विकास हा कर्नाटकात राहतो, व्यवसायाने वकील. ‘पूर्णाक’ या आमच्या संस्थेचा व्यकंटेश हा विकासचा महाविद्यालयीन मित्र. त्यावेळेस कधी हे दोघं दत्तक याविषयी बोलले नाहीत, परंतु विकासने जेव्हा दत्तक प्रक्रियेतून मूल घरी आणण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तो व्यंकटेशशी बोलला आणि ‘पूर्णाक’मध्ये सामील झाला. विकासचा प्रवास तसा थोडासा वेगळा, परंतु मला त्याच्या प्रवासात बरेच कंगोरे जाणवले जे वाचकांना नक्कीच काहीतरी देऊन जातील म्हणून हा लेखप्रपंच. मी विकासला विचारले, ‘‘तुझ्या दत्तक प्रक्रियेबद्दल आणि त्यानंतरचा तुझा प्रवास याबद्दल सविस्तर सांगशील का?’’ विकास अगदी मनापासून मोकळेपणानं बोलला.

विकास म्हणाला, ‘‘माझ्या आईचं लग्न झालं आणि फारशी वाट न बघता मी जन्माला आलो. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, मी जेमतेम एक-दीड वर्षांचा असताना अचानक माझे बाबा वारले. त्यानंतर आजोबा आईला आणि मला घेऊन त्यांच्या घरी आले. थोडय़ाच दिवसांत त्यांनी आईचं दुसरं लग्न करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तिचं दुसरं लग्न झालं. मी मात्र आजोबांच्या घरीच राहावं, असं लग्नाच्या आधी ठरलं होतं, परंतु बाबांनी आजोबांना विनंती करून मलाही घरी आणलं. पुढं त्यांनी रीतसर दत्तक प्रक्रिया करून कायदेशीर माझं पालकत्व स्वीकारलं. माझी जन्मदात्री आणि आई एकच आहे परंतु बाबांनी मला दत्तक घेतलं. त्याअर्थी मी दत्तकच.

आमचं हे नवीन कुटुंब एकत्र होतं, त्यामुळं घरात आजी, काका-काकू आणि भावंडं असे सगळे असायचे. माझे बाबा हे कर्ते पुरुष, ते सतत कामात व्यग्र असायचे त्यामुळे माझ्यासोबत ते फारसा वेळ कधी देऊ शकले नाही. लग्नानंतर त्यांना अजून एक अपत्य झालं तो म्हणजे माझा धाकटा भाऊ. लहानपणी अर्थात मला हे माहीत नव्हतं. आईला नेहमी वाटायचं आपण विकासला सगळं सत्य सांगावं, परंतु बाबांचं नेहमी म्हणणं असायचं, ‘तो माझा आहे त्यामुळं दत्तकप्रक्रियेबद्दल सांगायची काहीही आवश्यकता नाही.’ आई दरवेळेस गप्प राहायची. परंतु का कोण जाणे मला माझ्या एका काकांकडून आणि आजीकडून बऱ्याचदा वेगळी वागणूक मिळायची. नक्की मला त्यांचं बोलणं आठवत नाही, परंतु माझ्याशी आणि खरं तर आईशी पण त्यांचं वागणं आणि बोलणं हे बाकी भावंडांपेक्षा नक्की वेगळं वाटायचं. आता मागं वळून विचार केला तर वाटतं बहुतेक बाबा कर्ते असल्यामुळं धाकाने ते उद्धटपणे वागायचे नाहीत, नाहीतर कदाचित आईला त्यांनी सळो की पळो केलं असतं. एकदा शाळेत माझा मित्र म्हणाला, ‘तुझा रक्तगट तुझ्या आईबाबांपेक्षा वेगळा कसा काय? त्यांनी तुला दत्तक घेतलं का?’ हे एक वाक्य एवढं मनात कोरलं गेलं की आजही तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. घरात तसेही नेहमीच वाद चालू असायचे, मुखत्वे हे वाद आर्थिक बाबींवरून असायचे. लहानपणापासून घरात शांतता किंवा फारसं खेळीमेळीचं वातावरण असल्याचं मला आठवत नाही. त्यामुळं मला बाकी कुणाचं वागणं खटकलं तरी आई किंवा बाबांना जाऊन सांगायला कधी आवडलं नाही. वाटायचं, काळजीचा बोजा कमी आहे का यांना की त्यांना अजून आपण या गोष्टी सांगून त्यात भर घालायची. या विचारांमुळं झालं असं की, मी थोडा अंतर्मुख व्हायला सुरुवात झाली. स्वत:चा स्वत:वरील विश्वास कमी होऊ लागला. आयुष्यात आपल्याला नेमकं काय हवंय याचा विचार कधी करता आला नाही. घरातील वातावरणाचा एवढा परिणाम झाला की वाटायचं मोठं झालं की खूप पैसे कमवायचे, कारण पैशानं सगळ्या अडचणी दूर होऊ शकतात, हे मनात पक्क बसलं होतं. अर्थात जेव्हा कमवायला लागलो तेव्हा लगेच जाणवलं आपल्या या विचारात काही तथ्य नाही.

पुढे मी दहावीत असताना आईबाबा यांनी स्वत:चा वेगळा संसार सुरू केला. पण त्याच वेळी मी बारावीनंतर शिकायला बाहेर पडलो. त्यामुळं परत आईबाबांसोबतचा वेळ तसा कमीच मिळायचा. बारावीनंतर मी कायदेतज्ज्ञ व्हायचं ठरवलं, इथं माझी ओळख व्यंकटेशसोबत झाली. वसतिगृहात दोन वर्ष आम्ही एकाच खोलीत राहायचो. पुढे मी मुंबईत नोकरी सुरू केली. दरम्यानच्या काळात बहुतेक आईबाबांशी बरेचदा बोलायची की विकासला आपण पूर्ण सत्य सांगू या आणि बाबांनी दरवेळेस तिला ‘नाही’ असंच उत्तर दिलं. परंतु तिनं मनात ठरवलं असावं की मी नोकरीला लागलो की आपण हे विकासला नक्की सांगू या. तिची धारणा अशी असावी की शिक्षण संपून मुलं आपल्या पायावर उभे राहिले की मानसिकदृष्टय़ा ते सगळं झेलायला तयार असतात. खरं तर तिचं हे वाटणं मला फारसं योग्य वाटत नाही. मुलांना लहानपणापासून सत्य सांगितलं तर नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. दुसरी बाजू अशीही आहे की, बाहेरचे लोक कधी ना कधी याविषयी बोलणारच आणि ते अर्धसत्य असतं.

मी पंचवीस वर्षांचा असताना आईनं मला हे सगळं सत्य सांगितलं. ऐकल्यानंतर मला फार मोठा मानसिक धक्का बसला असं काही झालं नाही. ‘हे मला काही प्रमाणात माहीत होतंच फक्त आईनं सांगितलं त्यामुळं त्यातील सत्यता कळली, एवढंच! पण एक प्रश्न मात्र प्रकर्षांने छळत राहिला की कोण आहेत आपले जन्मदाते पिता?’ परंतु या दरम्यान मी आधीच एका मानसिक धक्क्यातून स्वत:ला सावरत होतो, त्यामुळं थोडय़ाच दिवसात मला जास्त त्रास होऊ लागला. स्वत:वरचा विश्वास एकदम कमी झाला, आपण काहीच कामाचे नाहीत, असं सारखं वाटायचं. काही काळ नैराश्यात गेला. सगळ्याच नात्यांत काही तथ्य नाही असं वाटायचं. थोडय़ा महिन्यांनी परत स्वत:ला कामात गुंतवून घेतलं.

आईला ज्यावेळेस मी माझ्या जन्मदात्या पित्याबद्दल विचारतो, त्यावेळेस ती नेहमीच म्हणते, ‘विकास, ज्या घरात तुझी आणि माझी हेटाळणी झाली तिथं तू परत गेलास तर त्यांचा नकार आणि अस्वीकार याशिवाय तुला काही अनुभवायला मिळणार नाही.’ बाबांशी या विषयावर मी एकदाच बोललो, त्याचं म्हणणं होतं, ‘सगळं काही छान चालू आहे, त्यामुळं तुला तुझ्या जन्मदात्या पित्याचा शोध का घ्यावासा वाटतो? परंतु विकास जर तुझी तशी इच्छा असेल तर मी तुला पूर्ण सहकार्य करीन.’ मी पण थोडा विचार केला, आईबाबांनी आपल्यासाठी सगळं केलं, जे मला करायचं होतं त्यात त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. आज मी जो काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे.’ मी ठरवलं, जर आईबाबांना त्रास होणार असेल तर मग कशाला या शोधाच्या मागे लागू? शिवाय बाबा नव्हतेच या जगात, त्यामुळं नको शोध घ्यायला, असं ठरवून टाकलं.’

ज्यावेळेस माझ्या लग्नाचं ठरत होतं त्यावेळेस हा विषय बोलायची गरज नाही, असं आईबाबांना वाटलं. परंतु मी माझ्या होणाऱ्या बायकोला आणि तिच्या घरच्यांना सगळी कल्पना दिली. अर्थात त्यांना यात काहीच वावगं वाटलं नाही आणि आम्ही गेली चार वर्ष सुखाने संसार करतोय. सुरुवातीला मी तिला म्हणायचो, आपण स्वत:च्या मुलाचा विचार नको करायला. त्यापेक्षा संस्थेमधील चार-पाच मुलांचा खर्च उचलून त्यांच्या आयुष्याचं भलं करू या. सुरुवातीला तिला ते पटलं, परंतु हळूहळू तिला स्वत:ला मातृत्व अनुभवायचं आहे हे जाणवू लागलं. मला मूल नको असं जरी नसलं तरी हवंच असंही कधी फारसं वाटायचं नाही. खरं तर मला लहान मुलांबद्दल प्रचंड प्रेम, जिव्हाळा आहे. तिची इच्छा आणि कदाचित मलाही आतून जाणवलं की आपलं मूल हे दत्तक प्रक्रियेतून घरी येऊ देत. हे जेव्हा मी तिच्याशी बोललो, त्यावेळेस तिलाही हे चटकन पटलं. काराच्या साइटवर अर्ज भरला आणि लगेच व्यंकटेशशी बोललो. सध्या आम्ही आमचं बाळ घरी येण्याची आतुरतेनं वाट बघतोय. मला विश्वास आहे की मी आणि माझी बायको एक चांगले आईबाबा नक्की होऊ. ‘पूर्णाक’च्या माध्यमातून दत्तक पालकत्वासाठी आम्हाला खूप मदत होईलच तसंच आलेल्या आमच्या बाळाला ‘पूर्णाक’मुळे मोठा परिवार मिळेल.’’

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org