News Flash

श्रुतीची कहाणी

वयाच्या दहाव्या वर्षीपासून श्रुती आम्हाला तिच्या जन्मदात्रीबद्दल विचारू लागली,

श्रुती १२-१३ वर्षांची झाल्यानंतर तिच्या वागण्यात फारच फरक पडू लागला. जन्मदात्रीचा शोध तिला वेगळं वागायला भाग पाडू लागला. पण आई-बाबांनी संयमाने हे दिवसही जातील म्हणत तिला सांभाळलं आणि आज त्याचाच परिणाम म्हणून श्रुती संसारात रमली आहे. पण दरम्यानच्या काळात याविषयी लोकांकडून काय काय ऐकावं लागलं. त्यांना विचारावंसं वाटतं, तुम्ही जन्माला घातलेलं मूलही चुकीचं वागू शकत नाही का?

किशोरवयात होणारे बदल आणि त्यामुळे वागणुकीत येणारी अरेरावी, पालकांसोबतचे नात्यातील अंतर हे आजकाल आपण बऱ्याच घरांत अनुभवतोय, बघतोय. परंतु हेच मूल जर दत्तक प्रक्रियेतून घरी आलं असेल तर लगेच अशा वागण्याला समाजातून आणि कधी कधी कुटुंबातूनही वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं, आपल्या वागण्यातील अशी तफावत ही खरंच त्या मुलाच्या भवितव्यासाठी पोषक आहे का?

आज अशाच एका मुलीच्या आणि तिच्या पालकांच्या आयुष्यात थोडंसं डोकावू या.. या कथेत पात्रांची नावं बदललेली आहेत. श्रुती सहा महिन्यांची असताना दत्तक प्रक्रियेतून घरी आली, आई-बाबा दोघेही सुशिक्षित, बाबा नोकरीत तर आई व्यवसाय करणारी. आईशी जेव्हा मी बोलले तेव्हा ती २५ वर्षे मागे भूतकाळात गेली आणि सांगू लागली, ‘‘माझं स्वप्नं होतं, आपलं बाळ हे दत्तक प्रक्रियेतून घरी यावं, लग्नानंतर २ वर्षांनी आम्ही दोघांनी दत्तक प्रक्रिया सुरू केली. श्रुती ३ महिन्यांची असताना तिला आम्ही पहिल्यांदा भेटलो. सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला ३ महिने गेले. श्रुतीचं बालपण, तिच्यासोबत मजेत वेळ घालवणं, पालक होणं हे आम्ही दोघेही भरभरून अनुभवत होतो. सगळेच नातवाईक जवळ राहत असल्याने नेहमीच एकत्र भेटणं, सोबत राहणं व्हायचं तसंच सुट्टीत २-३ आठवडे भटकंतीला आवर्जून जात असू. ती अगदी लहान होती तेव्हापासून भावंडं हवीत म्हणून हट्ट करायची, आमचं वय आणि सगळ्या जबाबदाऱ्या बघून आम्ही तिला समजावून सांगितलं, ‘तूच आमचं विश्व आहेस.’ तिच्या वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिच्याशी दत्तक प्रक्रियेबद्दल बोलायला सुरुवात केली. तिच्या वेगवेगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं आम्ही दिली. तिला आवडेल अशा शाळेत तिचं शिक्षण सुरू झालं, तिचे छंद जोपासले जावेत म्हणून वेगवेगळे क्लासेस लावले. श्रुती तिसऱ्या वर्षांपासूनच गाण्याच्या क्लासला जाऊ लागली, सुरेल गाऊ लागली, नंतर तिला नृत्याची आवड निर्माण झाली. शास्त्रीय नृत्याचा तिनं बरेच वर्षे अभ्यास केला. बघणाऱ्या माणसाला पूर्ण आनंद देईल असं श्रुतीचं नृत्य असतं. तिचा बाबा नोकरी सांभाळून श्रुतीची शाळा, तिचे क्लासेस सगळं जुळवून तिला ने-आण करायचा. असं सगळं काही छान चालू होतं.

वयाच्या दहाव्या वर्षीपासून श्रुती आम्हाला तिच्या जन्मदात्रीबद्दल विचारू लागली, आम्ही तिला संस्थेत घेऊन गेलो. तिथे त्यांनी सांगितलं, ‘तू १८ वर्षांची झालीस की तुला जन्मदात्रीबद्दल माहिती देऊ  शकू आणि पुढची प्रक्रिया काय असेल ते त्या वेळेस समजावून सांगू.’ पुढील काही दिवसांत माझंही काम खूप वाढलं, बरेचदा बाहेरगावी कामानिमित्त जावं लागायचं. मला ही सगळी तारेवरची कसरत होती पण बाबा आणि आजी असल्यानं तीही सहज व्हायची. परंतु श्रुती १२-१३ वर्षांची झाल्यानंतर तिच्या वागण्यात फारच फरक पडू लागला. एवढी की ती कधी तरी घर सोडून जात असे. काहीही न सांगता, घरातून निघून जाणं हा जणू तिचा छंदच बनला. दर वेळेस पोलिसांत तक्रारी, तिची शोधाशोध यात आम्ही दोघेही अगदी भरडून निघत होतो. बरं, श्रुती घरी आली की एकदम सर्वसामान्य मुलांसारखी प्रेमाने राहायची. सगळं वागणं असं असूनही तिला स्वत:ला आतून त्रास होत होता. ‘माझी जन्मदात्री कोण?’ हे शोधण्याचा तिचा हट्ट आणि आपण आपल्या मुलीला या सगळ्यातून जाताना मदत करू शकत नाही याचं दु:ख असायचं ते निराळंच! या काळात परीक्षा म्हटलं की श्रुती घरातून निघून जाण्यासाठी निमित्त शोधायची, पुढे तिनं जेमतेम ११वी करून शिक्षण अर्धवट सोडून दिलं. पुढे व्यसनाच्या आहारी जाणं, मग घरातून न सांगता पैसे घेऊन जाणं, वेळप्रसंगी चोरीही करणं, हे सगळे प्रकार अनुभवल्यावर सुद्धा वाटायचं, यातूनही काहीतरी मार्ग नक्की निघेल आणि श्रुती सुरळीत आयुष्य जगेल. या सगळ्या काळात, तिच्या स्वत:च्या तब्येतीवर, आमच्या तब्येतीवर बरेच परिणाम झाले. तिला यातून बाहेर येण्यासाठी, मदत व्हावी म्हणून आम्ही तिची संस्था, बरेच सल्लागार, मनोदोषचिकित्सक सगळ्यांची मदत घेतली, परंतु हवा तसा काही उपयोग झाला नाही. या सगळ्या लोकांसोबतचे आमचे अनुभव तर थोडय़ाफार प्रमाणात औदासीन्यपूर्ण असेच आहेत. बाबा तर म्हणतो, ‘आम्हाला एकही सल्लागार किंवा मनोदोषचिकित्सक असा भेटला नाही की ज्याने दत्तक हा विषय घेऊन काही विशेष अभ्यास केलेला आहे, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही.’ श्रुतीने वयाची १८ र्वष पूर्ण झाल्यावर आम्ही तर विचार केला, पोरगी घरी आली की आपली, बाहेर गेली की फक्त ‘ती सुखरूप असू दे’, असं म्हणायचं आणि आपलं आयुष्य जगत राहायचं.

७-८ वर्षे अशीच गेली आणि श्रुती हळूहळू घरात, आमच्यात रुळताना दिसू लागली. आम्हीही तिला जुन्या आठवणी काढून काही बोलत नसू. सगळं सुरळीत होईल असा विश्वास ठेवून आम्ही तिला पूर्ण साथ द्यायचं ठरवलं. तिनं आपल्या जन्मदात्रीला भेटण्याचा तिचा हट्टही सोडून दिला. तिनं परत तिचा नृत्याचा अभ्यास सुरू केला. मी तिला नेहमी म्हणायची, ‘शिक्षण पूर्ण करून तू कुठे नोकरी केली पाहिजेस असा आमचा अजिबात अट्टहास नाही, परंतु तुला ज्यात आवड आहे त्यात प्रावीण्य मिळव आणि पुढे त्यातच काम करून स्वावलंबी हो.’ तिला असं बदलताना बघून आम्हाला तसंच आमचे नातेवाईक आणि मित्रपरिवार या सगळ्यांना खूप आनंद झाला. तिच्या गडबडीच्या काळात तिला मागे लागून मी ‘ब्युटी पार्लर’चा कोर्स करायला लावला होता, तेही तिनं मनावर घेऊन कामाला सुरुवात केली. स्वत:चं तिनं ठरवलं की, ‘आई, मी काम करून पैसे कमावून स्वत:चं पार्लर सुरू करणार आहे आणि स्वत:चे नृत्याचे क्लासेससुद्धा!’ भरून पावलं त्या दिवशी! मी तिला म्हणाले, ‘श्रुती तुला हवी तितकी मदत करू बेटा आम्ही, तू अशीच आमच्या सोबत राहून तुला हवं ते काम कर.’ हळूहळू श्रुतीचं कामाचं बस्तान बसू लागलं, तिला स्वयंपाकाची भारी आवड. सवड मिळाली की आम्हाला नवनवीन पदार्थ बनवून खाऊ  घालायची. खरंच, ती ७-८ र्वष वेगळ्याच अनुभवांची होती हे खरं. आज श्रुतीचं लग्न होऊन ती संसारात रमली आहे. तिचा नवराही तिला साथ देणारा मिळाला. श्रुतीला एक गोंडस कन्या आहे. एक दिवस मला म्हणाली, ‘आई, मला आता कळलं गं, पालकत्व काय असतं ते आणि खरंच मी तुम्हाला किती त्रास दिला!’ खरं सांगू का पण, श्रुतीला असं बघून आनंद होतो. आपली लेक सुखी समाधानी असणं यापेक्षा दुसरं सुख नाही.’’

श्रुतीची कहाणी ऐकून नेहमीच माझ्या डोळ्यात पाणी येतं. श्रुती आणि तिच्या आई-बाबांच्या कठीण काळात जसे सोबत करणारे मित्र होते, तसेच दोष देणारे, फक्त वाईटच बघणारे बरेच लोकसुद्धा भेटले या कुटुंबाला. असेही लोक भेटले ज्यांनी ‘कुठलं रक्त’ म्हणून बोट दाखवलं तर, ‘दत्तक नसतं घेतलं तर बरं झालं असतं, दत्तक मुलं अशीच असतात.’ इथपर्यंत सगळे सल्ले ऐकून झाले आहेत. खरंच जन्माला आलेलं पोटचं मूल नाही का असं वागू शकतं? खरं तर प्रत्येक मूल हे वेगळं, त्याचे पालकही वेगळे. त्याचं आजूबाजूचं वातावरण, त्या मुलाचं व्यक्तिमत्त्व आणि त्याच्यावर होणारे संस्कार हे सगळं गणित जुळून आलं की एक छान कुटुंब बहरताना दिसतं. दत्तक प्रक्रियेतून आलेलं मूल लहानपणीच वियोगावस्थेतून गेलेलं असतं, आपण त्या अवस्थेमधून गेलेले नसतो त्यामुळे त्याचं दु:ख आपण अनुभवलंच नसल्यानं त्यावर सल्ले द्यावेत की त्यांना यातून बाहेर येण्यासाठी लागणारी मदत करावी? अशा कठीण काळात मुलांना फक्त त्यांच्यासोबत, त्यांना समजून घेणारं कुणी तरी हवं असतं, बनू या का अशा मुलांचा आधार? आपण समाज म्हणून फक्त दोष दाखवण्यापेक्षा, अशा कुटुंबाचे भाग बनून येणाऱ्या समस्या सोडविण्यास हातभार लावू या का?

संगीता बनगीनवार sangeeta@sroat.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2017 1:06 am

Web Title: behavioural changes during adolescence sudden behavior changes in kids
Next Stories
1 अविस्मरणीय स्वागत
2 हवं समाजभान
3 दत्तक एकल पालकत्व
Just Now!
X