दत्तक प्रक्रियेतून आलेलं प्रत्येक मूल हे मानसिक गोंधळातून जातंच असं अजिबात नाही. आजच्या लेखातील रती ही नेहमीच आनंदानं तिचे अनुभव सांगायला तयार असते. आम्ही दत्तक प्रक्रियेतून झालेल्या पालकांचा एक मदतगट चालवतो, तसाच किशोर वयातील मुलांचा पण एक गट एकत्र यावा ज्यात रतीसारखी काही मुलं बाकीच्यांसाठी आधार बनतील असा आमचा प्रयत्न आहे आणि ही मुलं खरोखरीच पालकांचा मोठा आधार आहेत.

जसं प्रत्येकाचं बालपण आणि किशोरपण हे वेगळं असतं, तसंच दत्तक प्रक्रियेतून आलेलं प्रत्येक मूल हे मानसिक दोल-आंदोलनातूनच जातंच असं अजिबात नाही. मागच्या लेखातही आपण अश्विनीची कथा वाचली. आज आपण भेटू या रतीला, जी सध्या तिचं नृत्याचं शिक्षण पूर्ण करते आहे आणि सोबत पदवीचा अभ्यासक्रमही पूर्ण करते आहे.

रती मूळची लोणावळ्याची. तिचे बाबा मोहन कडू आणि आई गौरी कडू दोघेही स्वतंत्रपणे व्यवसाय करतात. आमची ओळख तशी बरीच जुनी, रतीला भेटलं की मला नेहमीच एक वेगळी ऊर्जा मिळते. तिचं बोलणं आणि समंजसपणे वागणं हे सगळंच मला भावतं आणि दर वेळेस आमचं नातं आणखीनच घट्ट होत आहे याची जाणीव करून देत असतं. ज्या वेळेस मी या तिघांशी लेखाबद्दल बोलले त्या वेळेस तिघंही खूप मोकळेपणानं बोलले आणि केवळ या लेखासाठी तीन वेळा पुण्याला येऊन त्यांनी चर्चा केली.

गौरी म्हणाली, ‘‘आमच्या लग्नाला चार-पाच र्वष झाली, पण मूल होत नाही म्हणून आमच्या डॉक्टरकडे फेऱ्या सुरू झाल्या. पुढे आणखी तीन-चार र्वष वाट बघितली, परंतु जेव्हा डॉक्टरांनी फक्त आयव्हीएफ हाच एक पर्याय सांगितला तो दिवस आजही मला आठवतो. आम्ही पुण्यात डॉक्टरांच्या दवाखान्यात होतो, तिथे त्यांनी सांगितलं की, आयव्हीएफ करणं किंवा दत्तक घेणं हे दोन पर्याय आहेत तुमच्याकडं. तिथून बाहेर आल्यावर मोहन म्हणाले, ‘गौरी, आपल्याला मूल होणं शक्य नाही, तुझं वय फार नाही, तू माझ्यासोबत राहिलीच पाहिजेस, असा माझा अट्टहास नाही, तू वेगळी होऊन परत नव्याने आयुष्य सुरू करू शकतेस.’ त्या वेळेस मी सांगितलं, ‘आपण दोघं सोबत आलो ते वेगळं होण्यासाठी नव्हे, यातूनही आपण मार्ग काढू या. दत्तक प्रक्रियेतून आपली लेक घरी येऊ  दे.’ मोहन लगेच तयार झाले. आम्ही पुढील तयारीला लगेच लागलो. त्या वेळेस दत्तक प्रक्रिया तशी लवकर पूर्ण व्हायची. आम्ही सगळी कागदपत्रं, अर्ज देऊन वाट बघत होतो. थोडय़ाच दिवसांत आम्हाला बोलावलं गेलं. आमच्या लेकीला भेटायला जायचा दिवस आला. संस्थेत गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं, ‘नियमानुसार तुम्ही तीन मुलींची भेट घेऊ शकता. तिथं संस्थेत आम्हाला एक मुलगी भेटली, तिला काही तरी वैद्यकीय समस्या होती. आम्ही म्हणालो, आमची पोर अशी समस्या घेऊन जन्माला आली असती तर आम्ही जे केलं असतं ते सगळं करू. परंतु संस्थेच्या अधिकारी म्हणाल्या, ‘तुम्ही नऊ र्वष वाट बघून मानसिकदृष्टय़ा खचलेल्या आहात, पुढे न जाणो या बाळाला काही झालं तर तुम्हाला तो धक्का सहन होणार नाही.’ त्यामुळे त्यांनी आम्हाला सुचवलं, की दुसऱ्या बाळाला पण भेटून या. दुसरी मुलगी ‘फोस्टर केअर फॅमिली’कडे होती, म्हणून आम्ही तिथं भेटायला गेलो. तिथं गेल्यावर टपोऱ्या डोळ्यांचं, सावळसं, पाच महिन्यांचं ते गोंडस पिल्लू, आम्हाला बघून खुदकन हसलं. तो क्षण अजूनही आमच्या दोघांच्या मनात तसाच जिवंत आहे. लगेच मी तिला घेतलं आणि आमची ‘रती’ आम्हाला भेटली!’’

रती घरी येणार म्हणून आम्ही सगळ्यांनी जय्यत तयारी केली, सगळे नातेवाईक रती कधी घरी येते याची वाट बघू लागले. थोडय़ाच दिवसांत रती घरी आली. त्याही काळात रती घरी आल्यावर मला माझे बाबा म्हणाले, ‘गौरी, मी खूप खूष आहे, माझी तर इच्छा होती, तू खूप आधी हा निर्णय घ्यायला हवा होतास.’ मला हे ऐकून धन्य वाटलं, अशा पुरोगामी विचाराचे आई-वडील आणि सासू-सासरे असल्याने आमचा सगळाच प्रवास तसा सुखकर झाला. सगळे नातेवाईक आणि रतीचे मित्रमैत्रिणी यांनी कधीही रतीला ‘वेगळी’ वागणूक दिली नाही. आमच्यानंतर लोणावळ्यात बऱ्याच जणांची मुलं दत्तक प्रक्रियेतून घरी आली आहेत. मला तर एकदा लोणावळ्यात ‘आदर्श माता’ म्हणून गौरविण्यात आलं, हे सगळं सुख आम्ही अनुभवलं ते फक्त रतीमुळं!

रती अभ्यासात तशी जेमतेम, पण नृत्य, नाटक हे तिनं नेहमीच आनंदानं केलं. पुढे तिला नृत्यात कर्तृत्व गाजवायचं आहे, त्यासाठी सध्या दर आठवडय़ाला चार दिवस मुंबईला तिच्या गुरूंकडे शिकायला जाते. जुने शाळेचे दिवस आठवले की आम्ही दोघीही आता हसतो, रती नेहमीच अभ्यास कसा टाळता येईल हे बघायची आणि मी तिची पाठ सोडायची नाही. त्यासाठी तिने भरपूर मार पण खाल्ला. तिचे सगळे मित्रमैत्रिणी इंजिनीअिरग, मेडिकल अभ्यासक्रम करत आहेत, पण आम्ही तिला कधीही त्याबद्दल आग्रह केला नाही. आम्ही तिला नेहमीच सांगत आलो, ‘रती, तुला जे आवडतं आणि जे करताना तुला आनंद मिळतो, ते तू कर आणि तोच तुझा व्यवसाय म्हणूनही निवड, परंतु जे कुठलं क्षेत्र निवडशील त्यात मात्र स्वत:ला झोकून द्यायचं हे लक्षात असू दे.’

आम्ही ठरवलं होतं, रती बारा-तेरा वर्षांची झाली की तिला दत्तक प्रक्रियेबद्दल सांगू या. त्याआधीच तिच्या इयत्ता सहावीच्या सुट्टीत खेळत असताना तिला तिची मैत्रीण या विषयाबद्दल बोलली.’’

हा किस्सा रती अतिशय आनंदाने सांगते, ‘‘आम्ही मैत्रिणी बाहेर खेळत होतो, तिथं मला एक मैत्रीण म्हणाली, ‘रती, तुला तुझ्या आईबाबांनी अनाथाश्रमातून आणलंय.’ मला फारसं काही कळलं नसावं, तरीही मी तिला म्हणाले, ‘तुला तर कचराकुंडीतून आणलंय.’ आणि तशीच रागात घरी आले. आईला म्हणाले, ‘आई, माझी मैत्रीण मला म्हणाली तुम्ही मला अनाथाश्रमातून आणलंय, म्हणजे काय गं?’ आईनं मला थोडंसं शांत केलं आणि आमच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. थोडय़ाच दिवसांनी आम्ही संस्थेला भेट दिली.’’

गौरी म्हणाली, ‘‘खरं तर मी थोडी घाबरले होते, रती हे सगळं कसं घेईल? तिला काही त्रास नाही ना होणार? थोडे दिवस रती शांत शांत असायची, मला भीती वाटायची आपली रती कोशात तर नाही ना जाणार? परंतु रती तशी खूप समंजस आणि मुळात तिला कुठली गोष्ट किती ताणायची आणि सोडून द्यायची हे छान जमतं, त्यामुळे रतीला ‘दत्तक असणे’ याचा फारसा कधी त्रास झालाच नाही.’’

दत्तक या विषयाबद्दल रतीचं गणित खूपच सोपं आहे, ती म्हणाली, ‘‘मावशी, अगं, जेव्हा मला लोक विचारतात, ‘तू तुझ्या आईसारखी दिसत नाहीस.’ त्या वेळेस मी लगेच उत्तर देते, ‘मी बाबांसारखी दिसते.’ मुळात लोक जेव्हा माझा रंग, दत्तक याविषयी काहीही बोलले की मी एवढाच विचार करते, ‘या लोकांची विचार करायची कुवत एवढीच आहे, सोडून देऊ या.’ असं केलं की पुढचं माझंच काम सोपं होतं. लहानपणी मला जे लोक ‘सावळी’ म्हणून ‘दिसायला चांगली नाही’ या प्रकारात बघायचे, तेच लोक आता, ‘रती, तू किती स्मार्ट आहेस!’ असं म्हणतात. त्यामुळे मला तरी ‘माझं दिसणं, मी कशी घरी आले? माझ्याबद्दल लोकांची काय मतं आहेत?’ या सगळ्यांपेक्षा ‘आजचं माझं जीवन, माझे आई-बाबा, त्यांनी दिलेलं संस्कार’ हे जास्त महत्त्वाचे वाटतात.

रतीचं व्यक्तिमत्त्व, तिचे विचार हे आजच्या किशोरवयात असणाऱ्या प्रत्येक मुलाला नक्कीच स्फूर्ती देणारे आहेत, यात काही शंका नाही. ती नेहमीच आनंदानं तिचे अनुभव सांगायला तयार असते. जसा आम्ही दत्तक प्रक्रियेतून झालेल्या पालकांचा एक मदतगट चालवतो, तसाच किशोरवयातील मुलांचा पण एक गट एकत्र यावा ज्यात रतीसारखी काही मुलं बाकीच्यांसाठी आधार बनतील, असा आमचा प्रयत्न आहे. प्रणीत, रती, अश्विनी आणि यांच्यासारखी मुलं अन्य बऱ्याच मुलांना आणि पालकांना मोठा आधार म्हणून काम करतील हे खरं!

संगीता बनगीनवार sangeeta@sroat.org