करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी

पालघर : करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भासलेली प्राणवायूची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच करोनाच्या संभाव्य तिसरा लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन उपाययोजनांच्या तयारीला लागले आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून आगामी काळात जिल्ह्यात १४५ मेट्रिक टन प्राणवायू साठा ठेवण्याची तयारी केली जात आहे.

करोनाच्या दुसऱ्याच्या लाटेदरम्यान २ मे रोजी जिल्ह्यात रुग्णसंख्या सर्वाधिक नोंदविण्यात आली होती. त्या दिवशी सुमारे ४९ मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता भासली होती. याचा आधार घेऊन तीन दिवसांचा प्राणवायू साठा ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात १४६ मेट्रिक टन प्राणवायू साठवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ८८ मेट्रिक टन प्राणवायू वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हवेमधून प्राणवायू उत्पादन करणारे प्रत्येकी १.१२ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादन पीएसएस (प्रेशर स्विंग अ‍ॅडसॉबशन) तंत्रज्ञानावर आधारित प्राणवायू प्रकल्प पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत झाला असून उपजिल्हा रुग्णालय डहाणू व उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथे या महिनाअखेपर्यंत असा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. याखेरीज १.१२ मॅट्रिक टन क्षमतेचा प्राणवायू प्रकल्प टिमा रुग्णालयात (बोईसर) कार्यान्वित करण्यात आला असून ग्रामीण रुग्णालय वाणगाव व ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे तितक्याच क्षमतेचे प्रकल्प २० ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. याखेरीज पीएम केअर निधीमधून वाडा ग्रामीण रुग्णालय तसेच कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी ०.३७ मेट्रिक टन क्षमतेची हवेतून प्राणवायू उत्पादित करणारा प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावित आहे. पालघर ग्रामीण बहगत अशा प्रकारे विविध रुग्णालयात आठ प्रकल्पांमधून ७.४६ मेट्रिक टन प्राणवायूची व्यवस्था करण्यात येणार आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या नालासोपारा रुग्णालयात १.८२ मेट्रिक टन तर सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे एक मॅट्रिक टन क्षमतेचा हवेतून प्राणवायू उत्पादित करणारा प्रकल्प कार्यान्वित आहे. याखेरीज श्री जीवदानी देवी हॉस्पिटल, चंदनसार (१.१४) बोळींज रुग्णालय (१.१४), नालासोपारा रुग्णालय (१.८२) व वरून इंडस्ट्रीज रुग्णालय (०.९१ मेट्रिक टन) प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. महानगरपालिका क्षेत्र सहा प्रकल्पांमधून ७.८३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादित होणार आहे.

विक्रमगड येथील रिवेरा समर्पित करोना रुग्णालयात दहा मेट्रिक टन क्षमतेची द्रव्य रूपातील वैद्यकीय दर्जा प्राणवायू साठवण्याची टाकी कार्यान्वित करण्यात आली असून रायगड ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आयडियल रुग्णालय (पोशेरी- वाडा), वेदांत रुग्णालय (धुंदलवाडी- डहाणू), ग्रामीण रुग्णालय वाणगाव, आरोग्य पथक पालघर, उपजिल्हा रुग्णालय जव्हार तसेच ग्रामीण रुग्णालय तलासरी येथे प्रत्येकी दहा मेट्रिक टन क्षमतेची द्रव्य रूपातील प्राणवायू टाक्यांची मागणी १५ जुलै रोजी देण्यात आले आहेत.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कार्डिनल ग्रेशियास रुग्णालयात २.३ मेट्रिक टन क्षमतेची द्रव्य रूपातील प्राणवायू टाकी कार्यान्वित असून त्यामध्ये श्री जीवदानी देवी रुग्णालय व वरुण इंडस्ट्रीज रुग्णालय येथे प्रत्येकी २० मेट्रिक टनाची, बोळींज रुग्णालय तसेच नालासोपारा येथील समर्पित करोना रुग्णालय येथे प्रत्येकी १० मेट्रिक टनाचा समावेश आहे. तर कौल्स सिटी रुग्णालय येथे सहा मेट्रिक टन क्षमतेच्या द्रव्य रूपातील प्राणवायू टाक्यांची मागणी रायगड ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे महानगरपालिकेने केली आहे.

हवेतून प्राणवायूनिर्मिती प्रकल्पांची उभारणी

हवेतून प्राणवायू निर्माण करणाऱ्या प्रकल्पांची उभारणी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. द्रव्यरूपातील प्राणवायू टाक्यांच्या उपलब्ध होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्याने २०८ लिटर क्षमतेचे व ४५० लिटर समतेचे द्रव्यरुपात प्राणवायू साठवण्यासाठी प्रत्येकी दहा डुरासिलेंडर खरेदी करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.

आरटीपीसीआर चाचणी क्षमतेत वाढ 

डहाणू येथील शासकीय प्रयोगशाळेत दीडशे तर वेदांत खाजगी रुग्णालयात ५० आरटीपीसीआर तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली असून मुंबई येथील विविध शासकीय प्रयोग शाळेत सध्या १७०० आरटीपीसीआर नमुने दररोज तपासण्याची व्यवस्था असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी माहिती दिली आहे.