News Flash

भीतीपोटी चुका

प्रत्येक मूल हे वेगळं व्यक्तिमत्त्व घेऊन येत असतं

प्रत्येक मूल हे वेगळं व्यक्तिमत्त्व घेऊन येत असतं, तसंच त्याला मिळणारं घर आणि आजूबाजूचं वातावरण या मुलाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलतं. आजच्या लेखात आपण श्रेयाला भेटू या आणि जाणून घेऊ या, तिचा तेवीस वर्षांचा प्रवास. खरं तर माझी ओळख तशी खूपच नवीन, परंतु ‘दत्तक’ विषय म्हटलं की मुले आणि पालक इतक्या मनमोकळ्या मनानं सगळं सांगतात की त्या सगळ्यांसोबत एक वेगळंच घट्ट नातं तयार होतं. जुने ऋणानुबंधच हे सगळे!

ज्या वेळेस श्रेयाला मी विचारलं की तिला तिचा प्रवास, त्यातले चढ-उतार याबद्दल बोलायला आवडेल का? तेव्हा तिने आनंदाने होकार दिला. मी तिला एवढंच म्हटलं, तुझा भूतकाळ हा भूतकाळ आहे; पण तुझा वर्तमानकाळ जाणून घेतल्यावर बरीच मुलं आणि पालक जे आज अशा आव्हानांमधून जात आहेत त्यांना नक्की धीर मिळेल आणि त्यांना त्यांचं भविष्य आजच्या श्रेयात नक्कीच दिसेल. कारण आजची श्रेया ही खूपच समंजस आणि प्रगल्भ व्यक्ती आहे.

श्रेयाचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत खाडिलकर. श्रीकांत डॉक्टर आणि शुभदा निवृत्त आयकर निरीक्षक. शुभदा सांगतात, ‘‘आमचं लग्न झालं आणि श्रीकांतनं मला सांगितलं, ‘आपलं मूल हे दत्तक विधीतून घरी आणू या.’ मी त्याला म्हणाले, ‘मलाही आवडेल, पण एक मूल आपल्याला झाल्यावर दुसरं मूल दत्तक विधीतून घरी येऊ  दे.’ श्रीकांतला माझ्या भावना कळल्या आणि आमचा श्रीरंग दीड वर्षांचा असताना आम्ही संस्थेला आमची इच्छा कळवली. श्रीरंग आणि येणाऱ्या बाळामध्ये दोन वर्षांचा फरक असावा या दृष्टीनं तयारी सुरू केली.’’

‘‘आम्ही जेव्हा पहिल्यांदा श्रेयाला भेटायला गेलो होतो, त्या वेळेस ती आजारी होती. आमची पहिली भेट झाली ती थेट रुग्णालयामध्येच. एवढासा जीव, श्रेयाचा जन्मही ९ महिने पूर्ण व्हायच्या आधी झालेला त्यामुळे तशी ती तब्येतीनं जेमतेम. रुग्णालयामध्ये तिला बघून जीव हेलावून गेला. वाटलं, आताच हिला घरी घेऊन जाऊ या. थोडय़ाच दिवसांत श्रेया घरी आली, तेव्हा ती सहा महिन्यांची तर श्रीरंग जेमतेम अडीच वर्षांचा होता. आम्हा दोघांची नोकरी चालू आणि त्यात श्रेयाचं आजारपण यामुळं बरीच धावपळ होऊ  लागली. नवल म्हणजे या दरम्यान मला पान्हादेखील फुटला. त्यामुळे मी थोडी हबकलेच की हे काय होतंय मला? श्रेयाला मालिश करायला येणाऱ्या मावशी म्हणाल्या, ‘ताई, पाजवायला सुरुवात करा, नशीबवान आहे पोर!’ पण का कुणास ठाऊक, मला उगाच वाटलं, ‘हे नैसर्गिक नाही, असं कसं होऊ  शकतं? बाकीचे काय म्हणतील?’ या सगळ्या विचारांमुळे मी श्रेयाला नाही पाजलं. आज मात्र मागे बघून विचार केला तर वाटतं, थोडं चुकलंच, प्रयत्न करायला काही हरकत नव्हती.’’

‘‘श्रेयाची तब्येत हळूहळू सुधारू लागली आणि आम्ही आमच्या चौकोनी कुटुंबाचा आनंद परिपूर्ण लुटत होतो. श्रेयाशी ‘दत्तक’ विषयासंबंधी ठरवून आम्ही कधी बोललो नाही, पण तिला तिची संस्था आणि तिचं आमच्या आयुष्यात येणं, हे सगळं जमेल तसं सांगत होतो. श्रेया घरी आल्यानंतर माझ्या नातेवाईकांमध्ये माझ्या दोन मावसभावांनी आणि दोन आतेभावांनी त्यांचंही दुसरं बाळ दत्तक प्रक्रियेतून घरी आणायचं ठरवलं.’’

‘‘एकदा असेच श्रेया आणि श्रीरंग स्वयंपाकघरात खेळत होते त्यावेळेस ते ८-१० वर्षांचे होते. मी स्वयंपाक करण्यात गुंतलेली होते. श्रेया श्रीरंगला म्हणाली, ‘भय्या, माझी ससूनमध्ये आई कोण होती?’ इतका वेळ माझं लक्षही नव्हतं की ते काय बोलत आहेत? परंतु हा प्रश्न ऐकताच माझेही कान टवकारले, मी आतुरतेने बघत होते, पुढे ही दोघं काय बोलतात? श्रीरंगनं थोडा विचार केला, त्याला काय बोलावं काही सुचलं नाही, आणि दोघांनी मोर्चा माझ्याकडं वळवला, ‘आई, ससूनमध्ये श्रेयाची आई कोण होती?’ मलाही लगेच काय उत्तर द्यावं सुचलं नाही, मी म्हणाले, ‘अगं, तिथंही मीच होते तुझी आई!’ त्या उत्तरानं तेव्हा त्या दोघांचं समाधान झालं असावं. मुळात आम्हा चौघांचं नातं इतकं घट्ट होतं की आम्हाला कधी काडीमात्रही शंका आली नाही की श्रेयाला ‘दत्तक’ या प्रक्रियेचा कधी त्रास होत असेल. श्रेया जेव्हा आठवीत होती, त्या वेळेस आम्हाला तिच्या वागण्यात थोडे बदल दिसू लागले. या वयात बरीच मुलं अशी वागतात असं स्वत:ला समजावून आम्ही त्याचा बाऊ  केला नाही. खरं तर श्रीरंगमध्ये आम्हाला असे बदल कधी दिसलेच नाहीत, तो तसा बराच समंजस आहे. त्यामुळे श्रेयाच्या अशा वागण्याचा कुठेतरी आम्हाला त्रासही व्हायचा. वाटायचं, आपणच पालक म्हणून कुठे कमी पडतोय का? याच काळात नववीत श्रेयानं शाळा सोडली. आता पुढं काय करायचं असा विचार करत असताना, श्रीरंग म्हणाला, ‘‘आई वर्ष कशाला वाया घालवायचं? श्रेयाला बाहेरून दहावीच्या परीक्षेला बसवू या का?’’ आम्ही सगळ्यांनीच ही कल्पना उचलून धरली. त्यानंतर श्रेयाला एका शिकवणीस पाठवायला सुरुवात केली आणि बाहेरून श्रेयानं तिची दहावी पूर्ण केली. आम्हा सगळ्यांसाठीच ती खरंच खूप मोठी गोष्ट होती. पुढे तिनं बारावी केलं आणि बी.कॉम.ला  प्रवेश घेतला. या दिवसात पुन्हा काही आव्हानं पुढे आली. महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींनी सोडून जाऊ  नये म्हणून ती त्यांना जास्त महत्त्व देऊ  लागली, घरच्यांच्या अपरोक्ष ती त्यांना आर्थिक मदत करू लागली. अशा काही चुकाही झाल्या, हे सगळं जवळपास वर्षभर चालू होतं. ज्यावेळी आम्हाला तिचं हे वागणं कळलं त्यावेळेस खूप मनस्ताप झाला, मी रडायची, ‘कुठं चुकले मी?’ मला त्या काळात वाटायचं मी एक अपयशी पालक आहे.’’

शुभदाने तिचा अनुभव प्रामाणिकपणे सांगितला म्हणूनच श्रेयाचा अनुभव जाणून घेणंही महत्त्वाचं होतं. तिला विचारताच ती सांगू लागली. ‘‘मला खरं तर शाळा कधी फारशी आवडायची नाही, आई-बाबा नोकरीनिमित्त बाहेर, त्यामुळे बहुतेक मी कायम मित्र-मैत्रिणी शोधत असायची. तेव्हा फारसं कळायचं नाही पण आज मागं वळून बघितलं तर जाणवतं, कायम मला असं वाटायचं ‘आपलं असं कुणीच नाही’. जे माझ्यासोबत आहेत ते मला सोडून जातील, याची मला कायम भीती वाटायची. आई-बाबा आणि भय्या नेहमी माझ्यासोबत असायचे, त्यांनी वेगळं असं कधी वागवलं नाही, उलट मीच भय्या आईजवळ गेला की त्याला दूर करायची आणि मी तिच्याजवळ जाऊन बसायची. मी लहान आहे म्हणून कुणी काही बोलायचंही नाही. पण आज मला जाणवतं, तेही वागणं फक्त त्या भीतीपोटी असायचं.’’

‘‘महाविद्यालयात ज्या चुका झाल्या त्याही या एकाच भीतीनं की ते मित्र-मैत्रिणी मला सोडून जाऊ नयेत म्हणून. परंतु आई-बाबा आणि भय्या यांच्यामुळं मला माझ्या चुका कळल्या आणि त्या दुरुस्त करण्याचे मार्गही सापडले. अशा प्रत्येक खडतर प्रसंगातून मी स्वत:ला बाहेर काढू शकले. त्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण चालू असताना नोकरीही सुरू केली आणि स्वत:च्या पायावर उभी राहिले. माझं स्वप्न होतं ‘मोठय़ा कंपनीत करिअर करावं’ आणि आज मी एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करते आहे. हे सगळं शक्य झालं ते फक्त आई-बाबा आणि भय्याचा पाठिंबा आणि प्रेम यामुळंच.’’

किती मनमोकळेपणानं बोलली श्रेया.

सध्या मी एका १६ वर्षांच्या मुलासोबत काम करते आहे. तो मागील दोन-तीन वर्षांत बऱ्याच मानसिक कल्लोळातून गेला आहे. श्रेयाला सांगताच ती त्या मुलाला भेटायला लगेच तयार झाली आणि दोघांनी जवळपास तासभर गप्पा मारल्या. त्यानंतर श्रेया मला म्हणाली, ‘‘मावशी, आम्हा दोघांच्या भावनिक चढ-उतारामध्ये जवळपास ९५ टक्के समानता आहे.’’ मलाही हे ऐकून आश्चर्य वाटलं. थोडंसं बोलल्यावर जाणवलं, दोघांच्या अशा वागण्याच्या मागे जे मुख्य कारण आहे ते, ‘माझी माणसं ही माझी हक्काची आहेत का? ती मला सोडून जातील का? ही भीती.’ ही भीती मुळात दत्तक प्रक्रियेतून घरी आलेल्या प्रत्येक मुलाच्या मनात असू शकते आणि तिचा उगम असतो तो या मुलांनी जन्मल्याबरोबर अनुभवलेल्या वियोगावस्थेत. म्हणूनच या मुलांच्या वागण्यात दोष काढत बसण्यापेक्षा त्या ज्या मन:स्थितीतून जातात, त्याचा विचार करून त्यांना सहृदयतेने स्वीकारायला हवं. त्यांचं वागणं समजून घ्यायला हवं.

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2017 12:11 am

Web Title: article by sangeeta banginwar on guardianship
Next Stories
1 श्रुतीची कहाणी
2 अविस्मरणीय स्वागत
3 हवं समाजभान
Just Now!
X