बैजयंत ‘जय’ पांडा

भाजपचे उपाध्यक्ष

मोदींच्या विरोधकांनी मोदींविरुद्ध गोबेल्ससारख्या खोटय़ा प्रचारतंत्राचा हल्ला जितका केला, तितका स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणाही राजकीय नेत्यावर झालेला नाही. विरोधकांवर मात करतानाच स्वातंत्र्योत्तर काळात मोठय़ा सुधारणा घडवणारे आणि जागतिक प्रभाव असलेले नेते होणे मोदी यांना कसे साधले?

भारताच्या राजकीय अवकाशात दृढपणे उभे राहिलेले नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे केवळ माझे मत आहे असे नाही, तर ते सत्यही आहेच. सर्वानीच- मग ते मित्र असोत की शत्रू, तज्ज्ञ असोत वा नवशिके- सर्वानीच ते मान्यही केलेले आहे. या नेतृत्वाने अलीकडेच मुख्यमंत्री ते पंतप्रधान या अथक प्रवासाच्या विसाव्या वर्षांत पदार्पण केले त्यानिमित्त आजही, त्यांच्या नेतृत्वाचा उत्कर्ष आणि सातत्य यांमागची कारणे समजून घेणे उचित ठरेल.

भाजपच्या कार्यात अधिकृतपणे  १९८७ मध्ये आले, तोवर मोदींनी एक प्रचारक म्हणून नाव कमावलेले होते. तल्लख बुद्धी, मौल्यवान सूचनांतून प्रकट होणारे त्यांचे व्यूहात्मक विचार हे त्यांच्या करिष्म्याचे कारण होते. मात्र तरीही ते फार माहीत नव्हते, तेव्हा त्यांची निवड गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी होणे ही अग्निपरीक्षा ठरली आणि अगदी मोजकेच नेते अशा दिव्यातून बाहेर पडू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.

मोदींच्या विरोधकांनी मोदींविरुद्ध गोबेल्ससारख्या खोटय़ा प्रचारतंत्राचा हल्ला जितका केला, तितका स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणाही राजकीय नेत्यावर झालेला नाही. पण या असल्या प्रचारकंडय़ांकडे दुर्लक्ष करून मोदींच्या असामान्य धैर्यामुळे त्यांची उंची वाढतच राहिली. त्या वेळी मुख्य धारेतले मानल्या जाणाऱ्या चित्रवाणी वाहिन्यांनीही मोदी यांच्यावर हल्लेच चढवले. तरीही मोदींची लोकप्रियता वाढली, राजकारण आणि शासकता या दोहोंवर मोदींची पकड अधिकाधिक घट्ट होत गेली.

जास्तीत जास्त मतदारांच्या वतीने बोलणारे, आधुनिक सुखसोयींसह प्राचीन परंपरांचाही अभिमान बाळगणाऱ्या नव भारताची उभारणी करणारे, हे नेतृत्व आहे. सेक्युलॅरिझम आणि लिबरॅलिझम यांच्या नावाखाली भारतामध्ये लांगूलचालनाचे धोरण आणि भीती पसरवणारे राजकारण चालले होते. हा त्या संकल्पनांचा अवमानच होता. याविरुद्ध मोदी यांनी सतत आवाज उठविला. आज भारतात अशी परिस्थिती आहे की, ‘त्रिवार तलाक’सारख्या प्रथा बंद करण्याची राजकीय इच्छाशक्ती स्वत:ला सेक्युलर किंवा लिबरल म्हणवणाऱ्यांकडे नव्हतीच, पण या मंडळींनी ज्याच्यावर फक्त टीकाच केली, त्यांच्याकडे ती आहे.

परिस्थितीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता तरुणपणापासूनच मोदींमध्ये दिसली. कौटुंबिक पाश तोडून त्यांनी शोध सुरू केला आणि हेतूच्या या शोधात त्यांना तो सापडलादेखील. हा प्रवास अनेक आदर्शवादी तरुणांना हवाहवासा वाटतो, पण हे अनेक जण जे करू शकत नाहीत, ते मोदींनी केले.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींवरील एकाही खटल्याने त्यांना दोषी ठरविलेले नाही, लोकांच्या मनातही त्यांच्याबद्दल आदरच आहे आणि तो वाढतोच आहे, हे दिसून येत होते. असे असतानाही मोदीविरोधकांनी सतत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, हे मोदीसमर्थकांना आवडले नाही. अशा काळात मोदी यांनी राज्यावरील पकड कायम ठेवलीच, पण देशभर तितकाच पाठिंबा मिळवण्याची मोहीमदेखील सुरू केली.

अन्य कुणाला एवढय़ावर समाधान वाटले असते. कदाचित गुजरातचेच वादातीत नेते ठरण्याच्या योजनेवर बहुतेकांनी धन्यता मानली असती. मात्र मोदी यांनी त्यांची प्रतिमा ‘विकासपुरुष’ अशी करण्याचे ठरवले आणि त्यात ते यशस्वीसुद्धा झाले. हे काही रातोरात झाले नाही आणि ते सहजसाध्यही नव्हते. आधी अनेक  कोपऱ्यांतून – अगदी काही उद्योजक आणि उद्योजक-संघटनांकडूनही – असलेला विरोध सहन करत, प्रवाहाविरुद्ध त्यांना काम करावे लागले. सावकाशीने परंतु निश्चितपणे मोदींनी निर्णायकता, गुंतवणुकीचे स्वागत, त्यासाठी जुनाट अडथळ्यावर चौकटीबाहेरचे उपाय (उदाहरणार्थ, अखंडित वीजपुरवठा), या गुणांचे दर्शन घडवले- तेही भ्रष्टाचाराचा शिंतोडादेखील न उडता. त्यामुळेच, मुख्यमंत्री असतानाच एक कर्तबगार नेते अशी त्यांची कीर्ती जगभर पसरू लागली.

देशातील एका तपापूर्वीची राजकीय स्थिती पाहता, मोदीच कधी ना कधी राष्ट्रीय पातळीवरील नेते होणार हे जणू अटळच असल्याची खूणगाठ अनेकांनी बांधलेली होती. ती लोकांनाही उमगली, कारण तत्कालीन सत्ताधारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत फसत होते तसेच गटबाजी आणि दरबारी राजकारणात मश्गूल होते. स्वत:च अल्पसंख्याक समाजातील असलेल्या त्या वेळच्या पंतप्रधानाने देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा असल्याचे उद्गार जेव्हा काढले, तेव्हा मात्र हद्द झाली.

त्याच वेळी दुसरीकडे दीर्घकाळ मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द असलेल्या मोदींमुळे करिष्मा, वैयक्तिक प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुशासन यांचे दर्शन घडत होते. हे नेतृत्व सडेतोड बोलणारे होते. राजकारणातील घराणेशाहीच्या विरुद्ध, वैधानिक किंवा वास्तव मोहल्ल्यांमधील लोकांचे जे लाड चालत होते त्याविरुद्ध स्पष्ट बोलणारे आणि राष्ट्रवादाचा उद्घोष करून नव-भारताची चुणूक दाखवणारे होते. या अशा परिस्थितीत आणि तयारीच्या संगमातूनच पुढे ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास’ आणि ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅग्झिमम गव्हर्नन्स’ या घोषणांनी आकार घेतला.

आधीचा कित्येक काळ सुरक्षितपणे सत्ता भोगणाऱ्यांचे बस्तान मोदींमुळे उठल्यानंतर, जणू काही आपले विश्वच उद्ध्वस्त झाल्याप्रमाणे या विरोधकांनी केलेला थयथयाटही आज आठवून पाहायला हवा. सुधारणा विनाविलंब घडून याव्यात यासाठी मोदींनी केलेले प्रयत्न (उदाहरणार्थ- भूसंपादन कायदा) एकदा हाणून पाडल्यानंतर विरोधक सोकावल्यासारखे प्रत्येक निर्णयात खोडा घालण्याचा प्रयत्न करू लागले. या विरोधकांनी मोदींच्या घोषणांची टिंगल केली आणि वर मोदी सुधारक नाहीतच अशीही टीका केली.

तरीसुद्धा मोदींनी सुधारणा घडवल्याच. त्याही अगदी प्रतिकूल परिस्थितीत. ‘जीएसटी’ ही या देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातली कदाचित सर्वात मोठी अशी सुधारणा आहे जी एका निर्णयाने घडून आली. निश्चलनीकरणाला बदनाम करण्याचा कितीही जरी प्रयत्न झाला असला, तरी निश्चलनीकरणामुळेच ‘डिजिटाझेशन’चा वेग वाढला आणि त्यामुळे कोटय़वधी भारतीयांना आर्थिक मदत देणे सोपे होऊन गेले, हे तर सध्याच्या महासाथीच्या काळातही दिसतेच आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारताचा प्रतिसाद पूर्वीसारखा असणार नाही, हे जे धोरण मोदींनी ठेवले तेही अत्यंत लक्षणीय आहे. आजच्या काळात, मोदी हे जगातील सर्वाधिक प्रभाव असलेल्या नेत्यांच्या पंक्तीत आहेत.

मोदी यांची दुसरी कारकीर्द ही श्वास रोखायला लावणाऱ्या वेगाने घडणाऱ्या बदलांनीच सुरू झाली. हे बदल बरीच वर्षे अपेक्षित असूनही घडले नव्हते आणि ते प्रचंडही होते. तरीसुद्धा त्याच त्या युक्त्याप्रयुक्त्या वापरणारे मोदीविरोधक कोणत्या काळात जगत आहेत कोण जाणे! अर्थात मोदी वाढतच राहणार.. आणि खरा प्रभाव तर पुढल्या काळातच दिसणार आहे.