News Flash

दत्तक एकल पालकत्व

एकल पालकत्व आणि तेही दत्तक प्रक्रियेतून..

अमिता आणि तिची लेक अद्वैता. 

एकल पालकत्वामध्ये तारेवरची एक कसरत नेहमी असते ती म्हणजे आई-बाबाया दोन्ही भूमिका जगणे. भूपाली आणि अमिता दोघींनी कळून सवरून एकल पालकत्व स्वीकारलं. आज त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्या जगण्याचा भाग झाल्या आहेत. त्याचं कुटुंब पूर्ण झालं आहे.

एकल पालकत्व आणि तेही दत्तक प्रक्रियेतून.. मी स्वत: साडेपाच वर्षांपासून या अनुभवातून जातेय आणि खरंच नेहमी वाटतं, निमिषाला मी पालक म्हणून लाभले की तिनेच मला हे आयुष्य जगण्याचं गुपित उलगडून दिलं. एकल पालकत्वामध्ये तारेवरची एक कसरत नेहमी असते ती म्हणजे ‘आई-बाबा’ या दोन्ही भूमिका जगणे. अर्थात या प्रवासात सगळं कुटुंब आणि मित्रपरिवार हा खूप मोठा आधार असतो. अशाच काही एकल पालकत्व स्वीकारणाऱ्या मातांचा हा प्रवास.

भूपाली, अहमदनगरची राहणारी. तिने आणि तिच्या मोठय़ा बहिणीने शालेय जीवनात हे ठरवलं की, मोठं झाल्यावर बाळ दत्तक घ्यायचं. पुढे शिक्षण संपण्याच्या आधीच, मोठय़ा बहिणीचं लग्न झालं. त्यानंतर तिचा सासरी झालेला छळ, त्यातच तिचा मृत्यू. कुठेही न डगमगता भूपाली आणि तिच्या कुटुंबाचा न्यायालयीन लढा १० र्वष चालू राहिला. त्यादरम्यान तिचे बाबाही गेले. या सगळ्या काळात भूपाली विचारानं, अनुभवानं खूपच प्रगल्भ झाली. परंतु तिचं आणि बहिणीचं स्वप्नं अजूनही मनात तसंच होतं. ज्या वेळेस मी भूपालीला भेटले त्यावेळेस तिचा हा सगळा प्रवास डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आणणारा असा थक्क करणारा वाटला, तिचा सळसळता उत्साह बघून मी अचंबित झाले.

सृजन, भूपालीचं पिल्लू, हिच्याबद्दल बोलताना भूपालीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवली. या दोघींचं नातं काही औरच आहे. भूपाली म्हणते, ‘‘दत्तक घेण्याचा निर्णय सोपा की अवघड हा प्रश्न माझ्याठायी कधी नव्हताच. ‘पिल्लू घरी कधी येणार?’ एवढाच प्रश्न मी सातत्याने स्वत:ला विचारत राहिले. त्यासाठी आधी मी ‘सर्वार्थाने’ तयार असणं मलाच गरजेचं वाटलं. चाकोरीबाहेर वाटू शकणाऱ्या माझ्या निर्णयाला पुढच्या क्षणी हो म्हणणारी माझी आई (विजया निसळ). ‘आम्ही तिला काय स्वीकारणार, तिनंच आम्हाला स्वीकारलंय. आम्ही नशीबवान आहोत!’ असं समोरच्याला ठणकावून सांगणारी माझी काकू (मंदा निसळ), ‘तुझ्यामुळे अजून चार कुटुंबांना दत्तक प्रक्रियेच्या कृतीचं धैर्य येईल’ असं बोलणारी माझी मावशी (अनुराधा आळतेकर) आणि माझा निर्णय कळता क्षणी फोन करून मला पाठबळ देणारा माझा काका (सतीश निसळ).. मागच्या पिढीतल्या या सर्वानी मला दहा हत्तींचं बळ दिलं. हा निर्णय सगळ्या कुटुंबानं एकत्र येऊन घेतला आणि त्यामुळेच हसत्या खेळत्या मायेच्या घरात सृजन आल्यासरशी रुळली. सृजन माझ्या आयुष्यात आली. तिने मला तिचा ‘बाबा’ केलं. ती जसं बोलायला लागली तसं तिनं मला ‘बाबा’ आणि माझ्या आईला ‘आई’ म्हणायला सुरुवात केली. ‘मला तुला बाबाच म्हणायला आवडतं’ असं ती मला नेहमी सांगते. आई, बाबाच्या असण्या-वागण्यात एक पुसटशी रेषा असते. मला एक प्रसंग आठवतो. माझा मुलाखतीचा एक कार्यक्रम होता. सृजनने दिलेली व्हिडीओक्लीप, ऐनवेळी पडद्यावर दाखविण्यात येणार होती. मला यातलं काहीएक माहीत नव्हतं आणि सृजननं कार्यक्रम होईपर्यंत मला ते कळूही दिलं नव्हतं. त्यात तिनं सांगितलं, ‘आम्ही जेव्हा सहलीला जातो आणि काही अडचण येते तेव्हा बाबा आम्हाला सांगतो, घाबरू नका मी आहे ना.’ तिचं हे वाक्य ऐकून वाटलं, मला आई-बाबामधली ही पुसट रेषा ओलांडता येते. बाबा म्हणून सर्वसाधारणपणे जे अपेक्षित आहे ते मला जमतंय. खरं तर मला आमच्यात कोणतंही नातं चालणार होतं. आज वेळ येते तेव्हा आम्ही एकमेकांची आई होतो, बाबा होतो, बहीण होतो, भाऊ  होतो, मित्र होतो. या जाणिवा मला, आम्हा दोघींसाठी फार गरजेच्या वाटतात.

निसळ कुटुंबाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकानेच सृजनला मनापासून स्वीकारलं आहे.  सृजन तिच्यासोबत प्रेम, माया, गोडवा, लाघवीपणा मोठ्ठय़ा पोतडीत भरून घेऊन आली आहे. प्रत्येक बाळ असंच येत असतं. फक्त त्यांना व्यक्त होण्याचे सारे मार्ग खुले करून देण्याची गरज असते.’’

दुसरी माता अमिता, राहणारी पुण्याची आणि अद्वैता तिची लेक आता चार वर्षांची होतेय. अमिताला मी गेली तीन र्वष ओळखते. अतिशय भावूक आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व. अमिताला जेव्हा मी तिच्या प्रवासाबद्दल बोलले, त्या वेळेस अमिता म्हणाली, ‘‘मी जेव्हा मुलगी दत्तक घेण्याचा विचार केला तेव्हा मला माझा प्राधान्यक्रम विचारला गेला. एकल पालकत्व आणि नोकरी पेशा, त्यामुळे मला असं वाटलं की एक ते दीड वर्षांचं मूल आपल्याला सांभाळायला सोपं जाईल. मला जेव्हा ‘सोफोश’मध्ये बाळांना भेटायला बोलावलं, तेव्हा माझ्या प्राधान्यक्रमानुसार मला ३-४ मुलींची माहिती दिली गेली. त्या सगळ्यांचा वयोगट १ ते २ वर्ष होता. त्यांची माहिती दिल्यानंतर मला तिथल्या ताई म्हणाल्या, अजून एक मुलगी आहे, ५ महिन्यांची. तिला पण भेटून घ्या. तिच्या हृदयाला छिद्र आहे, त्यामुळे तिला आईबाबा मिळायला वेळ लागतोय. मी विचार केला, की इतक्या छोटय़ा बाळाची देखभाल आपल्याला जमणं अवघड आहे, पण एकदा भेटू या तरी बाळाला..

मग बाळांना भेटायला आम्ही ‘श्रीवत्स’मध्ये गेलो. मला ज्या ३-४ बाळांना भेटायचं होतं, त्यापैकी कुणी जेवत होतं, कुणी झोपलं होतं, तर कुणी डॉक्टरकडे गेलं होतं. इतक्यात मावशी एक छोटं बाळ घेऊन आल्या. मला तर इतक्या छोटय़ा बाळाला कसं घ्यावं हेही कळेना. तरीही मी पटकन् पुढं होऊन बाळाला घेतलं आणि मला जाणीव झाली की काळजात काही तरी हललं. हीच माझी मुलगी आणि नेमकं तेव्हाच ती इतकं गोड हसली.. बरोबर तोच क्षण ताईंनी फोटोमध्ये टिपला. आज पण मला तो क्षण आठवला की माझ्या डोळ्यात पाणी येतं. तो क्षण जणू साक्षात्काराचा होता.

मी ताईंना म्हटलं, ‘हीच माझी मुलगी’. मला हिचे वैद्यकीय तपशील द्या. मी सगळ्यात नावाजलेल्या हृदयविकार तज्ज्ञाकडे हिचा उपचार सुरू करणार. त्यावर त्यांनी मला परत एकदा विचार करण्याचा सल्ला दिला. एकल पालक, त्यातून हृदयाला छिद्र, त्यामुळे त्यांनाही थोडी काळजी वाटली. मी म्हटलं, ‘ज्या क्षणी मला जाणवलं की ती माझी मुलगी आहे, तेव्हापासून तिच्या सगळ्या समस्या माझ्या झाल्यात. ज्या मुलांना असे त्रास असतात त्यांचे जन्मदाते जे करतात, मीही ते सगळं करणार.’

त्यानंतरचा प्रवास सोपा नव्हता, आजारपण, थोडय़ा थोडय़ा दिवसांनी होणारा फुफ्फुसांचा त्रास, सर्दी-खोकला, हिमोग्लोबिनची कमतरता, जेवणापेक्षा जास्त औषधं अशी स्थिती होती. माझे आईवडील, मोठी बहीण खंबीरपणे माझ्याबरोबर उभे राहिले. अद्वैताच्या पथ्यपाणी आणि औषधाच्या वेळा पाळण्यात माझ्या बहिणीचा माझ्यापेक्षा मोठा वाटा आहे. माझी बहीण तिची दुसरी आईच आहे. सगळ्या आजारावर मात करून आता अद्वैता एकदम ठणठणीत बरी आहे. पहिल्याच वाढदिवसाला तिचं हृदयाचे छिद्र शस्त्रक्रियेविना भरून आलं. एक घर आणि  प्रेम करणारी आपली माणसं हेच अद्वैतासाठी खरं औषधं होतं.

आता तिचे बालसुलभ प्रश्न सुरू झाले आहेत. त्याला समंजस उत्तरं देतादेता दिवस पुरत नाही. माझ्या साडेतीन वर्षांच्या आईपणातून मला एक गोष्ट नक्की उमगली, ‘‘आई ही आई असते आणि मूल आईचं लाडकं बाळ. त्यात दत्तक वा औरस असं काही नसतं, त्या व्याख्या फक्त कायद्यापुरत्या. आईच्या कुशीतलं बाळ हेच सत्य!!’’

आज आपल्याला कुटुंब म्हणून फक्त आई, बाबा आणि त्यांची मुले असंच चित्र दिसतं. खरं तर या सगळ्या एकल पालकांच्या आयुष्यात मात्र कुटुंब म्हणजे आजी-आजोबा, मावशी-काका, मामा-मामी आणि मित्रपरिवार असे सगळेच सामावलेले असतात. यामुळेच भूपाली, अमिता आणि अशा अनेक माता एकल पालकत्व आनंदाने जगत आहेत. मुलांनाही हरवलेलं प्रेम मिळत आहे. खऱ्या कुटुंबाची व्याख्या या माता जगत आहेत.

तुम्हा सगळ्यांना अशा कुटुंबाचं सदस्य व्हायला आवडेल ना?

 

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2017 12:13 am

Web Title: adoption single parenting
Next Stories
1 समाधानी आयुष्याचं गुपित
2 संवेदनशील
3 समृद्ध प्रवास
Just Now!
X