07 August 2020

News Flash

क्वालिटी टाइमच्या दिशेनं..

एरवी पालक घडय़ाळाबरोबर धावत असतात.

सध्या पालकांचा प्रश्न असा असतो- आम्हाला मुलांसाठी द्यायला वेळ नाही पण तरी मुलांना क्वालिटी टाइम कसा द्यायचा?

एरवी पालक घडय़ाळाबरोबर धावत असतात. त्यांना तरी कुठे स्वत:ला क्वालिटी टाइम देता येतो? कामांच्या धावपळीतून आपल्याही जगण्याला क्वालिटी यावी असा प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला जे मनापासून करावंसं वाटतं त्यासाठी वेळ काढलाच पाहिज

सध्या पालकांचा प्रश्न असा असतो- आम्हाला मुलांसाठी द्यायला वेळ नाही पण तरी मुलांना क्वालिटी टाइम कसा द्यायचा? अर्थातच हा लहान मुलांच्या पालकांनी विचारलेला, अतिशय प्रामाणिकपणे विचारलेला प्रश्न असतो. या पालकांना आणखी एक चिंता असते की आम्हाला सपोर्ट सिस्टम राहिली नाही.

सपोर्ट सिस्टम राहिली नाही कारण एकत्र कुटुंबं राहिली नाहीत. स्वतंत्र कुटुंबात स्त्रियांची ओढाताण वाढली. दुसरं म्हणजे स्त्रिया शिकल्या, अधिकाधिक शिकू लागल्या. कामासाठी बाहेर पडल्या पण पुरुष बदलले नाहीत अजूनही. बहुसंख्य घरात मुलांना वाढवणं, घराची व्यवस्था पाहणं, स्वयंपाक, पाहुणे सांभाळणं ही स्त्रियांचीच कामं आहेत. शिवाय तिने अर्थार्जन करायचं म्हणजे वेळ आणायचा कुठून?

स्त्रियांच्या या वेळाच्या ओढाताणीला समाजानं सोयी करून प्रतिसाद दिला नाही. चांगली पाळणाघरं, घरगुती चांगल्या अन्नाची योग्य पैशात सोय झाली असती तर स्त्रियांचा ताण कमी झाला असता. मुलाला इंग्रजी माध्यामात ‘टाकल्याशिवाय’ तो प्रगती करू शकणार नाही यावरचा अंधविश्वास वाढत वाढत तो सर्व सामाजिक स्तरांत पसरला. त्यामुळे मुलांची अवस्था धड नाही मराठी आणि धड नाही इंग्रजी अशी झाली. मात्र भाषाच जर कच्ची राहिली तर त्याचा परिणाम थेट विचारांवर होतो, कारण काय म्हणायचं आहे ते मांडताच येत नाही. अशा मुलांचे पालकही मग, ‘तू अ‍ॅपल खात टी.व्ही. वॉचत बस मी लगेच येते,’ असं बोलू लागतात आणि मुलं गोष्ट सांगताना ‘एक होती काऊ आणि एक होता डाँकी,’ असं सांगू लागतात. निम्न आर्थिक वर्गातली मुलं तर इंग्रजी शाळेत जाऊ लागली की त्यांना शाळेत येऊन इंग्रजी न बोलणाऱ्या पालकांची लाजच वाटू लागते आणि त्यामुळे घरातच मुलं आणि पालक यांच्यात छुपं युद्ध चालतं. पालक  आणि मुलांच्या राहणीत, विचारसरणीत अनेक गोष्टी नापसंत असतात त्यावरून घरोघरी वाद चालू असतात.

काही घरात शिक्षणामुळे भरपूर पैसे येऊ लागले. या भरपूर कमाईला मात्र समाजाने लगेच प्रतिसाद दिला. बाजार भरून वाहू लागले. मॉल तयार झाले, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम यांची ब्रण्डेड दुकानं वाढली. मॉलमध्ये खरेदी आणि या नवीन प्रकारचं अन्न पुरवणाऱ्या दुकानांना भेटी हे ‘कल्चर’ बनलं. ब्रॅण्डेड कपडे नसणाऱ्या मुलांना इतर श्रीमंत मुलं शाळेत त्रास देऊ लागली. अशा प्रकारे खर्चीकपणाकडे दिखाव्याकडे सगळा समाज हळूहळू ढकलला जाऊ लागला. साधी राहणी, काटकसर, हे विनोदाचे शब्द बनले.

पूर्वी घरात पैसे असले तरी राहणी सर्वसामान्य असायची. आता पैसा घरात, कपडय़ात, राहणीत, वाहनात दिसावा लागतो. संस्कार, मूल्यं, गांभीर्य, अभिरुची, नम्रता, इतरांसाठी करणं हे सगळं नाकारलं जाऊ लागलं. ‘दिखाव्याच्या खिडक्या भरलेल्या पण कोठीची खोली रिकामीच’ हे  दलाई लामांचं भाष्य अधिकाधिक खरं ठरत चाललं आहे.

संपर्क साधनं जेवढी वाढली तेवढा प्रत्यक्ष संपर्क कमी कमी होत चालला आहे. आता माणसं शेजारच्या माणसाकडेदेखील सहज जात नाहीत. आता भर आहे सर्व क्षेत्रांतल्या ‘स्मार्ट’नेसकडे. साध्या सरळ माणसानं भांबावून जावं एवढा हा ‘स्मार्ट’पणा वेगवान आहे.

तोकडे कपडे घालून कॉलेजला जाणाऱ्या मुलीला आईनं, ‘असे कपडे घालत जाऊ नको’ म्हटलं तर ती सरळ विचारते, ‘मॉम, तुला काय प्रॉब्लेम आहे? मी प्रेग्नंट राहीन याची भीती ना? काळजी करू नको अ‍ॅबॉर्शन सोपं असतं. मी करून घेईन. आता चिल मार.’’ इतक्या थेटपणे मुली बोलू लागल्या आहेत.

अशा सगळ्या वातावरणात पालक भांबावून गेले तर नवल नाही. खरं तर आई जेव्हा मुलीच्या अपुऱ्या कपडय़ांबद्दल बोलत असते तेव्हा ती बाहेरच्या गुंड-मवाली लोकांच्या नजरेबद्दल चिंतातुर झालेली असते. तिला त्यापुढचं वाईट दृश्य दिसत असतं. हे तरुण मुलांनी समजून नको का घ्यायला? पण सामंजस्य राहतं बाजूला आणि उलट मुलगी होस्टेलला राहायला जाते म्हणते. समाज जेवढा चंगळवादाच्या आहारी जाईल तेवढा उपभोगवाद उफाळून येईल. दोन्हीचा अर्थ तोच आहे.

आता खरं तर लहानपणापासून मुलांना ठरवून क्वालिटी टाइम देण्याची गरज आहे. क्वालिटी टाइम याचा एक अर्थ मूल जेव्हा म्हणतं तेव्हा त्याच्यासाठी चित्र काढायला, फिरायला जायला, खेळायला, पुस्तक वाचायला, एखादी वस्तू करून पाहायला वेळ देणं त्याला हवं तेव्हा हे महत्त्वाचं. तेव्हा शक्य नसेल तर म्हणावं की, ‘आत्ता मला हे काम केलं पाहिजे. ते झालं की आपण बसू या एकत्र.’ क्वालिटी टाइमचा दुसरा अर्थ त्याच्या जगण्याची ‘क्वालिटी’ चांगली राहावी यासाठी दिलेला वेळ. मग त्या वेळात तुम्ही त्याला ठरवून पुस्तकं वाचून दाखवाल किंवा त्याच्याबरोबर दिवाळीचा किल्ला कराल, किंवा एकत्र चित्रं काढाल, गाणी म्हणाल, एखादी चांगली फिल्म बघाल, एखादा पदार्थ करून पाहाल. हे त्यानं पुढे त्याच्या मुलांबरोबर करावं अशी अपेक्षा नसली तरी तो ते करील. कधी तरी मुलांसाठी, केवळ मुलांसाठी एक-दोन दिवसांची रजा घ्यावी आणि त्याला हवं तिथे जावं. कुठल्याही सुसंस्कृत माणसानं मुलांच्या सहवासात राहणं यातून संस्कार होतोच होतो.

एरवी पालक घडय़ाळाबरोबर धावत असतात. त्यांना तरी कुठे स्वत:ला क्वालिटी टाइम देता येतो? कामांच्या धावपळीतून आपल्याही जगण्याला क्वालिटी यावी, असा प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला जे मनापासून करावंसं वाटतं त्यासाठी वेळ काढलाच पाहिजे. कुणाला प्रवास करायला आवडेल, कुणाला काही खेळायला आवडेल, कुणाला काही शिकायला आवडेल, वाचायला आवडेल, मित्र-मैत्रिणींना भेटायला आवडेल. लिहायला, चित्र काढायला किती तरी गोष्टी सुचतील. असं काही नवं आपण करत राहिलो तर आनंद वाटतो, उभारी येते आणि मुख्य म्हणजे पालकांच्या सहवासात मुलंही उत्साही, काही करून पाहण्याची धडपड करणारी होतात.

आळशी, भांडखोर, अस्वस्थ, स्वार्थी, संकुचित, नीरस, बेपर्वा, हिंसक, अनैतिक कुटुंबं मुलांना क्वालिटी शिकवू शकत नाहीत. मुलांना स्वस्थ बालपण देऊ शकत नाहीत. सभोवतालचं सामाजिक, राजकीय वातावरण गढूळ आहे, कुटुंबांच्या धडपडीनं ते स्वच्छ व्हायला मदत होईल. कुटुंब स्वस्थ असली तरच समाज स्वस्थ राहील.

घर, शाळा आणि समाज या तीन ठिकाणी मुलं वाढतात. तिन्ही ठिकाणी मुलांच्या जगण्याला क्वालिटी द्यायची धडपड दिसली पाहिजे. ती

समज पालक-शिक्षक आणि समाजातले पुढारी यांना असली पाहिजे.

क्वालिटी जीवनाकडे जाण्यासाठी घरांना काय बदल करावे लागतील? एक तर घरातल्या मोठय़ा माणसांचे भांडण, तंटे, राजकारण बंद व्हायला हवीत. घरात प्रेम आणि शांतीचं वातावरण हवं. घरातला आहार साधा सात्त्विक हवा. सर्वाचा एकमेकांशी संवाद हवा. सर्वाचा एकमेकांवर विश्वास हवा. सर्वाना एकमेकांच्या गुणांचं कौतुक करता यावं. घरात कोणीही हुकूमशहासारखं वागू नये. कोणी कोणाचा अपमान करता कामा नये. घरात कोणी मूल कलावंत असेल, तर त्याला खासपणे जपावं लागतं. घरात सर्वानी एकत्र कामं करण्याची सवय ठेवावी. घरात असभ्य भाषा, शिवीगाळ नसावी.

अशा किती तरी गोष्टी शोधून आचरणात आणाव्या लागतील. काळाप्रमाणे बदल होणारच पण ते बदल चांगले, उपयोगी घराला क्वालिटीकडे नेणारे हवेत. आपण आपल्या घरात हे बदल केले तर ती पुढच्या पिढीत परंपरा बनते आणि लोकांना तसं वागणं सोपं जातं. मुलं हा पालकांनी आपल्या जगण्यातला अडसर आहे, ते ओझं आहे, असं कधीही समजू नये. शक्यतोवर लहान मुलं आपल्या बरोबरच असावीत. त्यांचं खेळाचं, खाण्याचं, वाचनाचं, गाणी ऐकण्याचं, चित्र काढण्याचं साहित्य बरोबरच्या एका छोटय़ा पेटीत किंवा पिशवीत घ्यावं. मुलं त्यामुळे स्वतंत्रपणे आपलं आपलं काम करत बसतात. कुरकुर करत नाहीत. मुलं ही कुठेही अडथळा नसतात. घर आणि शाळेनं हा विचार पक्का समजून घ्यावा आणि नंतर समाजातही तो पसरावा.

एम्. के. सी. एल. नावाची ‘महाराष्ट्र नॉलेज कापरेरेशन लिमिटेड’ ही कंपनी आहे. तिचे संस्थापक विवेक सावंत ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या लहान मुलांसाठी ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममधेच मे महिन्यात महिनाभर शिबीर घेतात. आई-वडील मुलांना घेऊन ऑफिसला येतात. मुलं दिवसभर मध्ये एक-दोनदा आई-वडिलांना भेटून येतात. पालक जेवणाच्या सुट्टीत मुलांना भेटतात. ज्या पालकांकडे काही कौशल्य आहेत ते पालक सर्व मुलांना ते शिकवतात. सर्वाचाच वेळ आनंदात जातो. पालकांना चिंता राहत नाही.

ऑफिसचे बॉसच मुलांना सांगतात, ‘ही कॉन्फरन्स रूम आहे याचा अर्थ तुम्ही टेबलावर चढायचं नाही, शांतपणे बसून राहायचं असा नाही. तुम्ही मोकळेपणानं खेळा.’ मुलंही त्यांच्या म्हणण्याला मुक्त प्रतिसाद देतात. असे अनेक संचालक निर्माण होवोत आणि प्रत्येक कामाच्या जागी अशी शिबिरे होवोत! समाज क्वालिटी टाइमकडे जाण्याची ही सुरुवात आहे.

 – शोभा भागवत
shobhabhagwat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2015 12:01 am

Web Title: article on quality time
Next Stories
1 मुलाचं आई-वडिलांना पत्र
2 अनुभव हाच शिक्षक
3 मूल नावाचं सुंदर कोडं
Just Now!
X