08 August 2020

News Flash

मुलाचं आई-वडिलांना पत्र

एका मुलानं आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून त्याचे विचार त्यात व्यक्त केले आहेत.

एका मुलानं आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून त्याचे विचार त्यात व्यक्त केले आहेत. या पत्रातील मुद्दे सगळ्याच पालकांना त्यांच्या वागण्या-बोलण्याबाबत मार्गदर्शक ठरतीलच. शिवाय त्याद्वारे त्यांची मुलं काय बरं सांगू पाहात आहेत हेही शोधण्यासाठी मदत करणारे आहेत. हे पत्र प्रत्येक पालकाच्या मनाचाच प्रतिध्वनी आहे.

मुलांशी पालकांनी कसं वागावं, काय विचार करावा, हे सगळं परस्पर आपण मोठय़ा माणसांनीच ठरवायचं आणि एकमेकांशी बोलायचं का? मुलांचंही त्यावर काही म्हणणं असणारच ना? ‘हाऊ टु रेझ युवर पेरेंटस्’ असं एक पुस्तकही मी खूप पूर्वी वाचलं होतं. मुलाचं आईवडिलांना पत्र हे कोणी लिहिलं आहे त्या लेखकाचं नाव मात्र माझ्याकडे नाही. हे पत्र खूप र्वष माझ्याकडे आहे. हे मूल फार मोठेही नाही आणि फार छोटंही नाही. दहा अकरा वर्षांचं असावं. ते आईवडिलांना असं सांगतं आहे की,
‘तुमचे विचार निश्चित असू द्यात. माझ्याशी बोलताना तुम्ही ठामपणे बोला. तसं झालं की मला सुरक्षित वाटतं.’
– काही पालक खरोखरच असे असतात. त्यांना स्वत:लाच आपण काय बोलतो आहोत याबद्दल खात्री नसते. त्यांच्या होकारालाही अर्थ नसतो आणि नकारालाही. मुलांनी जरा हट्ट केला की ते लगेच शरणागती पत्करतात. त्याला हवं ते देतात. त्यांची स्वत:ची धोरणं ठरलेली नसतात त्यामुळे कशाला हो म्हणावं कशाला नाही हे त्यांना कळत नाही. अशा पालकांबद्दल मुलाला कसा विश्वास वाटेल? त्यामुळे हे मूल म्हणतं आहे की ठामपणे बोला म्हणजे मला सुरक्षित वाटेल. साहजिकच आहे ना? ज्या आधाराला धरून उभं राहायचं तो आधारच डळमळीत असला तर काय? म्हणून पालकांचे विचार निश्चित असायला हवेत.

‘मला वाईट सवयी लागू देऊ नका. वाईट सवयी लागत असल्या तर तुम्ही लक्ष ठेवा आणि त्या लगेच मोडून काढा. मी त्यासाठी सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.’
– लहानपणी चोरी करणं वाईट आहे हेसुद्धा कळत नसतं. कित्येकदा ही चोरी आहे हेही कळत नाही. काय चांगलं काय वाईट याचा विवेक नसतो. मित्रांनी सांगितलं की काहीही पटू शकतं. अशा वेळी पालकांचं लक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. हातात पैसे असले तरी आणि नसले तरी बाजारातल्या अनेक वस्तूंचं आकर्षण वाटत असतं. कधी मित्रा मित्रात चढाओढ, पैजा लागतात आणि काहीही करून अमुक एक वस्तू मिळवायचीच असा प्रयत्न चालतो. मुलांनी ऐकलं नाही, हट्ट केला, रुसला, फुगला तरी वाईट सवय मोडून काढण्यासाठी तो पालकांवरच अवलंबून असतो.

‘चारचौघांदेखत मला माझ्या चुका दाखवू नका. तुम्ही मला एकटय़ाला बाजूला घेऊन समजावलंत तर ते मला जास्त चांगलं कळेल’’
– लहान मुलांच्या हातून सहजपणे चुका होतात. पण त्यांना आधीच त्या चुकांची लाज वाटत असते. बिछान्यात शू होणं ही त्यातली एक अगदी लाजिरवाणी चूक. पालक मोठय़ा मोठय़ांदा त्याबद्दल बोलतात ते मुलांना आवडत नाही. कधी ती काही विसरतात. कधी त्यांच्या हातून काही महत्त्वाचं फुटतं. हे आई वडिलांनी कोणाला सांगू नये असं त्यांना वाटत असतं, पण ते पालकांना कळत नाही. अशा वेळी मुलाला एकटय़ाला बाजूला घेऊन, बागेत जाऊन बसावं आणि शांतपणे बोलावं. समजवावं. ही मुलाची अपेक्षा बरोबरच आहे.
‘माझे फार लाड करू नका. मी मागेन ते मला मिळालंच पाहिजे, असं मला वाटत नसतं. फक्त मी तुमची परीक्षा घेत असतो.’
– मुलं आपली अशी नेहमीच परीक्षा घेत असतात. काही पालकांना असं वाटतं की मूल मागेल ते आपण त्याला द्यायला हवं म्हणजे ते खूश राहील आणि आपण पालकत्वाचं कर्तव्य बजावलं असं होईल. पण प्रत्यक्षात ते तसं नसतं. मुलाला मागितलेल्या सर्व गोष्टी हव्या असतात असं नाही. ते परीक्षा पाहात असतं. तेव्हा त्याची मागणी योग्य आहे का याचा विचार जरूर करावा आणि नाही असं वाटलं तर नकार द्यावा.

‘माझ्या सारखं मागे लागू नका. तसं केलंत तर मला ऐकूच येत नाही असं मी दाखवीन.’
– पालकांची खात्री असते की अमुक एक गोष्ट मुलांनी केलीच पाहिजे. उदाहरणार्थ, संध्याकाळी हातपाय धुवून ‘शुभं करोती’ म्हणणं. तो चांगला संस्कार आहे, अशी एखाद्या आईची खात्री असते. ती त्यासाठी रोज मुलाच्या मागे लागते. मुलाला मात्र वाटतं रोज रोज काय तेच ते म्हणायचं. तो कंटाळा करतो आणि इतर काही खेळत राहतो. अशा वेळी त्याच्या मागे न लागणं चांगलं. त्याला एक दोनदा नीट सांगावं. नाही ऐकलं तर सोडून द्यावं.

‘मी आहे त्यापेक्षा लहान आहे असं समजून मला वागवू नका. मला मग मूर्खासारखं मोठं असल्यासारखं वागावं लागतं.’
– मूल मोठं होतं पण पालकांना ते छोटंच वाटत असतं. त्यांना त्याचं कौतुक असतं ते त्याच्याशी बोबडं बोलतात. एखाद्या टोपणनावाने हाक मारतात. एक आई तर लग्नाच्या वयाच्या मुलाला ‘छबडी बबडी’ म्हणून हाक मारते आणि तो मुलगाही ‘ओ’ देतो. मुलांना किती समजतं याचा अंदाज पालकांना असला पाहिजे म्हणजे मग त्यांचं वागणं मुलाला अवघड होणार नाही.
‘माझ्या चुका म्हणजे जणू काही पापच आहेत, असं मला वाटू देऊ नका. त्यामुळे माझा मूल्यांवरचा विश्वासच उडेल.’
– चुका तर कायमच हातून होतात. काही छोटय़ा काही मोठय़ा. अशा वेळी मुलाशी त्या चुकीबद्दल सविस्तर बोलणं व्हावं पण पुन:पुन्हा त्याला त्यावरून टोचू नये. पुन्हा तसं वागशील, बरं सावध राहा असं येता-जाता आठवण करत राहू नये. चुका होतात, पण त्या सुधारता येतात. चुका कबूल करता येतात. माफी मागता येते आणि त्याबद्दलच्या अपराधी भावनेतून सुटता येतं. असं झालं नाही तर ते मूल कायम ते ओझं मनावर घेऊन वावरतं आणि त्याला पुन्हा चांगलं वागता येतं याचा विश्वास वाटत नाही.

‘माझ्या बारीकसारीक तक्रारींकडे फार लक्ष देऊ नका कारण तुमचं लक्ष वेधून घ्यावं यासाठीच त्या असतात.’
– मुलांची ही गंमत कायमच चालू असते. आईवडिलांनी आपल्याकडे लक्ष द्यावं हे त्यांना नेहमीच वाटत असतं. त्यासाठी कुरकुर कुरकुर करतात. कधी भावंडाशी भांडण काढतात. कधी अमुक दे आत्ताच्या आत्ता दे म्हणून हट्ट करतात. लक्ष दिलं की तक्रार संपते. तेव्हा मधून मधून लक्ष देणं हा त्यावरचा उपाय आहे.
‘कधी असं तर कधी तसं असं उलटसुलट बोलू नका. तुमच्या बोलण्यात सुसंगती असू द्या, नाहीतर माझा गोंधळ उडतो आणि तुमच्यावरचा विश्वासही उडतो.’
मुलांना जे वचन दिलं ते पाळायला हवं. नाहीतर रविवारी फिरायला जाऊ म्हणायचं. आता मला वेळ नाही, असं रविवारी म्हणायचं. ‘एखादी वस्तू आणूया’, म्हणायचं आणि नंतर ‘आता पैसे नाहीत म्हणायचं’ असं झालं तर दरवेळी मुलाला प्रश्नच पडेल हे खरं म्हणताय्त का खोटं बोलताय्त? एकदा म्हटलं तसं शक्यतो करावंच, पण अगदीच खरी अडचण असली तर मुलांनीही समजून घ्यायला हवीच.

‘मी जे करेन त्याचे परिणामही मला भोगू द्या. कधी कधी अशाही मार्गानी शिक्षण होतं ते हवंच असतं.’
– कधी कधी मुलं हट्ट करतात. आपण नको नको म्हणत असताना कार्यक्रम ठरवतात. मित्राकडे राहायला जातात. वेळ जातो आणि अभ्यास होत नाही. शाळेत शिक्षा होते. अशा वेळी ती शिक्षा त्याला भोगू द्यावी. आपण कसलीही खोटी चिठ्ठी पाठवू नये. यातूनच त्याचं शिक्षण होतं.

‘मला प्रयोग करायला आवडतात. त्याशिवाय मला राहावतच नाही. तेव्हा कृपया माझे प्रयोग सहन करा.’
– अगदी लहान असल्यापासून मुलं हे प्रयोग करत असतात. पाणी सांडून त्यात खेळणे, पावडर ओतून त्यात घसरणे, नवीन खेळणं उघडून उचकटून पाहणे, नवीन चादरीवर कात्री चालवणे असंख्य उद्योग ऊर्फ प्रयोग चालतात. मेंदूच्या वाढीसाठी ते आवश्यकच असतात तेव्हा ते सहन करायला पालकांनी शिकलं पाहिजे.
आता या मुलाच्या पत्रातले शेवटचे तीन मुद्दे महत्त्वाचे आणि गमतीचेही-

‘‘तुम्ही कधीच चुकत नाही असं चुकूनही मला सांगू नका. मग तुमचं चुकलं की मला धक्का बसतो’’
‘‘ मी किती वेगानं वाढतो आहे हे विसरू नका. माझ्या वाढण्याच्या वेगाशी जुळवून घेणं कठीण जात असेल, पण प्रयत्न करा.’’
‘‘ तुमची तब्येत निरोगी, ठणठणीत ठेवा. मला तुमची खूपच जरूर आहे.’’
आणखी एक मुलांची अपेक्षा असते त्यांना आईवडील दोघंही हवे असतात. त्यामुळे त्यांनी कधी भांडू नये, वाईट बोलू नये आणि वेगळं होऊ नये असं मुलांना वाटत असतं. याशिवाय तुमची मुलं काय बरं सांगू पहात आहेत तुम्हाला? तुम्हाला ते ऐकू येतं आहे का? प्रयत्न करा. जरूर ऐकू येईल! हे पत्रही आपल्या मनाचाच प्रतिध्वनी आहे नाही का?
shobhabhagwat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2015 1:01 am

Web Title: son write letter to father and mother
Next Stories
1 अनुभव हाच शिक्षक
2 मूल नावाचं सुंदर कोडं
3 ना हार ना जीत
Just Now!
X