मुसळधार पावसात रस्त्यांची दुर्दशा; रस्ते दुरुस्तीसाठी ७.८७ कोटींचा निधी

पालघर : गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या तसेच पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा विकास कार्यक्रमामधील ७.८७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गेल्या आठवडय़ात सोमवार ते गुरुवारदरम्यान जिल्ह्यात पालघर, वाडा, जव्हार, विक्रमगड आदी तालुक्यांत मुसळधार पाऊस पडला. नद्यांना पूर आला. पुराचे पाणी शहर, गावांमध्ये शिरल्याने तालुक्याच्या अनेक ठिकाणी सातत्याने वाहतुकीची वर्दळ असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. साकव, मोरी व पुलांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने रस्ते व मोऱ्यांचे नुकसान झाले. रस्त्यालगतची माती अनेक ठिकाणी वाहून गेली. काही ठिकाणी रस्त्यामध्ये खोल खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही खचले आहेत. वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी तसेच अपघाताला वाहनचालक तसेच प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. याबाबतच्या तक्रारी प्रत्यक्षात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मुसळधार पाऊस आणि नदीच्या पुरामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासन ७.८७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. साकव, मोऱ्या व पुलाचे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

पावसाने उघडीप घेतल्यानंतर पुराचे पाणी ओसरल्यानंतर खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्ती सुरू

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या वरई ते चारोटी या भागात राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठय़ा खड्डय़ांची दुरुस्ती आयआरबी या महामार्गाची देखभाल करणाऱ्या संस्थेने सुरू केली आहे.