News Flash

चाळिशीनंतरचं पालकत्व

सध्या माझ्याकडे चाळिशी ओलांडलेले काही पालक समुपदेशनासाठी येतात.

एक-दीड महिन्यापूर्वी ‘कारा’ने (Central Adoption Resource Authority) काही नियमावलीत बदल केले आहेत. त्यातील एक बदल म्हणजे, नवीन नियमानुसार चाळिशी ओलांडलेल्या अविवाहित स्त्रिया यांना दत्तक प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत बढती मिळेल. याचाच अर्थ ज्या स्त्रिया एकल पालकत्व करू इच्छितात त्यांना इतर पालक होऊ इच्छिणाऱ्यांपेक्षा बाळ घरी येण्यासाठी फार काळ वाट बघावी लागणार नाही.

यामागचं जे कारण ‘कारा’ अधिकाऱ्यांनी सांगितलं ते असं, ‘‘चाळिशी ओलांडलेल्या अविवाहित स्त्रिया स्वावलंबी असून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. त्यामुळे दत्तक प्रक्रियेतून आलेलं मूल अशा पालकांसोबत सुरक्षित आयुष्य जगू शकतं. अशा स्त्रिया पुढाकार घेऊन एकल पालकत्व स्वीकारण्याची तयारी दाखवत असतील तर त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे.’’ गेल्या चार-पाच वर्षांत दत्तक प्रक्रियेसाठी अविवाहित स्त्रियांचं अर्ज दाखल करण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. सध्याच्या पिढीत एकल पालक दत्तक प्रक्रियेचा फारसा बाऊ  करताना दिसत नाहीत. परंतु काही संस्था या फक्त नवरा-बायको असलेल्या घराला संपूर्ण कुटुंब समजतात आणि अशाच घरात मुलं जावीत, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे अशा काही संस्थांनी मूल दत्तक प्रक्रियेतून घरी पाठवणं बंद केलं आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार दत्तक प्रक्रियेमध्ये उपलब्ध मुलं आहेत २०००, त्यापैकी जवळपास पन्नास टक्के मुलं ही वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त नाहीत. दत्तक घेण्यासाठी अर्ज केलेल्या पालकांची सध्याची संख्या आहे जवळपास १६०००. सध्या दर महिन्याला १००० च्या आसपास अर्ज येतात आणि फक्त २५०-३०० मुलं दर महिन्यात दत्तक प्रक्रियेतून घरी येतात. ही तफावत बघता सध्या पालकांना आपलं मूल घरी येण्यासाठी एक ते दीड र्वष वाट बघावी लागते. परंतु चाळिशीच्या पुढील स्त्रियांची संख्या ही फक्त शेकडय़ात आहे. या व्यस्त प्रमाणात वरील निर्णय हा वयाने मोठय़ा असलेल्या स्त्रियांसाठी फायद्याचा ठरला आहे. ‘कारा’ने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे. या निर्णयानंतर आमच्या ‘पूर्णाक’मधील प्रतीक्षा यादीत बढती मिळालेले काही पालक आहेत.

सध्या माझ्याकडे चाळिशी ओलांडलेले काही पालक समुपदेशनासाठी येतात. या पालकांची मुलं ही ४-१० या वयोगटातील आहेत. मीसुद्धा ३८ व्या वर्षी एकल पालक झाले. वयाच्या पस्तिशीनंतरचं पालकत्व थोडंसं वेगळं आव्हान असतं. एकल पालक असो किंवा नवरा- बायको, दोन्ही प्रकारच्या पालकांना हे थोडय़ाफार फरकाने आव्हानात्मक वाटत असतं. वयाच्या या काळात भरपूर काम करून पैसे कमावण्याचा उत्साह असतो. त्यात जेव्हा पालक होण्याचा निर्णय घेतला जातो त्या वेळेस आपलं करिअर आणि घर यात तारांबळ, ओढाताण होण्याची शक्यता खूप जास्त असते. ज्या वेळेस दत्तक प्रक्रियेत आपण असतो त्या वेळेस आपल्याला याची जाणीव असते की, दोघांपैकी एकाला घर सांभाळून बाळाची काळजी घ्यायची आहे, आणि बऱ्याचदा ही व्यक्ती म्हणजे आई असते. परंतु एकल पालकत्वामध्ये ती व्यक्ती दोन्ही भूमिका वठवत असते आणि बाळ घरी आलं की काम कुठे आणि कसं थांबवायचं आणि घरी किती वेळ द्यायचा याचं गणित ठरवल्याप्रमाणं होईलच असं नाही. अशा परिस्थितीमधून जाताना बऱ्याचदा एकल पालक कधी एकटे, तर कधी तणावात असतात. बऱ्याच एकल पालकांना त्यांच्या आई-वडिलांचा तसा आधार असतो; परंतु कमी-जास्त प्रमाणात हा तणाव बऱ्याच एकल पालकांना अनुभवावा लागतो.

स्वत:कडून खूप छोटय़ा छोटय़ा अपेक्षांमुळे हे तणाव निर्माण होत असतात. त्यातील काही उदाहरणं म्हणजे : एकदा एक आई म्हणाली, ‘‘ताई, या मुलांसोबत खेळताना माझी एनर्जी कमी पडते, खूप दमायला होतं. कधी कधी तर वाटतं आपल्या बाळाला जे अपेक्षित आहे ते आपण करूच शकत नाही. या वयात जे जनुकीय बदल होतात त्यामुळे चिडचिड वाढलेली असते आणि त्याचा परिणाम माझ्या मुलासोबतच्या नात्यावर होताना दिसतो मला. काय करावं कळत नाही?’’

मुंबईवरून एक पालक काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते. ते म्हणाले, ‘बारा-पंधरा र्वष फक्त काम आणि काम करतोय आम्ही. ठरवल्याप्रमाणे बाळ घरी आल्यावर आईने नोकरी सोडली. तसे आम्ही आता आर्थिकदृष्टय़ा सधन आहोत, स्वत:चं घर आहे, गाडी आहे. पालक झाल्याचा आनंद आम्ही भरभरून घेत आहोत, मुलगा घरी आल्यामुळे आम्हाला कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद आहे. परंतु इतक्या वर्षांची सतत काम करायची सवय, त्यामुळे कुठेतरी रिकामपणा जाणवतो. काहीतरी हरवलं आहे असं वाटतं.’’

एक पालक तर म्हणाले, ‘‘आमच्या वयातील, अंतर बघून बरेच जण आम्हाला विचारतात, ‘तुम्ही हिचे आजीआजोबा आहात का?’ मुलीला आणि आम्हा दोघांना याचा नक्कीच मानसिक त्रास होतो.’’ एक एकल पालक म्हणाली, ‘‘आई-बाबांसोबत मुलीला घरी ठेवून नोकरी करणं शक्य नाही, म्हणून मुलीला शाळेनंतर पाळणाघरात पाठवते. मुलीची फारशी इच्छा नसते, त्यामुळे हे करताना मनाची खूप घालमेल होते, कधी कधी अपराधी वाटतं.’’

बरेचदा एकल पालक हे आपल्या आईवडिलां सोबत राहत असतात. त्यामुळे बाळ घरी येईपर्यंत फक्त नोकरी/व्यवसाय करणं आणि स्वत:चे छंद जोपासणं हे सहज शक्य असतं. ज्या वेळेस बाळ घरी येतं त्या वेळेस आपलं काम कमी करून घरी बाळासोबत वेळ घालवणं अतिशय महत्त्वाचं आहे हे समजून प्रत्येक पालक आपल्यापरीने हे साध्य करत असतो. त्यातून बाळ दत्तक प्रक्रियेतून आलेलं असेल तर त्याच्यासोबत जास्त वेळ घालवणं हे अधिकच जरुरी असतं. यामागे वेगवेगळी कारणं आहेत, बाळ घरी यायच्या आधी संस्थेत असल्यामुळे बऱ्याच मुलांसोबत ते राहत असतं, तसेच बऱ्याच आया आणि मावश्यांसोबत त्याला राहायची सवय असते, इतकंच काय संस्थेची जागा आणि घर यामध्ये फार मोठा फरक असतो, एकूण काय तर बाळ संस्थेतून घरी आल्यानंतर सगळं वातावरण हे त्याच्यासाठी बदललेलं असतं.

बाळ घरी आल्यावर एकल पालक त्याला भरपूर वेळ देऊ  इच्छितात, सुरुवातीचे काही महिने देतातसुद्धा. परंतु इतकी र्वष काम केल्यामुळे कामाची सतत सवय व स्वत:ची बौद्धिक गरज याची सांगड घालता घालता काही पालक आज तणावामधून जाताना दिसतात. आर्थिकदृष्टय़ा सगळं नीट असूनसुद्धा भविष्यात परत आपण काम करूशकू का? असा कामातून घेतलेला ब्रेक पुढे जाऊन त्रास देईल का? असे बरेच प्रश्न या पालकांच्या मनात असतात.

चाळिशीनंतरच्या एकल पालकांना अजून एक विचार करायला लावणारी बाब म्हणजे, त्यांचे आईबाबा वयस्कर असतात. त्यामुळे त्यांचं उतारवय, आजारपण आणि आलेल्या बाळाचं लहानपण, त्यातच स्वत:तले होणारे जनुकीय बदल, अशा एक ना अनेक कारणांमुळे तणाव निर्माण होतो.

ज्या वेळेस हे पालक माझ्याकडे येतात, त्या वेळेस त्यांना मुलांसोबत राहणं आणि त्यात आनंद घेणं हे कसं होऊ शकतं हे मी सांगत असते. त्याच वेळेस स्वत:ची बौद्धिक गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळे पर्याय निवडणं, जसं की एखाद्या सामाजिक कामात मदत करणं, मुलांसोबतच्या काही कार्यशाळा घेणं किंवा काही शैक्षणिक प्रोग्राम करणं, घरूनच एखादा व्यवसाय करणं, जेणेकरून आपल्या मुलांना आणि घराला वेळ देऊन काम केल्याचं समाधान नक्कीच मिळू शकेल.

या कारणाने आम्ही एकल पालकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा भविष्यात घ्यायचा विचार करत आहोत, जेणेकरून पालकांना याची जास्तीतजास्त मदत होईल. अशा कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यांत होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ‘पूर्णाक’सारखे मदतगट या पालकांना नक्कीच उपयोगी ठरतील.

‘कारा’ने केलेला हा बदल अगदी योग्य आहे. शिवाय चाळिशीनंतरच्या पालकांसाठी दत्तक प्रक्रियेच्या आधी आणि नंतरसुद्धा एक ते दोन वर्ष ठरावीक कार्यशाळा/समुपदेशन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे ज्या वेळेस होईल त्या वेळेस चाळिशीनंतरच्या एकल पालकत्व स्वीकारणाऱ्या पालकांचा प्रवास नक्कीच आनंददायी असेल.

सध्याच्या आकडेवारीनुसार दत्तक प्रक्रियेमध्ये उपलब्ध मुलं आहेत २०००, त्यापैकी जवळपास पन्नास टक्के मुलं ही वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त नाहीत. दत्तक घेण्यासाठी अर्ज केलेल्या पालकांची सध्याची संख्या आहे जवळपास १६०००. सध्या दर महिन्याला १००० च्या आसपास अर्ज येतात आणि फक्त २५०-३०० मुलं दर महिन्यात दत्तक प्रक्रियेतून घरी येतात. ही तफावत बघता सध्या पालकांना आपलं मूल घरी येण्यासाठी एक ते दीड र्वष वाट बघावी लागते. परंतु चाळिशीच्या पुढील स्त्रियांची संख्या ही फक्त शेकडय़ात आहे. या व्यस्त प्रमाणात ‘कारा’ निर्णय हा वयाने मोठय़ा असलेल्या स्त्रियांसाठी फायद्याचा ठरला आहे.

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:21 am

Web Title: marathi articles on parents after 40 years old
Next Stories
1 समंजस स्वीकार
2 जिवाभावाची मैत्रीण
3 पूर्णाकच्या निमित्ताने
Just Now!
X