कोविड केंद्रामुळे उपचारासाठी ३५ किलोमीटरवरील तालुक्याच्या ठिकाणी धाव

कासा : डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून कोविड केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे इतर रुग्णांची उपचारासाठी फरपट सुरू आहे. अपघात व इतर आजाराच्या रुग्णांना उपचारांसाठी ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.  रविवारी सर्पदंश झालेल्या एका महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

कासा  उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती ठिकाण असून जवळपास ३५ ते  ४० गावे जोडली गेली आहेत. मात्र सध्या येथे दोन महिन्यांपासून कोविड केंद्र सुरू असल्याने बाह्यरुग्ण दाखल केले जात नाही. त्यासाठी अपघात व इतर आजाराच्या उपचारांसाठी ३० ते ३५ किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.  रविवारी धरमपूरमध्ये सर्पदंश झालेल्या एका महिलेचा उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर ओसरवीरा येथील  विंचूदंश झालेल्या एका मुलीला रुग्णालयाने उपचारास नकार दिला.

अपघातातील जखमी , महिला प्रसूती, पोटदुखी ,ताप, सर्पदंश, विंचू चावणे व इतर किरकोळ आजार असणाऱ्या  रुग्णांना  सदर  रुग्णालयात दाखल केले जात नाही. त्यामुळे असे रुग्ण येथे उपचारांसाठी आल्यावर त्यांना तवा व गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले जाते . मात्र या रुग्णालयात  सुविधांचा अभाव तसेच निवासी  डॉक्टर नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.   रुग्ण येथे उपचारांसाठी आल्यावर त्यांना तवा व गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले जाते . मात्र या रुग्णालयात  सुविधांचा अभाव आहे. कासा उपजिल्हा रुग्णालय सामान्य आजारांसाठी खुले राहिले असते तर कदाचित त्या सर्पदंश झालेल्या महिलेचा जीव वाचला असता, त्यासाठी आतातरी कासा उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड केंद्र इतर जागी हलवावे व सर्व इतर आजारांसाठी रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कासा उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर असल्याने प्रशासनाच्या आदेशानुसार बाह्य रुग्ण दाखल केले जात नव्हते,  मात्र उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आता सर्व आजारांचे बाह्यरुग्ण  दाखल केले जातील, मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आमची ओढाताण होत आहे.  -प्रदीप धोडी, वैद्यकीय अधिकारी कासा, उपजिल्हा रुग्णालय