आम्ही दोघांनी ठरवलंय की, सारा सोळा-अठरा वर्षांची होईपर्यंत कुणीही दत्तक या विषयावर तिच्याशी बोलायचं नाही, ती कळत्या वयात आली की ती दत्तक आहे हे सांगायचं काम सोपे होईल. माझी इच्छा आहे, माझ्या या प्रवासातून काही लोकांना प्रेरणा मिळावी आणि पालकत्वाचा हा प्रवास अधिक समृद्ध व्हावा.

संगीता आणि तिचा जोडीदार आकाश या दोघांनी मिळून लग्नाआधी एक स्वप्न बघितलं, आपलं एक मूल दत्तक प्रक्रियेतून घरी यायला हवं. मोठय़ा मुलाच्या जन्मानंतर पाच वर्षांने त्यांची लेक सारा दत्तक प्रक्रियेतून घरी आली. संगीताचे आगळेपण म्हणजे ती स्वत: पाच महिन्यांची असताना दत्तक प्रक्रियेतून तिच्या कुटुंबात आली होती. किशोरवयात तिला हे सत्य कळलं, त्यानंतरची तिची घालमेल व ओढाताण यातून स्वत:च्या जिद्दीने आणि घरच्यांच्या पाठिंब्याने ती कशी सावरली याची ही कथा : ‘‘मी जेव्हा सातवीत होते तेव्हा माझ्या मैत्रिणी मला खेळताना म्हणाल्या, ‘तू गोरी आणि तुझा भाऊ व आई बाबा सगळे सावळे, तुला शंका नाही येत का?’ मला तोपर्यंत कधी कुणी असं बोललं नव्हतं किंवा माझ्या मनात असा विचारही डोकावला नव्हता. पण त्या दिवशीपासून मी विचार करू लागले, असं का असावं? थोडासा धीर करून मी आईजवळ बोलले तर आईला रडूच आलं, तेव्हा मलाही काही कळेना की काय होतंय. मग बाबांनी जवळ घेऊन मला सगळं सत्य समजावून सांगितलं.

माझे कुटुंब हे तमिळ भाषिक, बाबा नोकरीत आणि आई गायिका, भाऊ  चार वर्षांनी थोरला. बाबा म्हणाले, ‘मला माझ्या एका मित्राकडून दत्तक घेण्याबद्दल प्रेरणा मिळाली आणि माझी इच्छा होती की आपलं एक मूल हे दत्तक प्रक्रियेतून घरी यावं.’ बाबा म्हणतील तो अखेरचा शब्द, त्यामुळे आईने नकार देण्याचं काही कारण नव्हतं. आई-बाबा एका बालसंगोपन केंद्रात आले, तिथे आल्यावर आई म्हणाली, ‘मी तिच्याकडे बघून हसले, त्यांना वाटलं हीच आपली मुलगी.’ लगेच सगळी दत्तक प्रक्रिया सुरू झाली आणि थोडय़ाच दिवसात मी घरी आले. नंतर कधी आईबाबांना या विषयी माझ्याशी बोलण्याची गरज वाटली नाही. सगळं काही छान व्यवस्थित चालू होतं. बारा वर्षे आईबाबांच्या किंवा इतरांच्या वागण्यातून, बोलण्यातून कधीही हे जाणवलं नाही. खरंतर मला कधीही काही शंका आली नसती. मी मैत्रिणीचं बोलणं आईला सांगितलं म्हणून बाबांनी माझी शंका दूर करण्यासाठी सगळं सांगितलं.

माझ्या मनात हलकल्लोळ माजला कारण माझ्या अस्तित्वालाच धक्का लागला. प्रत्येक वेळेस समाजाकडून किंवा नातेवाईकांकडून मिळणारी वेगळी वागणूक खटकणारी वाटू लागली. हे माझ्यासोबत का असं होतंय म्हणून मनाची सारखी तडफड सुरू झाली. माझं दु:ख कोणीही समजून घेत नाही व सगळेच परके असा भाव मनात येत असे. मला आठवतं, एकदा आम्ही सगळे माझ्या नातेवाईकांकडे गेलो, तिथे सगळ्यांच्या चपला नीट लावण्याचं काम मला सांगितलं तेव्हा वाटलं, अशी तुच्छ कामे मलाच का देतात. मला आईबाबा नेहमी बोलायचे ‘कुणी काही बोललं किंवा वेगळं वागवलं याचा दत्तक असण्याशी संबंध लावू नकोस. समजा, तुला तसं वाटलं तरी तुझा स्वाभिमान तुलाच जपायचा आहे.’ मला बाबांचा नेहमीच मोठा आधार वाटला, त्यातूनच मी एक खंबीर व्यक्ती होत गेले. आज मागे वळून पाहिलं तर वाटतं, आई बाबा आणि भाऊ या सगळ्यांनी मला साथ दिली म्हणून त्या सगळ्या अडचणी पार करून आज इथवर आले.

मधल्या काळात या सगळ्याचा अभ्यासावर खूप परिणाम झाला. पुढे मी जिद्दीने पदव्युत्तपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि स्वत:च्या पायावर उभी राहिले. नोकरीच्या ठिकाणी आकाश भेटला आणि एक जिवाभावाचा सखा झाला. त्याला मी जेव्हा सांगितलं की दत्तक प्रक्रियेतून माझ्या घरी आलेय, तेव्हा आकाश म्हणाला, ‘आपण या विषयावर हे पहिलं आणि शेवटचं आज बोलतोय, मला आणि आपल्याला या गोष्टीमुळे काहीही फरक पडणार नाही.’ केवढा आनंद झाला आणि दिलासा मिळाला मला हे सगळं ऐकून! त्याला मी म्हणाले, ‘आपण हे तुझ्या घरीपण सांगू या आणि मगच लग्न करू या. त्याच्या घरच्यांनी पण हे व्यवस्थित समजून घेतलं. माझे आईबाबा आणि भाऊ या सगळ्यांनी आमचं लग्न फारच थाटामाटात केलं. प्रत्येक क्षण माझ्यासाठी विशेष केला. आज सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही बारा र्वष आनंदाने संसार करत आहोत.

मधल्या काळात बाबा गेले, भाऊ शिकून देशाबाहेर स्थायिक झाला, आई स्वतंत्रपणे जवळच राहते. पण आजही दत्तक विषय निघाला कीआईच्या चेहऱ्यावर भय दिसतं. या विषयी बोलायचं म्हटलं की मलाही सुकलेली जखम कुणीतरी कुरतडतंय असं वाटतं. पण लगेच आकाशच्या डोळ्यात दिसतं, ‘मी आहे तुझ्यासोबत.. आजही आणि नेहमीच!’ हे असं एक नातं आयुष्यात लाभलं आणि जगायची नवी उमेद मिळाली. आकाश म्हणतो, ‘तुला खरंच तुझी जन्मदात्री कोण हे जाणून घ्यावंसं वाटत नाही का?’ मी त्याला म्हणते, ‘कितीही माझी इच्छा असली तरी आज आपलं हे जे सुखी घरटं आहे ना, त्यात मला कुठलंही वादळ नकोय!’

लग्नाच्या आधी ठरवल्याप्रमाणे एका मुलानंतर आम्ही दत्तक प्रक्रियेसाठी अर्ज केला. परंतु पुढल्या दोन महिन्यातच मी परत गर्भवती झाले, वाटलं नियतीला बहुतेक दुसरं मूलही माझ्याच उदरातून जन्माला घालायचं आहे. पण तीन महिन्यात गर्भावस्थेतच माझं बाळ गेलं, खूप हताश झालो आम्ही, काय होतंय काहीच कळेनासं झालं. दोन आठवडय़ानंतर एक दिवस पूजा करत असताना संस्थेमधून फोन आला, ‘तुमचं बाळ तुमची वाट बघतंय!’ मी आनंदाने अक्षरश: नाचू लागले. थोडय़ाच वेळात आम्ही संस्थेमध्ये पोचलो, जेव्हा बाळाला बघितलं तेव्हा फक्त बाळाची मला मूठ दिसली, पहिल्या नजरेत जाणवलं, ‘हेच आपलं पिल्लू.’ थोडय़ाच दिवसात सारा घरी आली. आज सारा दोन वर्षांची आहे.

आम्ही दोघांनी ठरवलंय की, सारा सोळा-अठरा वर्षांची होईपर्यंत कुणीही दत्तक या विषयावर तिच्याशी बोलायचं नाही, ती कळत्या वयात आली की हे सांगायचे काम सोपे होईल. आधी मी माझ्या मुलाला तयार करणार आहे, म्हणजे त्याला हे सांगीन की तुझी आईसुद्धा दत्तक प्रक्रियेतून तिच्या आईबाबांच्या आयुष्यात आलेली आहे. मला विश्वास आहे की तो हे समजून घेईल. जेव्हा साराला हे सत्य सांगू तेव्हा आम्ही तिघेही सारासाठी भक्कम आधार बनलेले असू. माझा पूर्ण विश्वास आहे की लहान वयात तिला ही सगळी गुंतागुंत कळणार नाही. या वयात भावनिक द्वंद्वातून तिने जाण्याचं काहीही कारण नाही. मला बरेच जण म्हणतात, ‘तिला लहान वयात सांगितलं तर तिला स्वत:चा स्वीकार करणं सोपं होईल;’ पण मला स्वत:ला हे मान्य नाही. मी माझ्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक सगळ्यांना या बाबत सारा घरी येण्याच्या आधी बोलून ठेवलंय. सगळ्यांनी तिला शंभर टक्के स्वीकारलं आहे. त्यामुळे तिला बाहेरून कळण्याचा प्रश्न येणार नाही याची मला खात्री आहे.

माझी इच्छा आहे, माझ्या या प्रवासातून काही लोकांना प्रेरणा मिळावी आणि पालकत्वाचा प्रवास अधिक समृद्ध व्हावा. कुठल्याही मुलावर ‘दत्तक’ हा शिक्का न मारता समाजाने याकडे एक पवित्र विधी म्हणून बघितलं तर हेच नातं अधिक नैसर्गिक होईल.’’

साराच्या आईच्या दृष्टिकोनाविषयी वाचकांच्या मनात विचारचक्र नक्कीच सुरू झाले असतील. खरंच आपण सगळे याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू शकतो का? दत्तकविधी असा आहे की, ज्यातून आपलंच बाळ आपल्या घरी येत असतं, नाही का? तुम्हाला काय वाटतं?

संगीता बनगीनवार –  sangeeta@sroat.org