01 April 2020

News Flash

स्वच्छताक्रांती थांबणार नाही..

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वातून स्वच्छतेच्या क्षेत्रात देशाला नवी दिशा दिली.

परमेश्वरन अय्यर (केंद्रीय पेयजल व सांडपाणी व्यवस्थापन मंत्रालयाचे सचिव)

महात्मा गांधींनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाकडे त्यांच्या पूर्वसुरींनी डोळेझाक  केली, परंतु पंतप्रधान मोदी यांनी लोकांची गरज ओळखली, त्यामुळे गेल्या पाच वर्षांत भारताने स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांती केली..

सरकारने गेल्या पाच वर्षांत देशात हागणदारीमुक्तीच्या क्षेत्रात मोठे काम करून दाखवले. त्याला लोकसहभागाचीही जोड होती. आपला देश २०१४ पर्यंत हागणदारीमुक्तीत जगात मोठा भागीदार होता. आज स्वच्छता क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा दीपस्तंभासमान देश म्हणून तो मान्यता पावला आहे. महात्मा गांधी यांनी खुल्यावर शौचाच्या असभ्य व अस्वच्छ पद्धतीविरोधात रणशिंग फुंकले होते. आज देश हागणदारीमुक्त करण्याच्या त्यांच्या स्वप्नाची पूर्तता होत आहे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वातून स्वच्छतेच्या क्षेत्रात देशाला नवी दिशा दिली. महात्मा गांधींनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाकडे त्यांच्या पूर्वसुरींनी डोळेझाक  केली; परंतु पंतप्रधान मोदी यांनी अगदी तळागाळातील व मागास भागांतील लोकांची गरज ओळखून हागणदारीमुक्तीला प्राधान्य दिले, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या पाच वर्षांत भारताने स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांती केली असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. जगानेही या स्वच्छता कामगिरीवर मान्यतेची मोहोर उमटवली आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांना ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने गौरवण्यात आले. बिल गेट्स फाऊंडेशनच्या वतीने अमेरिकेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यातून भारताच्या विकासात्मक कार्यक्रमात स्वच्छतेच्या मुद्दय़ाला अग्रक्रम देणे किती महत्त्वाचे होते हे स्पष्ट होते.

म. गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षांच्या निमित्ताने बहुतांश राज्यांत हागणदारीमुक्तीच्या घोषणेसाठी चढाओढ आहे. स्वच्छ भारत अभियान व हागणदारीमुक्ती योजना या लोकसहभाग व स्थित्यंतरात्मक विकासाच्या पातळीवर कशा यशस्वी ठरल्या याचा वेध घेणे त्यामुळेच उचित ठरावे. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या योजनेत भारतातील स्वच्छता क्रांतीचे चार प्रमुख घटक निश्चित करण्यात आले; ते जगातील कुठल्याही मोठय़ा प्रमाणातील स्थित्यंतराच्या प्रयोगास लागू आहेत.

यात पहिला मुद्दा आहे राजकीय नेतृत्वाचा. स्वच्छ भारत अभियानात पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे व्यक्तिगत राजकीय भांडवल पणाला लावले हे विशेष. त्यांचे नेतृत्व व वचनबद्धता यांचा प्रभाव राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवरही पडला, याशिवाय मुख्य सचिवांपासून ते जिल्हाधिकारी तसेच अगदी सरपंच पातळीपर्यंत लोकांवर परिणाम होऊन ते स्वच्छ भारत अभियानात हिरिरीने उतरले. सर्व पातळ्यांवरच्या नेत्यांनी या प्रदीर्घ स्थित्यंतरात निर्णायक भूमिका पार पाडली.

सार्वजनिक वित्तीय मदतीनेही यात मोठी भूमिका पार पाडली. कुठल्याही मोठय़ा योजनेला पैसा लागतोच. सरकारने या योजनेसाठी एक लाख कोटींची तरतूद करून स्वच्छतेची हमी घेतली. ही अर्थसंकल्पीय तरतूद करताना मोठी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्यात आली. ज्या १० कोटी कुटुंबांपैकी ९० टक्के कुटुंबांना स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध झाली आहे ती कुटुंबे सामाजिक व आर्थिक कमकुवत गटातील आहेत. त्यांना स्वच्छतागृहे बांधण्यासाठी मदत देण्यात आली.

कुठलीही मोठी योजना भागीदारीशिवाय यशस्वी होत नाही. स्वच्छ भारत अभियानही याला अपवाद नाही. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) योजनेत अंमलबजावणी करणारे लोक व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विकास संस्था, प्रसारमाध्यमे, नागरी समुदाय, वलयांकित व्यक्ती (सेलेब्रिटीज) यांचा समावेश होता. अनेक विभाग व मंत्रालये यात आघाडीवर राहिली. त्यांनी त्यांच्या खात्यांतून सहा अब्ज डॉलर्सची तरतूद या योजनेसाठी केली. ‘घरोघरी स्वच्छतागृह’ हे एकच उद्दिष्ट त्यांनीही समोर ठेवले. स्वच्छता हा त्यामुळे सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय बनला.

अशा योजनांमध्ये लोकसहभागही महत्त्वाचाच असतो. स्वच्छता अभियान (ग्रामीण) योजनेत पाच दशलक्ष स्वच्छाग्रही, प्रेरणाकर्ते यांनी खेडय़ातील वर्तनात बदल घडवून आणले. सामान्य लोकांनी असामान्य भूमिका पार पाडून इतरांनाही स्वच्छतागृहांचा वापर करण्याची प्रेरणा दिली. स्वच्छतेच्या क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्या लोकांच्या कथा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या. लोकांच्या विचारांना साद घालूनच अशा मोहिमा यशस्वी होतात. त्यातूनच स्वच्छ भारत अभियान ही जनचळवळ झाली.

स्वच्छ भारत अभियानात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे चार घटक आपण पाहिले. त्यातून या अभियानास एक दिशा मिळाली, गती आली. प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणीही जास्त कार्यक्षम पद्धतीने झाली. भारतात अनेक मोठय़ा योजनांत नेहमी हीच उणीव राहत असते ती यात दूर करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी या योजनेत काही लक्ष्ये ठरवून दिली, त्यासाठी २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. कालमर्यादा घालून दिल्यामुळे या योजनेला एक गती व उत्तरदायित्व मिळाले. त्यातून राज्यांनी झटून काम केले. जर आपल्याला २ ऑक्टोबपर्यंत उद्दिष्ट गाठता आले नाही तर चांगल्या कामात मागे पडल्याचा शिक्का बसेल या धाकातून त्यांनी चांगले काम केले.

लोकांचा चमू बांधणे हे एक आव्हान यात होते. कुठलीही योजना यशस्वी करण्यासाठी समर्पित व्यक्तींचा संच असावा लागतो. स्वच्छ भारत योजनेत नवी दृष्टी असलेल्या तरुणांनी काम केले. सर्जनशील उत्तरातून कुठलीही गोष्ट साध्य करणे शक्य असते. त्यासाठी प्रशासकीय अवडंबर कमी केले पाहिजे हा वेगळा दृष्टिकोन होता. तरुण व्यावसायिकांनी त्यांच्या अनुभवातून काम केले. नोकरशहा व अगदी सामान्य लोकांनीही यात समर्पित भावनेने काम केले. एखाद्या योजनेची आराखडा प्रक्रिया ठरवताना त्यांची व्यवहार्यता बघावी लागते. वेगवेगळी प्रारूपे तयार करून त्यातील अंमलबजावणीस सोपे प्रारूप कोणते हे बघितले जाते. ग्रामीण भागासाठी दोन शोषखड्डे आराखडा उपयुक्त ठरला. त्यामुळे महागडी प्रारूपे बाद झाली. प्रारूप राबवताना राज्यांना काही मुभा देऊन लवचीकता ठेवली होती. त्यातून त्यांनी स्थानिक गरजा पाहून बदल केले.

प्रशासकीय व्यवस्थेवरचा विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असते. त्यात काही झटपट बदलही दिसणे गरजेचे असते. सुरुवातीला यात जे सहजसाध्य आहे अशी उद्दिष्टे पार पाडण्यात आली. स्वच्छतागृहांची सोय मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेले जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा पहिला क्रम ठरवण्यात आला. त्यातून दृश्य परिणाम जरा वेगाने दिसले. त्यातून इतरांना प्रेरणा मिळाली, त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास वाढला. यशासारखे यश दुसऱ्या कशालाच मिळत नाही तसे झाले.

योजनेची अंमलबजावणी करणारे लोक यात महत्त्वाचे ठरले, त्यांनी ती यशस्वी केली. प्रत्येक राज्याला वेळोवेळी भेटी देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांनी चर्चासत्रांतून इतरांशी संवाद साधला. अनौपचारिक मेळावे झाले, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चा झाली. आरोग्यासाठीची स्पर्धा वाढीस लागली. त्यातून स्थानिक अभिनवतेला वाव मिळाला. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण कार्यक्रमात माध्यमे, बॉलीवूड अभिनेते, लोकप्रिय संस्कृती, क्रीडापटू या जनमानसाची पकड घेणाऱ्या घटकांनीही मोलाचे काम केले. योजना काळात स्वच्छतेचा मंत्र त्यांनी सतत जागता ठेवला. प्रत्येक टप्पा साजरा करण्यात आला, त्यातून लोकांच्या मनात या योजनेचे महत्त्व कायम ठसत राहिले.

अद्याप हे काम संपलेले नाही. अलीकडे आम्ही दहा वर्षांसाठीचे स्वच्छता धोरण जाहीर केले आहे, त्यात यापुढे, हागणदारीमुक्तीच्या पलीकडे जाऊन स्वच्छता करण्यावर भर दिला आहे. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) योजनेतील उद्दिष्टे साध्य केली तरी ती टिकवण्यासाठीही काम करावे लागेल. सर्व खेडय़ांना घन व द्रव कचरा व्यवस्थापन सुविधा द्याव्या लागतील. १५ ऑगस्टला पंतप्रधानांनी पाइपमधून पाणी २०२४ पर्यंत सर्व कुटुंबांना पुरवण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. स्वच्छ भारत अभियानात हे उद्दिष्ट गाठून एक मानाचा तुरा खोवता येईल. काही वर्षांपूर्वी जे शक्य वाटत नव्हते ते भारताने करून दाखवले. शो मस्ट गो ऑन..

(या लेखात व्यक्त झालेली सर्व मते ही  लेखकाची वैयक्तिक मते आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:13 am

Web Title: sanitation in india swachh bharat abhiyan india becomes open defecation free zws 70
Next Stories
1 वाढता विश्वास, वाढत्या आकांक्षा!
2 वाढीव दंडाची तरतूद जनहितासाठीच!
3 अखंड संघर्षरत..
Just Now!
X