सध्या मी बऱ्याच पालकांना आणि मुलांना भेटत असते. समाजात बऱ्याच जणांना वाटत असतं, अनाथाश्रमात (हा शब्दच खरं तर चुकीचा आहे. आज कागदोपत्रीदेखील सगळीकडं बालसंगोपन केंद्र असं म्हटलं जातं.) वाढलेल्या मुलांना घर कसं कळणार? तिथं मुलांना कोण कशाला माया लावेल? असं वाटणं स्वाभाविक असेल कदाचित, परंतु एक सुजाण व्यक्ती म्हणून आपण थोडा विचार केला तर कदाचित आपल्याला वाटतं त्यापेक्षा खरंच वेगळं चित्र असू शकतं.

याच सदरातून ‘पाखर संकुल’मधील पूजाला एका लेखामधून भेटलो. आज तेथीलच या काही यशोदा माता. शुभांगी बुवा वा माई यांनी स्थापन केलेल्या या ‘पाखर संकुल’मध्ये काम करणारे सगळेच नेहमी बोलायला तयार असतात म्हणून तेथील काही मातांशी केलेला संवाद हा सगळ्या वाचकांपर्यंत पोचावा, असं मला सारखं वाटायचं. मी चार-पाच महिन्यांपूर्वी ‘पाखर संकुल’मध्ये या सगळ्यांसोबत चार दिवस राहिले होते. वासंती आणि जयश्री या दोघींशी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यांचा उत्साह बघून मी भारावून गेले. त्या आणि तिथल्या सगळ्या मातांनी ‘पाखर संकुल’चं गोकुळ बनवलं आहे आणि या सगळ्या तिथल्या यशोदामैया!

जयश्री म्हणाली, ‘‘ताई, इथं प्रत्येक मूल हे वेगळं. त्यामुळं मला नेहमी वाटतं, आम्ही या मुलांसोबत रोज मोठं होत असतो, रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं. एक दिवस जरी इथं आले नाही तरी घरी करमत नाही. इथं सकाळी मुलांना आंघोळ घालण्यापासून त्यांना भरवणं, त्यांची शी-शू, त्यांचं रडणं, त्यांचे आजारपण सगळं मी गेली दहा वर्ष अनुभवतेय. प्रत्येक आई ही आपल्या मुलाच्या तोंडून ‘आई’ ऐकण्यासाठी तळमळत असते आणि या मुलांच्या तोंडून पहिला ‘आई’ हा शब्द आमच्यासाठी निघतो. केवढा आनंद होतो आम्हाला! ‘पाखर संकुल’मुळे मी आज कित्येक मुलांची आई बनले आहे. गोष्टींमधून आपण कृष्ण आणि त्याची आई, यशोदा मातेच्या कथा वाचतो, परंतु आमचं भाग्य आहे, आज आम्ही कित्येक कृष्णांच्या यशोदा झालो आहोत. मला नेहमी वाटतं, देवानं मला या सगळ्या मुलांची आई होण्यासाठीच जन्म दिला.’’

जयश्री तशी शांत, पण वासंती मात्र एकदम बोलायला मोकळी. ती स्वत: बारावीपर्यंत शिकलेली आहे. साध्या घरात जन्म. गरज म्हणून नोकरी सुरू केली. परंतु अशाही परिस्थितीत तिच्यातील कलाकार जिवंत आहे. ती सुंदर कविता करते, सध्या ती ‘पाखर संकुल’वर एक छान कविता लिहिते आहे. तिच्याशी मी जेव्हा गप्पा मारल्या, तेव्हा तिला भरभरून बोलायचं होतं. तिनं हेही सांगितलं की मी जे काही तुमच्याशी बोलत आहे, ते येथील प्रत्येक आईच्या मनातील भाव आहेत, मी फक्त त्यांच्यावतीने हे भाव तुमच्यासमोर व्यक्त करते आहे.

वासंती म्हणाली, ‘‘ताई मी आठ वर्षांपूर्वी इथं आले तेव्हा फक्त काहीतरी काम करून पैसे कमवायचे आणि घराला आधार द्यायचा या भावनेनं. इथं आल्यावर माई म्हणाल्या, ‘तू काय करू शकतेस?’ मी त्यांना म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल ते काम करीन.’ माई म्हणाल्या, ‘आजपासून तू या बाळांची यशोदा हो, बाळांना माया दे, त्यांच्या अंगावरून हात फिरवत जा, त्यांना जवळ घेत जा, त्यांना गाणी म्हणून झोपव, त्यांना प्रेमानं भरव.’ माई म्हणत गेल्या तसं मी करू लागले. मला गाणी म्हणायला खूप आवडतं, या बाळांसाठी गाणी म्हणत म्हणत कधी सगळ्या मुलांची आंतरिक ओढ निर्माण झाली हे कळलंच नाही. एक वेगळंच नातं या सगळ्यांसोबत जुळलं!

इथं यायच्या आधी मी घरातल्या वातावरणामुळं खूप दु:खी असायची, वाटायचं ‘मलाच का एवढी दु:खं आहेत?’ इथं आल्यावर या बाळांना भेटले आणि वाटलं, ‘या बाळांच्या मनात किती दु:ख असेल बरं, यांना तर कुणाजवळ सांगताही येत नाही. तरीसुद्धा आनंदात दिसतात हे सगळे.’ या बाळांसोबत राहून माझं दु:ख शून्य होत गेलं. मी ठरवलं, ‘आपण यांना मायेची ऊब द्यायची, आपण या बाळांचे आई-बाबा व्हायचं आणि या सगळ्या बाळांसाठी प्रेमाची पाखर बनायचं, जे आमच्या माईंचं स्वप्न आहे.’

यशोदामाईचं काम करताना मला माईंनी नर्सिगचा कोर्स करायला सांगितलं. या कोर्समुळं माझ्यातील आत्मविश्वास आणखीनच वाढला आणि बाळांना दवाखान्यात नेणं तसंच त्यांची काळजी घेणं यात मला खूप मदत झाली. माई आम्हा सगळ्यांनाच नवीन नवीन शिकायला प्रवृत्त करत असतात.

इथं आलं की बाळांनी ‘आई आई’ म्हणून हाक मारणं, येऊन मिठी मारणं, त्याचं हसणं या सगळ्यात कामाचा शीण कधीच वाटत नाही. आमच्या इथं बाळांचं नामकरण, त्यांचे वाढदिवस, सगळे सण खूप आनंदात साजरे होतात. एकदा आम्हाला माईंनी मातृशक्ती पुरस्कार देऊन सगळ्यांचा गौरव केला. गोकुळअष्टमीला आम्हाला यशोदेप्रमाणे नटवलं आणि आमचा सत्कार केला.

आम्ही सगळ्या यशोदामातापण एकमेकींना खूप समजून घेतो आणि आनंदाने खेळीमेळीत काम करतो. आमच्या इथं नवीन बाळ आलं की माई आमच्यापैकी कुणालातरी हाक मारतात आणि बाळाला कुशीत घेऊन आत न्यायला सांगतात. जी आई बाळाला घेऊन आत येते, आम्ही सगळे मिळून तिचं अभिनंदन करतो. बाळंतपण झाल्याप्रमाणं तिचे लाड करतो. आम्ही ‘आई’ होण्याचं भाग्य खूप वेळा अनुभवतोय आणि देवाचे आभार मानतो की त्याने आम्हाला या कामासाठी निवडलं.

आम्ही जेव्हा बाळांना घेऊन दवाखान्यात जातो, त्या वेळेस दोन बाळं सोबत दिसली की कधीतरी कुणीतरी विचारतं, ‘जुळं आहे का?’ आम्ही म्हणतो, ‘जुळं नाही, तिळं आहे. एक घरी आहे.’ विचारणारा हैराण होऊन बघतो. आम्ही सगळ्या आई मिळून हे ठरवलं आहे, ‘बाहेर, दवाखान्यात अथवा कुठेही बाळांना सोबत न्यायचं असेल तर तिथं यांना आपली मुलं म्हणूनच न्यायचं. संस्थेतील बाळं, किंवा बिचारी बाळं असं म्हणून कुणीही यांना संबोधलेलं आम्हाला आवडत नाही. आमची बाळं ही अनाथ नाहीत मुळी, बाहेरचे लोक यांना अनाथ, बिचारे म्हणणारे कोण! आमचं ‘पाखर संकुल’ हे एक मस्त कुटुंब आहे आणि आम्ही सगळे या कुटुंबाचे अविभाज्य भाग आहोत.

आमच्या इथं एक ‘ईश्वर’ नावाचं बाळ होतं. ते सारखं आजारी असायचं, आम्हाला फारसं माहिती नव्हतं, त्याला नेमका काय त्रास होता ते! आम्ही मात्र त्याला दवाखान्यात नेणं, त्याच्यासोबत राहणं हे सगळं करायचो. दरवेळेस ईश्वरला दवाखान्यात न्यावं लागणार असं म्हटलं की ‘धस्स’ व्हायचं, पण लगेच विचार यायचा, ‘आपल्या ईश्वरला काही होणार नाही, तो नक्की परत येईल.’ दरवेळेस तो बरा होऊन परत यायचा. पुढं त्याला त्याचे हक्काचे आई-बाबा भेटले आणि आता तो मस्त त्याच्या हक्काच्या घरी असतो.

जेव्हा बाळ संस्थेत येतं, त्या वेळेस वाटतं ‘कसं एवढय़ाशा जिवाला कुणी आपल्यापासून दूर करू शकतं?’ मग माई आम्हाला सांगतात, ‘अगं, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात. तिथल्या नकारात्मक वातावरणात राहण्यापेक्षा, आपल्या इथं ते जास्त सुरक्षित आणि प्रेमानं राहतं. शिवाय त्यांना थोडय़ाच दिवसात हक्काचं घर आणि आईबाबा भेटतातच. आपण नेहमीच या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन प्रेमानं सगळं करत राहायचं. त्या बाळाला त्याच्या हक्काच्या घरी जाताना आपणही आनंदी व्हायचं.’ मुलं जेव्हा दत्तक प्रक्रियेतून त्यांच्या हक्काच्या घरी जातात, त्या वेळेस आनंद तर होतोच, परंतु वाईटही वाटतं, डोळ्यात आनंदाश्रू आणि दु:खाश्रू दोन्ही असतात.’’

बऱ्यापैकी सगळ्याच बालसंगोपन केंद्रात आपल्याला थोडय़ाफार फरकाने हाच भाव अनुभवायला मिळेल. काही अपवाद हे प्रत्येक गोष्टीलाच असतात. काही संस्थांमध्ये पैशाचा गैरवापर, मुलांसोबत गैरवर्तणूक, कामात गोंधळ अशा समस्या दिसतात. मला नेहमी वाटतं, बालसंगोपन केंद्र आणि दत्तक प्रक्रिया या विषयात काम करणारे सगळे लोक हे थोडे जास्त संवेदनशील आणि प्रामाणिक असावेत. हे सगळे लोक या मुलांच्या अस्तित्वाचा पाया रचण्यात मोठय़ा प्रमाणात सहभागी असतात. प्रत्येक संस्थाचालकाने आपल्या संस्थेतील कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणं हे महत्त्वाचं ठरतं ना!

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org