धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची क्षमता क्षीण; दगडी बंधाऱ्याचे दगड वाळूत गडप

डहाणू: डहाणू नगर परिषद क्षेत्रात, डहाणू दिवादांडी ते पारनाका अशा १००० मीटरच्या किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा आदळू लागल्याने किनाऱ्यावरील गावात भीतीचे वातावरण आहे. काही भागांत बांधण्यात आलेल्या दगडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे दगड पसरून मोठमोठाले दगड वाळूमध्ये गाडून बंधारा जमीनदोस्त होत आहेत. धूपप्रतिबंधक बंधाऱ्यात लाटांना अडवण्याची क्षमता नष्ट झाल्याने किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे.

दिवादांडी ते दुबळपाडादरम्यान धोकादायक बनलेल्या वस्तीच्या भागात नवीन धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची आवश्यकता असताना धोका नसलेल्या पारनाका येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याचा घाट प्रशासनाने घातल्याने मच्छीमार बांधवांनी अभियंता, हार्बर इंजिनीअर डिव्हिजनल (नॉर्थ), सार्वजनिक बांधकाम विभाग, कोकण भवन यांना पत्राद्वारे विरोध दर्शवला आहे.

पारनाका भागात मोठ-मोठय़ा विकासकांच्या इमारती असून त्यांचे संरक्षण भिंत उभारल्याने त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. कीर्तना बंगला ते सतीपाडा या भागांतील वस्तीचा किनाराच नष्ट होत आहे. येथील वसाहतीमधील घरे नेहमीच अतिभरतीच्या पाण्याच्या प्रवाहाने बाधीत होऊन कोसळत आहेत.

१९९१ ते २००२ च्या दरम्यान अतिभरतीच्या लाटेमुळे डहाणू किनारपट्टीवरील दिवादांडी ते दुबळपाडापर्यंत ६५ घरे कोसळून नष्ट झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. १९९१ पासून येथील ग्रामस्थांनी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी केली आहे.

डहाणू दिवादांडी ते दुबळपाडा किनाऱ्याची मोठय़ा प्रमाणात झीज झाल्याने समुद्राचे पाणी वसाहतीपर्यंत येऊन सर्वत्र किनाऱ्यावरील घरांचे नुकसान होऊ लागले आहे. दुबळपाडा ते डहाणू स्मशानभूमीपर्यंत दोरखंडाने बांधलेले चौरस दगडी बंधारा टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे पारनाका ते सतीपाडापर्यंत गुरांचा दवाखाना या भागांत तारेच्या जाळीद्वारे बंधारा टाकण्यात आला होता. परंतु सदरचे बंधारे येथील अतिभरतीच्या लाटेने कोसळले व  बंधाराही नाहीसा होत गेला. दिवादांडी ते पारनाकादरम्यानच्या एक हजार मीटर किनाऱ्यापैकी डहाणू दिवादांडी ते कीर्तना बंगला ३०० मीटर दगडी बंधारा टाकण्यात आला आहे. तोही विस्कळीत झाल्याने जमीनदोस्त झाला आहे. दरम्यान, कीर्तना बंगला ते दुबळपाडा २०० मीटर बंधारा, दुबळपाडा ते सतीपाडा २०० मीटर बंधारा, सतीपाडा ते पारनाका ३०० मीटर बंधारा असे ३ टप्प्याने धूपप्रतिबंधक बंधारा घालण्याची मागणी केली आहे. ज्या भागात वसाहतीपर्यंत पाणी येऊन घरे नष्ट होत असल्याचे चित्र आहे.

धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची आवश्यकता ही पक्कय़ा स्वरूपाची आहे किंवा मोठ-मोठय़ा दगडाची बंदिस्ती असल्यास त्यांचा टिकाव लागेल. डहाणू दिवादांडी ते कीर्तना बंगला असा धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला होता, परंतु कीर्तना बंगला ते दुबळपाडा येथे बंधारा न टाकल्यामुळे दरवर्षी तेथील घरे कोसळत आहेत.

– हरेश मर्दे, मच्छीमार नेते, डहाणू