डहाणू : डहाणू तालुक्यात रविवार  भल्या पहाटे दोन वाजल्यापासून ढगांच्या कडकडाट आणि विजेच्या लखलखाटात झालेल्या अतिवृष्टीमुळे कंक्राडी नदीला पूर आला.   पुरामुळे इराणी रोड, सागर नाका, के. टी.नगर. थर्मल पावर रोड, रेल्वे स्टेशन परिसर, एस.टी. बस स्थानक पुराच्या पाण्याखाली गेला.

डहाणू नगर परिषदेसमोरील चंद्रिका हॉटेल, मंजुनाथ हॉटेल, कपडय़ांची, किराणा मालाची, औषधाची, इलेक्ट्रिक वस्तूच्या दुकानात पुराचे पाणी घुसून त्यामुळे शेकडो दुकाने, धान्याचे गोदामे, पार्किंग केलेल्या मोटार कार पाण्याखाली गेल्यामुळे व्यापाऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले.  डहाणू रोड रेल्वे स्थानक परिसरातील इराणी रोडवरील वसंत सरिता व रॉयल गार्डन कुंपणाची भिंत तुटून पुराचे पाणी आत घुसून पार्किंग केलेल्या दुचाकी आणि मोटारकार पाण्यात बुडून त्यांचे प्रचंड नुकसान झाले.

पुराच्या पाण्याने डहाणू एस.टी.आगार बुडून गेल्याने आगाराला समुद्राचे स्वरूप आले होते. एस.टी बस पाण्यात बुडून गेल्या होत्या. तर केटी नगर परिसरात दोन दोन फूट पाणी साचले होते. बँक ऑफ बरोडासमोरील विविध प्रकारची दुकाने पाण्याखाली गेली होती.

तर पाण्याच्या प्रवाहाने कंक्राडी पुलावरील रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. डहाणू शहरात चंद्रिका हॉटेल, सागर नाका, केटी नगर येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गकडे तसेच रेल्वे स्टेशनकडे जाण्याचे रस्ते बंद झाले. या अतिवृष्टीमुळे वाणगाव, चिंचणी आणि चिंचणी डहाणू रस्त्यावरील वरोर पुलावर पाणी आल्याने रविवार दुपापर्यंत वाहतूक बंद होती, त्यामुळे प्रवाशांचे खूप नुकसान होऊन रविवारी घरीच बसावे लागले.

दरम्यान, अधिकतर पाऊस रविवारी पहाटे तीन ते पाचदरम्यान झाल्यामुळे अनेक भागांत पावसांचे पाणी जमले होते. अनेकदा मोऱ्या व पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक मुख्य मार्ग रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.