनी घेतली.

कमी उत्पन्न गटातील २० कोटी महिलांच्या जनधन खात्यांत पुढचे तीन महिने प्रत्येकी दरमहा ५०० रुपये थेट लाभ हस्तांतरणातून जमा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ८.४ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रु. इतकी रक्कम थेट जमा करण्यात आली. उज्ज्वला योजनेतील आठ कोटी लाभार्थीना तीन एलपीजी सिलेंडर मोफत देऊ केले आहेत. कोविड-१९ शी लढण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली; या सुविधेचा लाभ घेत सुमारे नऊ लाख कामगारांनी अंदाजे ३६ कोटी रु. निधीतून काढले.

मालक व कामगार यांचे भविष्य निर्वाह निधीचे तीन महिन्यांचे योगदान सरकारतर्फे जमा केले जाईल, असे आश्वासन देत मोदींनी लहान उद्योगांना तसेच कामगारांनाही मदतीचा हात दिला आहे. ही रक्कमसुद्धा फार मोठी आहे. रेपो दरासंबंधी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून रिझव्‍‌र्ह बँकेनेही चार लाख कोटी रुपयांची तरलता प्रदान केली आहे. मासिक हप्ते (ईएमआय) व इतर अनिवार्य रकमा जमा करण्याची मुदत वाढवण्याची सुविधा मध्यमवर्गीयांना देण्यात आली आहे.

कोविड रुग्णांच्या समर्पित उपचारांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटी रुपये प्रदान केले असून राज्य आपत्ती निवारण निधीसाठी ११ हजार कोटी रुपये जारी केले आहेत. बांधकाम कामगारांच्या साहाय्यासाठी ३१ हजार कोटी रुपये जारी करण्यात आले असून सर्व राज्यांना ते तातडीने वितरित करण्यास सांगितले आहे. कृषी उत्पादने शेतीपासून बाजारापर्यंत पोहोचावी, यासाठी पंतप्रधानांनी आवश्यक खबरदारी घेतली आहे. कृषी-आधारित अर्थव्यवस्था सुविहित राहावी, यासाठी कृषिमालाची जलद ने-आण, पेरण्यांच्या क्षेत्रात वाढ, विक्रमी उत्पादन आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे प्रदान करणे या बाबी लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी त्यांनी पावले उचलली.

टाळेबंदी हा फार मोठा निर्णय आहे. लोक स्वेच्छेने सहभागी होईपर्यंत टाळेबंदी कधीही यशस्वी होणार नाही. पंतप्रधानांनी लोकांशी सतत संवाद साधला. समाजातील गरिबांनाही असे वाटते की, पंतप्रधान त्यांच्या प्रगतीसाठी काम करीत आहेत आणि त्यांची काळजी घेत आहेत. अशा पद्धतीने पंतप्रधान सर्वसामान्यांना टाळेबंदीसाठी, त्यामुळे बंद राहणाऱ्या कामांसाठी आणि त्यामुळे उद्भवणारा ताण सोसण्यासाठी मानसिकदृष्टय़ा तयार करू शकले आहेत. २२ मार्च रोजी लोकांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे त्यांनी जाहीर केले. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या या देशात ९९ टक्के लोकांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळला आणि तो प्रचंड यशस्वी ठरला. कोविड-१९ चा मुकाबला करणाऱ्या सर्वाना अभिवादन करण्यासाठी त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता थाळ्या, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवाव्यात, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. जनतेला कोविड-१९ विरोधात एकत्रितपणे लढा देण्याची प्रेरणा देण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी हे खरोखर उपयुक्त ठरले.

सुरक्षेसाठी चार सोप्या गोष्टी त्यांनी सांगितल्या : (१) मास्क वापरणे, (२) हात नियमितपणे धुणे, (३) सामाजिक अंतर राखणे आणि (४) घरामध्ये राहणे. आतापर्यंत लोकांनी मोठय़ा प्रमाणात या बाबींचे पालन केले आहे. समाजातील अनेक घटक अजून शिकत आहेत आणि त्यांच्या वर्तनात बदल दिसून येत आहेत. त्यानंतर त्यांनी रात्री ९ वाजता लोकांना ९ मिनिटे दिवे लावायला सांगितले आणि या उपक्रमातही संपूर्ण देश उत्साहाने सहभागी झाला. झोपडपट्टीवासीयांनी, इतकेच काय तर बेघर नागरिकांनीही दिवे उजळले. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘आम्ही मोदींमुळेच वाचलो आहोत, त्यामुळे आम्ही त्यांचे सांगणे ऐकतो.’ पंतप्रधान सतत संवाद साधत राहिले. करोनायोद्धय़ांना आकाशातून आणि जलातून अभिवादन करण्याचा नवा आणि अभिनव उपक्रम त्यांनी ३ मे रोजी राबविला. ते एक विलोभनीय असे दृश्य होते, ज्याने लोकांना प्रेरित केले.

अशा प्रकारे, मोदीजींनी आधीच योजना आखली, तपशीलवार नियोजन केले, अचूकपणे सराव केला, प्रभावीपणे संवाद साधला, जगाला सोबत घेतले आणि म्हणूनच, इतर अनेक प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताला कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे शक्य झाले.