अणुऊर्जा केंद्रातील सुरक्षा चाचपणीसाठी कवायत; ‘एनडीआरएफ’चा समावेश

पालघर : तारापूर अणुऊर्जा केंद्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या कारवाईची लुटुपुटुची कवायत ‘मॉकड्रील’चे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या योजनेत राज्य सरकारच्या विविध विभागांमधील तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याचा तयारीच्या आढावा घेण्यात आला.

तारापूर अणुऊर्जा केंद्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रकल्पाच्या परिघाबाहेर असलेल्या नागरिकांना घरात राहण्याच्या, उघडय़ावरील खाद्यपदार्थ न खाण्याच्या सूचना देणे, ‘आयोडीन टॅबलेट’चे वितरण करणे व आवश्यकता भासल्यास त्यांचे स्थलांतर करणे यादृष्टीने शासनाच्या विविध विभागांच्या तयारीचा अभ्यास करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीतील सुरक्षा चाचपणीच्या कवायतीचे आयोजन विशिष्ट कालावधीनंतर नियमित पणे केले जात असते. केंद्रस्तरीय निरीक्षक तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) यांच्या उपस्थितीत तारापूर अणुशक्ती केंद्रातील ‘मॉकड्रील’चे आयोजन करण्यात आले. तारापूर अणुऊर्जा केंद्रात दुपारी ११.२० वाजता केंद्राच्या आवाराबाहेर व्याप्ती असणारी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची घोषणा करण्यात आली. वाऱ्याची दिशा व आपत्कालीन परिस्थितीचे स्वरूप व व्याप्ती पाहता प्रथम एका प्रभागांमधील (झोन) तीन गावे स्थलांतरित करण्याचा आराखडा आखण्यात आला होता. काही अवधीनंतर त्यामध्ये बदल करून चार प्रभागांमध्ये गावांच्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देणे व त्यापैकी एका गावांमधील ग्रामस्थांच्या भेटीसाठी महसूल व आरोग्य पथकाने दाखल होऊन एकंदर परिस्थितीबद्दल ग्रामस्थांना सतर्क केले.

या ‘मॉकड्रील’मध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या सदस्यांसह महसूल विभाग, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पशुसंवर्धन विभाग, राज्य परिवहन सेवा, अग्निशामक दल, नागरी संरक्षण दल, आरोग्य विभाग कोस्टकार्ड, परिवहन विभाग व पोलीस दलातील सदस्य सहभागी झाले होते.

आपत्कालीन कक्षाची स्थापना नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्याला सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन कार्यामध्ये सोपविलेल्या जबाबदाऱ्या व नेमून दिलेली कार्ये किती कालावधीत पूर्ण होतात तसेच असे करताना कोणत्या अडचणी, चुका व त्रुटी आल्या याचा अभ्यास करण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिली.

भीतीमुळे नागरिकांचे स्थलांतर

या सुरक्षा चाचपणीच्या कवायतीचे काही संदेश समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळाचे व चिंतेचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे या ‘मॉक ड्रिल’बाबत स्थानिक पत्रकारांना कोणतीही कल्पना नसल्याने तसेच याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नसल्याने गोंधळात भर पडली. १९८९ मध्ये ‘मॉक ड्रिल’च्या भीतीने हजारोंच्या संख्येने स्थानिकांनी स्थलांतर केले होते. अशाच पद्धतीचे गोंधळाचे वातावरण काही काळ पालघर परिसरात दिसून आले.