पालक, विद्यार्थ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे व्यवसाय ठप्प

कासा : करोनाच्या जैविक संकटाचा फटका सर्वच उद्योग समूहांना बसला आहे. यात शालेय साहित्य विक्रेत्यांनादेखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. लाखो रुपयाचे शालेय साहित्य दुकानात पडून असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. यात शाळा केव्हा सुरू होणार याची शाश्वती नसल्याने विद्यार्थी व पालकांनी पुस्तक खरेदीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी पुस्तक विक्रीचा व्यवहार ठप्प झाला आहेत.

पालघर जिल्ह्यत पुस्तक-वह्य  विक्रीची अनेक दुकाने आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. विद्यार्थी व पालक पुस्तकांसोबत वह्य,  पेन, पेन्सिल, स्कूल बॅग, शाळेचा गणवेश, बूट खरेदी करतात. जून  महिन्यात या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी असते. संपूर्ण वर्षभरात जून- जुलै या दोन महिन्यातच या व्यावसायिकांचा सर्वात जास्त व्यवहार होतो. मात्र करोनामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यातच पालघर जिल्हा आदिवासीबहुल असल्याने नागरिकांना रोजगार नाही , त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे नवीन वह्य-पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. पालक जुनीच पुस्तके वह्य मुलांना देत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.

अनेक छोटे-मोठे व्यापारी दुकानांचे भाडेही देऊ शकत नाहीत. दुकानदारासमोर सध्या अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.  त्यातच शाळा महाविद्यालय बंद असल्याने शैक्षणिक साहित्य जसेच्या तसे पडून आहेत. ऑनलाइन क्लाससाठी व्यापारी आपली दुकाने चालविण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आदिवासी भाग असल्याने ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा विद्यार्थ्यांकडे नाहीत. त्यामुळे दुकानाकडे फारसे ग्राहक येत  नसल्याने दुकानदारांना बँकेचे कर्ज, दुकानाचे भाडे, वीजदेयक, नोकरांचे पगार देणे कठीण झाले आहे. परिणामी, वह्य- पुस्तक विक्रेत्याचा व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे.

दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होतात. गेल्या वर्षीही शाळा सुरू झाल्या नाहीत, तसेच याही वर्षी शाळा कधी सुरू होतील याची खात्री नाही. त्यामुळे सर्व शालेय साहित्य तसेच पडून आहे. शहरी भागांत ऑनलाइन क्लासमुळे थोडा फार व्यवसाय होतो, परंतु ग्रामीण आदिवासी भागात तीही सुविधा नसल्याने शालेय साहित्य विक्रीचा व्यवसाय १० टक्के च्या आसपाससुद्धा होत नाही.

– संतोष किणी, स्थानिक शालेय साहित्य विक्रेता