|| रमेश पाटील

वाड्यातील भूमी अभिलेख, बांधकाम, आरोग्य विभाग कार्यालयांना प्लास्टिकचा आधार

वाडा : वाडा तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांना गळती लागली आहे. छपरातून होणारी गळती थांबविण्यासाठी प्लास्टिकचा आधार घेण्याची वेळ यंदाही प्रशासनावर आली आहे.  नवीन इमारतीचे प्रस्ताव धूळ खात पडून असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या कार्यालयांच्या छपरांना प्लास्टिकचे आच्छादन पांघरावे लागत आहे.

retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही
A police officer was killed in firing by a goon near the Government Medical College Hospital in Kathua Jammu and Kashmir
गुंडाच्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; अन्य जखमी, जम्मू-काश्मीरमधील घटना
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

पोलीस ठाणे व या लगत असलेल्या तहसीलदार कार्यालयाच्या इमारती ह्या ब्रिटिश सरकारने सन १९०२ मध्ये बांधलेल्या आहेत. या दोन्ही प्रमुख कार्यालयीन इमारतींचे संपूर्ण बांधकाम दगडाचे आहे. ते आजही मजबूत आहे. मात्र या इमारतींच्या कौलारू छताची दुरुस्ती गेल्या १२० वर्षांपासून झालेली नाही.  या  छतातून पावसाच्या पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे येथील दस्तऐवज भिजून खराब होऊ नये तसेच पावसाच्या पाण्याच्या गळतीचा कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी येथील छताला प्लास्टिकचा आधार द्यावा लागतो.

येथील भूमी अभिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या इमारतींचे बांधकाम गेल्या १५ ते २० वर्षांपूर्वी झालेले आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे या सर्वच इमारतींना गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी या सर्व इमारतींवर हजारो रुपये खर्च करून लोखंडी पत्रांचे शेड उभारली आहेत.  दरवर्षी शासकीय कार्यालयीन इमारतींच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असतो, वाडा शहरात शासकीय भूखंड असतानाही नवीन इमारती न बांधता ठेकेदारांच्या हितासाठी दुरुस्ती कामांवर लाखो रुपये खर्च केला जात असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त प्राचार्य परशुराम सावंत यांनी केला आहे. येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीची गळतीमुळे खूपच दुरवस्था झाली आहे. ही कार्यालयीन इमारत गेली पन्नास वर्षांपासून भाडे कराराने घेतलेली आहे. या इमारतीबाबत इमारत मालक व वीज वितरण कंपनीचा वाद न्यायालयात सुरू असल्याने गेली अनेक वर्षे या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाळ्यात या इमारतीमध्ये होत असलेल्या गळतीमुळे येथील विद्युत उपकरणे व महत्त्वाचा दस्तऐवज भिजून खराब होत आहे.

नव्या इमारतींचे प्रस्ताव रखडले

पोलीस निवासस्थान, तहसीलदार, पंचायत समिती, तालुका आरोग्य कार्यालय अशा प्रशासकीय कार्यालयांसाठी अनेक नवीन इमारतींचे प्रस्ताव निधीअभावी धूळ खात पडून आहेत. येथील लोकप्रतिनिधी, पुढारी व अधिकारी यांच्यातील अनास्थेमुळे वाडा शहरात शासकीय भूखंड

उपलब्ध असतानाही नवीन इमारती होऊ नये यासारखे तालुक्यातील जनतेचे दुर्दैव ते कोणते, असा सवाल तालुक्यातील जनतेकडून विचारला जात आहे.

तालुक्यातील तहसीलदार, पोलीस ठाणे यांच्या नवीन इमारतींचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मात्र निधी उपलब्ध झालेला नाही. निधी उपलब्ध होताच  या प्रशासकीय कार्यालयांच्या इमारतींच्या कामांना सुरुवात होईल. -अनिल भरसड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा.