दत्तक मुलाबद्दल उगाचच दया, कीव किंवा सहानुभूती दाखवून ‘बिचारं मूल’ अशी वागणूक दिली जाते. खरं तर त्यांना स्वाभिमानाने जगू दिलं तरच समाजाने ‘दत्तक’ प्रक्रिया स्वीकारली असं म्हणता येईल. चुकीची सहानुभूती दाखवल्याने आत्मविश्वास हरवलेल्या आणि नंतर त्याच्याशी सामना केलेल्या शर्वरीची ही कहाणी.

आपण या लेखांमधून आजपर्यंत बऱ्याच वयोगटातील पालकांना आणि मुलांना भेटलो परंतु दहा ते सोळा वर्षांची मुले अजूनही फारसं बोलायला तयार होताना दिसत नाहीत. परंतु आजची आपली कथा आहे ती शर्वरीची, जी या वर्षीच दहावी झालीय. ज्यावेळेस मी शर्वरी आणि तिच्या आईबाबांना लेखासाठी बोलले ते लगेच आनंदाने बोलायला तयार झाले आणि पुण्यात माझ्याकडे आले.

शर्वरी, स्नेहल आणि सचिन वालावलकर यांची लेक. शुभम त्यांचा जैविक पुत्र. शुभम हा दोन-तीन वर्षांचा असताना एक दिवस या दोघांनी ठरवलं आपल्याला मुलगी हवी आहे, आणि दत्तक प्रक्रियेतून ती घरी आली तर आपलं घर पूर्ण होईल. स्नेहल म्हणाल्या, ‘‘मुलीशिवाय घराला घरपण येतं नाही. त्या त्यावेळेस मी बँकेत नोकरी करायचे आणि ‘वात्सल्य’ संस्थेची माझी चांगली ओळख होती. त्यामुळे लगेच आम्ही ‘वात्सल्य’मध्ये गेलो आणि आमची इच्छा त्यांना कळवली. आम्हाला वाटलं लगेच मूल आपल्याला मिळेल. तिथे गेल्यावर सगळी कायदेशीर प्रक्रिया कळली आणि जाणवलं थोडे दिवस वाट बघावी लागणार. सगळे सोपस्कार पूर्ण व्हायला ६ महिने गेले. त्या वेळेस शर्वरी पंधरा महिन्यांची होती. शर्वरी घरी आली तेव्हा तब्येतीने जेमतेम, रंगाने सावळी. आम्ही तिला वेगळं असं कधी दत्तक प्रक्रियेबद्दल बोललो नाही, पण संस्थेसोबत तिचं नातं जपत आलो. ती लहानपणी विचारायची, ‘आई मी तुझ्या पोटातून नाही आली?’ त्यावेळेस मी तिला म्हणायचे, ‘तू आमची खास लेक आहेस आणि तू माझ्या हृदयातून आलीस.’ थोडं कळायला लागल्यावर ती म्हणाली, ‘असं कुणी हृदयातून येत नसतं.’ तेव्हा मी तिला म्हणाले, ‘अगं हृदय बंद झालं की काय होतं?’ त्यावर ती म्हणाली, ‘माणूस मरतो.’ ‘जसं हृदय हे खास आहे तशीच तू पण आमच्यासाठी खास आहेस.’

आम्ही दोघेही कामानिमित्त बरेच तास बाहेर असायचो, परंतु घरात सासू-सासरे असल्यामुळे आम्हाला हे शक्य व्हायचं. आम्ही नेहमी कुठलीही अडचण आली की आमच्या मुलांसोबत बसून बोलून ती सोडवायची अशीच पद्धत ठेवली, त्यामुळे मुलांना कधीही काही प्रश्न असले किंवा त्यांनी काहीही चूक केली की ते आमच्याशी विश्वासाने बोलू लागले आणि त्यांना याची जाणीव होती, आई-बाबा हे आपल्याला कुठल्याही कठीण परिस्थितीत मदत करून त्यातून बाहेर काढू शकतात.

शर्वरी तिच्या दादासारखी अभ्यासात हुशार नव्हती, परंतु तिला नृत्य आवडायचं त्यामुळे तिला आम्ही लहानपणापासून भरतनाटय़म शिकायला पाठवायचो आणि ती अतिशय सुंदर नृत्य करते. त्यामुळे आम्ही तिला नेहमीच सांगत आलो, ‘तुला जे करण्यात आनंद मिळतो तेच तू तुझं कामाचं क्षेत्र म्हणून निवड, सगळ्यांसारखं पठडीतलं शिक्षण नाही घेतलंस तरी चालेल.’ मला आठवतं, अभ्यास म्हटलं की माझी चिडचिड, कधी कधी शर्वरीला मार हे सगळं व्हायचं. एक दिवस मी सचिनला म्हणाले, ‘दहावीपर्यंत तर हिला अभ्यास करावा लागणारच ना, तूच बोल हिच्यासोबत.’ रात्री दोघे बोलत होते, मी पांघरूण घेऊन झोपायचं सोंग केलेलं, शर्वरी खाली मान घालून, हातांशी चाळे करत, बाबांना म्हणाली, ‘पप्पा, मला अभ्यास आवडत नाही, मी काय करू?’ आम्ही तिच्याकडून फार अपेक्षा ठेवलीच नव्हती, फक्त तिने दहावी पूर्ण करून मग नृत्यात पुढे शिक्षण घ्यावं हेच आम्ही तिला सांगायचो.

खर तरं तिला आमच्या घरात आणि नातेवाईकांकडून कधीच वेगळी वागणूक मिळाली नाही. तिचं आणि तिचा मामा संजय तुपे यांचं तर फारच जिव्हाळ्याचं नातं आहे. तिचे मामा तिच्या सगळ्याच प्रवासात आमच्या एवढेच तिच्यासोबत असतात. आम्ही अगदी सहजपणे असंच दत्तक याविषयी तिच्याशी बोलायचं ठरवलं होतं. शर्वरी सहावीत असताना एकदा घराची साफसफाई चालू असताना तिला आमच्या संस्थेतून ती घरी आली त्या दिवशीचा फोटो मिळाला. तेव्हा ती म्हणाली, ‘पप्पा, हा फोटो कुठला आणि असा का?’ तिला लगेच सचिन म्हणाला, ‘अगं तू ‘वात्सल्य’मधून घरी आलीस ना त्या दिवशीचा हा फोटो.’ थोडय़ा वेळाने तिने विचारलं, ‘म्हणजे काय?’ आम्ही तिला मग दत्तक म्हणजे काय सांगितलं आणि हे ही सांगितलं की तू दत्तक प्रक्रियेतून आलीस. त्यावेळेस तिला राग नक्कीच आला, घाबरली पण मनातून. रागाने म्हणाली, ‘म्हणजे तुम्ही माझे आई-बाबा नाहीत?’ सगळ्या शाळेच्या वह्य़ा काढल्या आणि त्यावरील सचिनचं नाव रागाने खोडलं. आम्ही शांत होतो, तिला व्यक्त होऊ दे असंच आम्ही ठरवलं. तिच्या भावना, तिची घालमेल साहजिक आहे असंच आम्हाला वाटलं. आम्ही फक्त ठरवलं की आपण तिच्यासोबत राहायचं आणि ती आपलीच आहे, हे जाणवून द्यायचं. रात्री बारा वाजता ती आमच्या रूममध्ये आली आणि घट्ट मिठी मारून ढसाढसा रडली. आजही मी ती रात्र विसरू शकत नाही, आमचं नातं त्या दिवशी कायमचं घट्ट झालं.

शाळेत तिला मात्र बऱ्याच अंशी ‘बिचारी शर्वरी’ अशी वागणूक मिळू लागली, जे आम्हाला कधीच मान्य नव्हतं. आम्ही शर्वरीला नेहमीच सांगत आलो, ‘शर्वरी, दत्तक आहेस हे वापरून कुणाकडूनही दया, कीव किंवा कुठलीही सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नकोस. तू आमची आहेस, आणि आम्ही तुझे आहोत..फक्त एवढंच तथ्य आहे, बाकी सगळी दत्तक प्रक्रिया ही फक्त कागदोपत्री.’ परंतु तिला शाळेत मिळणारी ही वागणूक, मैत्रिणींकडून मिळणारी नको अशी सहानुभूती यामुळे शर्वरी खूप कोशात जाऊ  लागली. अभ्यासात हुशार नाही म्हणून बाकी कुठल्याही खेळात किंवा नृत्यात तिला कधीच सहभागी होऊ  दिलं नाही. ‘मी काळी आहे, दिसायला छान नाही, मला कुणी मित्र नाही’ असे तिचे मिश्र विचार यामुळे तिचा आत्मविश्वास अगदीच खालावला. त्यातच किशोरवयातील तिचे बदल, मुलांबाबतची ओढ यामुळे आम्हीही बिथरलो. परंतु या सगळ्या काळातसुद्धा आमचं नातं इतकं घट्ट होतं की रोज ती सगळं माझ्याशी बोलायची. शेवटी विचार केला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी हिला आपल्यापासून थोडे दिवस एखाद्या निवासी शाळेत ठेऊ या. तिथलं वातावरण तिला या सगळ्यातून बाहेर यायला नक्की मदत करेल. आमचा शाळेचा शोध चालू असताना आम्हाला पुण्याच्या ‘क्रिएटिव्ह अकॅडमी’चा पत्ता मिळाला आणि आम्ही लगेच तिथे गेलो. शेख सर अतिशय वेगळ्या पद्धतीने ही शाळा चालवतात. आम्हाला आणि शर्वरीला खूपच आवडली ही शाळा. त्यामुळे पुढील दोन र्वष तिनं या शाळेत राहायचं ठरवलं. शर्वरी यावर्षी दहावी ६६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली. आम्हाला ती पास झाली याचाच आनंद आहे. आमच्यासाठी तिच्यातील बाकी जे बदल झाले ते जास्त महत्त्वाचे आहेत. आज शर्वरी स्वतंत्र विचारांची, स्वाभिमानी आणि एक प्रगल्भ व्यक्ती आहे. आम्हाला विश्वास आहे, शेख सरांमुळे शर्वरीला दिशा मिळाली आणि आम्ही तिच्या पुढच्याही प्रवासात तिच्यासोबत अशीच साथ देऊ.’’

मी ज्या वेळेस शर्वरीशी लेखासंदर्भात बोलले, ती लगेच तयार झाली बोलायला. शर्वरी म्हणाली, ‘‘ज्या वेळेस मला मी दत्तक आहे हे कळले, तेव्हा मला राग आला, वाईट वाटलं. पण हेही कळत होतं, आपले आई-पप्पा हेच आहेत. अभ्यासासाठी आईचा बराच मार खाल्ला, तेव्हाही वाटायचं, ‘मला मारते आणि दादाला फक्त रागावते.’ आता कळतं की तो नीट अभ्यास करायचा आणि मला जास्त प्रयत्न करावे लागायचे. शाळेत आणि मैत्रिणींकडून मिळणारी वेगळी वागणूक मात्र खूप खटकायची. आई-बाबा, दादा यांची सोबत आणि शेख सरांचं मार्गदर्शन यामुळे मी आता खूप बदलले आहे. आता तर मला खरंच फरक पडत नाही. या शाळेत मला समजून घेणारे खूप मित्र-मैत्रिणी मिळाले. त्यांना फरक नाही पडत मी कशी दिसते, कशी राहते, मी घरी कशी आले.. आमची मैत्री निखळ आहे आणि हे सगळं नगण्य आहे.’’

पण शर्वरी हेही म्हणाली, ‘‘मला माझ्या जन्मदात्रीला एकदा नक्की ‘बघायचं’ आहे, तिच्याशी मी बोलू शकेन की नाही माहीत नाही, पण ‘बघायचं’ मला फक्त ती कोण आहे ते!’’

शर्वरीचे आई-बाबा याही वेळेस नक्कीच तिच्यासोबत खंबीरपणे असतील यात मला शंका नाही. मला नेहमी वाटतं पालक म्हणून आपण फक्त या मुलांसोबत राहू शकतो आणि त्यांना मार्ग दाखवू शकतो. मात्र समाजात त्यांना ‘बिचारं मूल’ असं न वागवता स्वाभिमानाने जगू दिलं तरच समाजाने ‘दत्तक’ प्रक्रिया स्वीकारली असं म्हणता येईल.

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org