वाडा : पंचायत समिती वाडा, ‘प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन’ आणि ‘ब्लू स्टार लिमिटेड’ यांच्या संयुक्त माध्यमातून वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळांमध्ये डिजिटल साक्षर टॅब मोफत पुरविण्यात आले आहेत. या टॅबच्या माध्यमातून या शाळांतील विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता डिजिटल साधनांच्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिली ते दहावीचे विद्यार्थी पहिल्यांदाच डिजिटल साक्षर टॅबच्या माध्यमातून भाषा, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान हे विषय शिकणार आहेत. यामुळे  जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होऊन त्यांची कौशल्ये वृद्धिंगत होण्यास मदत होईल.

वाडा तालुक्यातील घोणसई, देवघर, बिलोशी, गोऱ्हे आणि केळठण या पाच केंद्रांतील प्रत्येकी पाच अशा २५ शाळांसाठी टॅबचे वितरण जिल्हा परिषद शाळा देवघर येथे नुकतेच (१ सप्टेंबर) करण्यात आले.

या कार्यक्रमाला ‘प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम यादव, सापरोंडे-मांगाठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जान्हवी पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.