News Flash

सामूहिक शेळी व बोकड पालन पेढी उभारणार

आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी  सामूहिक शेळी व बोकड पालन पेढी (गोट बँक ) ही संकल्पना  जिल्ह्य़ात राबविण्याचे विचारधीन आहे. 

सामूहिक शेळी व बोकड पालन पेढी उभारणार

आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी पालघर जिल्ह्य़ातील महिलांचा पुढाकार

निखील मेस्त्री

पालघर : आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी  सामूहिक शेळी व बोकड पालन पेढी (गोट बँक ) ही संकल्पना  जिल्ह्य़ात राबविण्याचे विचारधीन आहे.  यासाठी महिलांनी पुढाकार  घेतला असून त्याअंतर्गत  प्रायोगित तत्वावर  जव्हार येथील सात गावांतील विविध बचत गटाच्या सुमारे १०० महिलांनी यासाठी आपली तयारी दर्शविली आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानाच्या उमेद अभियानांतर्गत  महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत वाडा कुरखेडा येथे  सामूहिक शेळी व बोकड पालन पेढी  संकल्पना यशस्वी झाली आहे. याच धर्तीवर जिल्ह्यतील बचत गटाच्या महिला ही संकल्पना राबविण्याच्या तयारीत आहेत. जव्हार तालुक्यात हा प्रयोग असला तरी पुढे याची व्याप्ती जिल्हाभर होणार आहे. विविध बचत गटाच्या इच्छुक असलेल्या ३० ते ४० महिलांचा गट तयार करून त्याद्वारे ही संकल्पना राबवली जात आहे.

किमान खर्चात जादा उत्पन्न

सामूहिक शेळी व बोकड पालन केल्याने त्याला किमान खर्च येणार आहे. लसीकरण, आरोग्य, खाद्य सुविधा, पशुवैद्यकीय सेवा याचे नियोजन पेढीमार्फत करण्यात येणार  आहे.  १०० महिलांमार्फत सुरू होणाऱ्या या प्रकल्पात तीन ते चार गट तयार करून त्यातून दोनशे गरोदर शेळी पहिल्या टप्प्यात खरेदी केल्या जातील. त्यानंतर एका शेळीला किमान दोन करडू झाल्यास त्यांची संख्या चारशे होईल. त्यातील निम्मे करडू पेढी पालनाकडे दिल्या जातील व निम्मे गटांकडे राहतील. सहा आठ महिन्यात सुरक्षित देखभालीनंतर चांगले मांस देणारा बोकड तयार होईल. याला चांगला बाजारभाव प्राप्त होणार असल्याने मिळणाऱ्या पैशातून महिला आणखीन माफक दराने कर्जाऊ शेळ्या विकत घेऊ शकतात. वर्षभरात एका शेळीपासून तीन ते चार चांगले बोकड तयार होतात. चांगले मांस असलेल्या दर्जेदार बोकडाला आठ ते दहा हजार प्रति नग दर मिळत आहे.

सात ते आठ महिलांच्या समूहाला या प्रकल्पातून कायमस्वरूपी तर आठशे महिलांना अंशकालीन रोजगार प्राप्त होऊ शकतो. शेळीचे उत्पन्न चाळीस महिन्यात एक हजार एकशे वरून दोन लाख सत्तर हजापर्यंत अत्यल्प खर्चात वधारते. कमी भांडवलात एक सामूहिक पेढी चार वर्षांंत चांगल्या प्रतीच्या वाणांच्या शेळीचे भांडवल २१ कोटी रुपयांपर्यंत करू शकते.

वाडा येथे भारतातील पहिली पेढी

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फम्त वाडा कुरखेडा येथे सुरू केलेल्या सामूहिक शेळी व बोकड पालन पेढी (गोट बँक) ही भारतातील पहिलीच नोंदणीकृत पेढी (पेटंट) आहे. सुरुवातीला तीनशे शेळीचे भांडवल असलेल्या या पेढीतून आतापर्यंत ११४० च्या जवळपास शेळ्या तयार झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यत दोन पेढय़ा, वाडा तालुक्यात दोन तर पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात एक पेढी तयार करण्याचे करार झालेले आहेत. दुग्ध सहकारी संस्थाच्या धर्तीवर शेळी दूध प्रकल्प संस्था उभारण्यासाठी व पेढी उभी करण्यासाठी या पेढीने मालेगाव येथील माजी सैनिकांच्या व्यंकटेश्वरा सहकारी संस्था यांच्याशी सामंजस्य करार केलेले आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर महिला सशक्तीकरणासाठी शेळी पेढी एक उत्तम पर्याय व मार्ग आहे, असे वाडा येथील शेळी पेढीचे संस्थापक नरेश देशमुख यांनी म्हटले आहे.

महिलांची उपलब्ध असलेली जमीन किंवा एखाद्या शेतकऱ्याने देऊ केलेली जमीन बोकड पालनासाठी वापरात आणली जाणार आहे. याअंतर्गत चांगल्या प्रतीच्या शेळीचे पर्याय महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमात इच्छुक असलेल्या महिलांना त्यांच्या बचत गटांमार्फत आर्थिक सहाय्य घेता येईल किंवा महिला वैयक्तिक स्वरूपातही यामध्ये गुंतवणूक करू शकतात. पेढी तयार झाल्यानंतर महिलांना गटांमार्फत चांगल्या प्रकारच्या गरोदर शेळी माफक दरात उपलब्ध होणार आहे. शेळीला करडू झाल्यानंतर एक करडू पेढीत जमा करायचे आहे व इतर करडू महिलांनी स्वत:जवळ ठेवायचे आहे.पेढीत करडू जमा करून त्यांच्या कर्जाची परतफेड शेळीरूपात केली जाईल. अशा प्रत्येक खेपेला एक करडू पेढीत जमा करायचे आहे. या करडूसह महिलांकडे असलेल्या शेळी व बोकड यांची निगा, पशुवैद्यकीय सेवा, खाद्य, मांस वाढीसाठीचे मार्गदर्शन पेढी मार्फत दिले जाणार आहे. याशिवाय बोकड तयार झाल्यानंतर महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात पेढी मदत करेल. स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी मिळाल्याने स्थलांतर थांबेल, असा विश्वास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक माणिक दिवे यांनी व्यक्त केला आहे.

महिला सशक्तीकरण हे जिल्हा परिषदेच्या प्रमुख उद्दिष्टयापैकी एक आहे. स्थानिक स्तरावर महिलांना एकत्रित आणत त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी ही संकल्पना उपयुक्त व लाभदायी आहे. महिलांचा विकास हाच आम्हा सर्वांचा ध्यास आहे.

-वैदेही वाढाण, अध्यक्षा, जि.प.पालघर

शेळी पेढी या संकल्पनेतून महिला बचत गटांना सक्षम करून त्यांच्या आर्थिक उन्नतीचा एक चांगला स्रेत निर्माण होत आहे. उत्पन्नाचे चांगले साधन याद्वारे मिळाल्याने त्यांचे सबलीकरण होईल असा पक्का विश्वास आहे.

-सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.पालघर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 1:24 am

Web Title: collective goat and goat rearing firm will be set up ssh 93
Next Stories
1 दगड, मातीचे ढिगारे शेतातच
2 जव्हार, मोखाडय़ाची वीजसमस्या कायम
3 जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक
Just Now!
X