पालघर : चक्रीवादळ यादरम्यान भरकटलेला तराफामधून (बार्ज)  इंधनाची गळती होऊ लागल्यानंतर तराफामधील ८० हजार लिटर इंधन काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या इंधनाच्या साठवणुकीमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार आल्याने हंगामी पद्धतीने पालघरमध्ये साठवण्यात आलेल्या ६६ हजार लिटर इंधनाची दोन दिवसांत विल्हेवाट लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

१७ व १८ मे रोजी दरम्यान झालेल्या चक्रीवादळत गेल कन्स्ट्रक्शन्स कंपनीचा तराफा समुद्रात भरकटले होते.  तराफा पालघर तालुक्यातील व वडराई व  शिरगाव दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर लागल्यानंतर काही दिवसांनी  त्याच्या इंधन टाकीमधून गळती सुरू झाली. ही गळती थांबविण्यात आल्यानंतर या तराफामध्ये असलेले ८० हजार लिटर इंधन (डिझेल) बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंधन काढण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने हे पाणीमिश्रित इंधन पालघर येथील पीडको औद्योगिक वसाहतीमधील एका बंद कारखान्याच्या आवारात साठविण्यास आरंभ केला. दरम्यान, इतक्या मोठय़ा प्रमाणात इंधनाचा साठा ठेवल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल या दृष्टीने तक्रारी पुढे येऊ लागल्या. जिल्हापुरवठा अधिकारी, पालघरचे तहसीलदार तसेच पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी करून हा संपूर्ण परिसर काल सायंकाळी उशिरा सील केला होता.  उद्योगाकडे ज्वलनशील पदार्थ साठवणूक करण्याची परवानगी नसल्याने तसेच त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षिततेची उपकरणे नसल्याने इंधन साठय़ाची विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला व तराफा मालकांना दिले आहेत.

यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ व डीजी शिपिंग यांची परवानगी प्राप्त असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या इंधनामध्ये पाणी मिसळले असल्याने याचा थेट इंधन म्हणून उपयोग करणे शक्य नसल्याचे ते पुढे म्हणाले. याच कारणामुळे इंधनाची ज्वलनशील क्षमता कमी झाल्याचे सांगून विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणी हा इंधनसाठा स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे त्यांनी सांगिलते.