जिल्हा आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईच्या सूचना

पालघर: वैतरणा नदीमध्ये  अवैध रेती उत्खनन सुरू असल्यामुळे वैतरणा नदीवरील रेल्वे पूलासह, नदीकाठची गावे व मानवी वाहतूक करणारे पूल यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. हे लक्षात घेत    बेकायदा उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात महसूल विभागाने कठोर कारवाई करून अशा कृती वेळीच थांबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांना दिल्या.

बैठकीत वसई—विरार मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उच्चाधिकारी, पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रतिनिधी, तटरक्षक दलाचे प्रतिनिधी, मेरिटाईम बोर्डाचे प्रतिनिधी, रेल्वे प्रशासनाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी सफाळे भागात चालणाऱ्या बेकायदा उत्खननाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली व  प्रशासनाने पावले न उचलल्यास संबंधितांवर कारवाई करू असे खडे बोलही त्यांनी या बैठकीत सुनावले. रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलाला मोठा धोका असल्याने त्या ठिकाणी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाने पुलाच्या परिसरात सुरक्षा कठडे बांधण्यात संदर्भात चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रेल्वे प्रशासनाला हे सुरक्षा कठडे टाकण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यास सांगितले.  रेल्वे पुलाच्या धोक्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक असताना रेल्वे प्रशासन पालघर जिल्हा प्रशासनावर बोट दाखवून दाखवते, असे अनेकवेळा झाले आहे.  रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात येईल. त्यावेळी याला जबाबदार कोण असा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

वैतरणा नदी पात्रात बेकायदा रेती उत्खनन सुरू असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने विविध प्रशासनाच्या प्रतिनिधींना पत्र लिहून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती.