07 July 2020

News Flash

वादळातून सावरताना..

निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे अपरिमित नुकसान झाले आहे

संग्रहित छायाचित्र

आदिती तटकरे

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री

कोकणावरील ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट अभूतपूर्व होते. त्यानंतरचे मदतकार्यही अधिक कार्यक्षम असावे लागणार, हे ओळखून साऱ्या सरकारी यंत्रणा कार्यरत झाल्या.. लोकांचा विश्वास अधिक भक्कम झाला!

करोना संकटाला सामोरे जात असतानाच ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसला. गेल्या १०० वर्षांत एवढे मोठे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकले नव्हते. या वादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी कोकणवासीयांना बराच कालवधी लागणार असला, तरी या प्रतिकूल काळात राज्य सरकार कोकणवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

हे चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर ३ जून रोजी धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याची माहिती जिल्ह्यातील यंत्रणेला मिळताच जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून उपाययोजना करण्याचे ठरविले. त्यानुसार ३ जून रोजी जिल्ह्यात संचारबंदी करणे, किनारपट्टीवरील कच्च्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करणे, हे उपाय आणि मच्छीमार बांधवांनी या काळात  समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यांनी तातडीने बंदरात सुखरूप परतावे असे आवाहन केले. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसआरडीएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले होते. ताशी १२० कि.मी. वेगाने आलेल्या या चक्रीवादळाने मुख्यत्वे जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, रोहा, माणगाव, मुरुड, तळा, म्हसळा, पेण अशा तालुक्यांमध्ये मोठे नुकसान केले. पण प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जीवितहानी रोखण्यात यश आले.

वित्तहानी मोठीच

निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे अपरिमित नुकसान झाले आहे. घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची मोठी पडझड झाली. भात शेती, आंबा, नारळ, पोफळी सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. वर्षांनुवर्षे जोपासलेली झाडे पडल्याचे दु:ख नुकसानग्रस्तांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. गावांतील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे जवळपास २४०० कच्ची घरे व ७५० पक्की घरे पूर्णत: नष्ट झाली आहेत. एक लाख ६३ हजार घरांचे, २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे, एक हजार ४०० शाळांचे, एक हजार अंगणवाडय़ांचे, ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे, १२ ग्रामीण रुग्णालयांचे, १५ जिल्हा परिषद अधिनस्थ पशुवैद्यकीय दवाखान्यांचे, तीन तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयांचे, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे नुकसान झाले आहे. तसेच ११५ लहान-मोठी गुरेढोरे, ७२ हजार ७६० कोंबडय़ा, म्हसळा येथील शेळी फार्ममधील नऊ शेळ्या मृत पावल्या आहेत. १० लाखांहून अधिक वृक्ष उन्मळून पडले, १९०५ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला, सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी झाली. दूरध्वनी यंत्रणा बंद पडली. समुद्रकिनारी लावलेल्या बोटींचे नुकसान झाले. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

संपर्क पूर्ववत्!

वादळाने अंतर्गत रस्ते झाडे पडून बंद झाले होते, त्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला होता. हा संपर्क तातडीने पूर्ववत करणे आवश्यक होते. वादळानंतर पहिल्या दोन दिवसांत यावरच भर देण्यात आला. १९१ रस्ते वादळामुळे बाधित झाले होते. यात अलिबाग विभागातील ३३, पनवेल २६ आणि महाड विभागातील ४९ रस्त्यांचा समावेश होता. प्रत्येक तालुक्यात १५ पथके तयार करून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू केले. ८० जेसीबी आणि १०० वूडकटर्सच्या मदतीने हे काम दोन दिवसांत पूर्ण करण्यात आले.

वादळामुळे १५०० मोबाइल टॉवर बंद पडले होते. संपर्क यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. त्या तातडीने पूर्ववत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक कक्ष स्थापन करण्यात आला. दूरसंचार यंत्रणांशी संपर्क साधून मोबाइल सेवा सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यापैकी १४०० टॉवर पुन्हा कार्यरत करण्यात यश आले. ‘बीएसएनएल’ने आता लँडलाइन सेवाही पूर्ववत करण्याची कामे हाती घेतली आहेत.

वादळानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अलिबाग तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. या वेळी त्यांना झालेल्या नुकसानीचा आढावा पालकमंत्री या नात्याने मी दिला. यावर निर्णय घेऊन, तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपयांची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिली आहे. यातील ७२ कोटींचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून नुकसानग्रस्तांना मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. वादळानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यंची पाहणी केली. काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी केल्या. नारळ, सुपारीच्या बागांच्या साफसफाईसाठी रोजगार हमी योजनेचा लाभ दिला जावा, तसेच बागायतींच्या लागवडीसाठी फळबाग योजना १०० टक्के अनुदानातून लागू करावी, या त्यापैकी महत्त्वाच्या. छोटय़ा-मोठय़ा दुकानदारांना देखील वादळामुळे झालेल्या नुकसानीकरिता आर्थिक मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाहणी दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीत सांगितले. यानुसार शासनाने मदतीच्या निकषात आवश्यक बदल करून नवीन निकषानुसार मदत जाहीर केली आहे. कोकणातील मस्त्य व पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असल्याने त्यांनादेखील मदतीचे आश्वासन देण्यात आले असून त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचे देखील चक्रीवादळामुळे नुकसान झाले, त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यास गती येत आहे.

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मत्स्यविकास व बंदरे मंत्री अस्लम शेख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या मंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन परिस्थितीची पाहाणी केली. त्यांच्या विभागांना मदत कार्यासाठी सूचना केल्या.

वाढीव मदतीचे निर्णय

वादळामुळे घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. शासनाची प्रचलित मदत अपुरी असल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पूर्णत: नुकसान झालेल्या पक्क्या घरांना पूर्वी ९५ हजार ते एक लाख रु. मदत दिली जात होती. त्यात वाढ करून दीड लाख करण्यात आली. भांडी आणि कपडय़ांचे नुकसान झाले असेल तर पूर्वी प्रत्येकी अडीच हजार रु. दिले जात होते. आता ती मदत प्रत्येकी पाच हजार करण्यात आली आहे. अंशत: पडलेल्या घरांसाठी पूर्वी सहा हजार रु. दिले जात होते. आता १५ हजार रु. देण्याचा निर्णय झाला आहे. टपरीधारक आणि लहान दुकानदारांनाही १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय नवा आहे. यापूर्वी त्यांना कुठलीही मदत दिली जात नव्हती.

रायगड जिल्ह्यात जवळपास २२ हजार हेक्टरवरील बागायतींचे नुकसान झाले आहे. त्यांना पूर्वी हेक्टरी १८ हजार एवढी मदत दिली जात होती. त्यात वाढ करून हेक्टरी ५० हजार एवढी वाढ करण्यात आली आहे. यात अजूनही काय मदत करता येईल यासाठी विचार सुरू आहे. वादळग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. याशिवाय सात लाख ६९ हजार शिधापत्रिकाधारकांना पाच लिटर केरोसिन मोफत देण्याचा निर्णय घेऊन, वाटप सुरू करण्यात आले.

वीज आणि पाणी

महावितरणचे वादळात मोठे नुकसान झाले आहे. जवळपास एक हजार ९०५ गावातील वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला आहे. आता इतर जिल्ह्यातून कर्मचारी आणून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ५० ते ६० टक्के गावांतील वीजपुरवठा सुरू झाला आहे. रिलायन्स, टाटा आणि आदानी पॉवरच्या कर्मचाऱ्यांची मदत यासाठी आम्ही घेत आहोत. त्यांना लागणारी साधनसामग्री पुरवत आहोत.

वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक गावातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वादळग्रस्त भागांसाठी जनरेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मुंबई, नवी मुंबई येथून जनरेटर उपलब्ध केले. ते गावागावांत पाठवून आधी पाणीपुरवठा सुरू केला. दररोज किमान दोन ते तीन तास पाणीपुरवठा राहील असे नियोजन केले आहे. गरज आहे तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मदतीचे वाटप गतिमान पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत. शासनाकडून मिळालेल्या मदतीत वाढ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच सर्व काही पूर्वपदावर येईल.

वादळग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान आता शासनासमोर आहे. मात्र येथील भौगोलिक परिस्थिती आणि जागांची उपलब्धता लक्षात घेऊन, आहे त्या ठिकाणी गावकऱ्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. वादळाने उद्ध्वस्त झालेल्या बागायतींना पुन्हा नव्याने उभे करावे लागणार आहे. यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे. भविष्यात अशी वादळे आली तरी कमीत कमी जीवित-वित्तहानी कशी होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. राज्य सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जी मदत लागेल ती दिली जाईल, असा भक्कम विश्वास लोकांनाही आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 12:09 am

Web Title: while recovering from the storm article by aditi tatkare guardian minister of raigad district abn 97
Next Stories
1 जीवदान देणारी टाळेबंदी
2 स्वस्थ-सुदृढ भारतासाठी!
3 पोलिसांसाठी, जनतेसह!
Just Now!
X