पालघर, बोईसरमधील शासकीय प्रसूती केंद्र विविध कारणांमुळे बंद; खासगी प्रसूतिगृहाचे दर अवाक्याबाहेर

नीरज राऊत, लोकसत्ता
पालघर
: पालघर-बोईसर या शहरी भागांमध्ये शासकीय प्रसूती केंद्र वेगवेगळ्या कारणांमुळे बंद असल्याने प्रसूतीसाठी सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच शासकीय केंद्र बंद असल्यामुळे त्याचा लाभ घेऊन खासगी प्रसूतिगृहांनी अवास्तव दरवाढ केली आहे.  त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय प्रसूती केंद्र सुरू करा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

पालघर ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांंपासून स्त्रीरोग तज्ज्ञ कार्यरत असले तरीही दाखल होणाऱ्या इतर आजारांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना लगतच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रसूती केंद्रामध्ये पाठवण्यात येत असे. शिवाय पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्याने अनेक महिलांना प्रसूतीच्या अखेरच्या टप्प्यात गुंतागुंती झाल्याचे कारण सांगून शहरातील खासगी रुग्णालयांकडे पाठविण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रसूतिगृह व रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांंपासून देखभाल दुरुस्ती न झाल्याने इमारती मोडकळीस आल्या आहेत. तसेच या ठिकाणी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने सर्वसाधारण प्रसूती केल्या जातात. ६० वर्षांंपेक्षा जुन्या इमारतीमधील एकंदर परिस्थिती पाहता मध्यमवर्गीय नागरिकदेखील आपल्या कुटुंबीयांची प्रसूती या ठिकाणी करण्याचे टाळत असल्याचे दिसून येते. वर्षांला या प्रसूतिगृहात करोनापूर्वी वर्षांला जेमतेम २०० ते २५० प्रसूती केल्या जात असल्याची माहिती प्राप्त  झाली  आहे. करोना पाश्र्वभूमीवर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात करोनाच्या पहिल्या लाटेपासून करोना रुग्ण दाखल झाल्याने तसेच दुसऱ्या लाटेच्या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रसूतिगृहाचे करोना उपचार केंद्रात रूपांतर झाल्याने या दोन्ही ठिकाणचे प्रसूती केंद्र बंद करण्यात आले. धोकादायक स्थितीत असलेला बोईसर येथील शासकीय दवाखाना व ग्रामीण रुग्णालय बंद करून ते तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

परिणामी पालघर-बोईसर या दोन ते अडीच लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराच्या जवळपास शासकीय प्रसूती केंद्र सध्या कार्यरत नाहीत. त्यामुळे येथील प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालय किंवा तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येते. याकरिता विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था असली तरीसुद्धा दूरवर जाऊन प्रसूती करण्याऐवजी नागरिक खासगी रुग्णालयात प्रसूती करणे पसंत करत आहेत.

या विषयी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता प्रसूती दरांबाबत शासनाने परिपत्रक काढले असल्याची माहिती करून घेतो असे सांगितले. त्यानंतर पालघर- बोईसर परिसरातील प्रसूतिगृहांच्या डॉक्टरांशी बैठका घेऊन अवाजवी दरआकारणी करू नये, अशा प्रकारच्या सूचना देणार असल्याचे शल्यचिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यानंतरदेखील प्रसूतीसाठी अवाजवी दरआकारणी सुरू राहिल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेदेखील ते पुढे म्हणाले.

गेल्या चार महिन्यांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ७३४३ प्रसूती झाल्या असून त्यापैकी ४५१ सिझेरिअन शस्त्रक्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण प्रसूतीपैकी पालघर तालुक्यात १२६६ (१७ टक्के) प्रसूतीचा समावेश असून यामध्ये १२९ सिझेरियन प्रसूती आहेत. पालघर तालुक्यातील काही प्रसूती शासकीय व्यवस्थेत झाल्या असल्या तरी प्रसूती केंद्रांमध्ये होणाऱ्या एकंदर उलाढालीची व्याप्ती पुढे यात आहे.

वाढीव दर तरीही सुविधांचा अभाव

पालघर येथील खासगी प्रसूती केंद्र सर्वसाधारण प्रसूतीसाठी पूर्वी २० ते २५ हजार रुपये घेत असे, परंतु आता त्याच्यात वाढ होऊन सुमारे ४० ते ५० हजार रुपये, तर सिजेरियन प्रसूतीसाठी पूर्वी ३५ ते  ४० हजार रुपये घेतले जायचे ते आता ५५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत घेतले जात आहेत. या दरावर जिल्हा शल्यचिकित्सकांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची लुबाडणूक होत आहे, अशा तक्रारी करण्यात येत आहे. अनेक स्त्रीरोग रुग्णालय व प्रसूती केंद्रांमध्ये स्वच्छता, आवश्यक सोयी-सुविधा, फायर अलार्म सिस्टीम व इतर सुरक्षिततेच्या बाबी नसताना याकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत. शिवाय बहुतांश प्रसूतीगृहांमध्ये बालरोगतज्ज्ञ नसल्याने नवजात बालकांच्या तपासणीसाठी त्यांना इतरत्र घेऊन जाणे किंवा इतर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ यांना पाचारण करणे आवश्यक पडत आहे. त्यामुळे प्रसूतीच्या देयकांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसून येते.