विमा कंपन्यांकडून वाडय़ातील शेतकऱ्यांना हेक्टरी केवळ २२०० रुपयांची भरपाई

वाडा :  नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या  शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी काही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असल्याचे दिसून आले आहे. नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ४५ हजार ५०० रुपये रक्कम मिळणे अपेक्षित असताना केवळ  दोन हजार २०० रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्यात आली आहे.

वाडा तालुक्यात गतवर्षी जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे.  अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भातपिकाचा विमा खासगी कंपनीकडे हेक्टरी एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत रक्कम भरून काढलेला आहे. तर पालघर जिल्ह्यतील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत  सेवा सहकारी संस्थांमधून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा एच.डी.एच.एफ.सी. इग्रो इन्शुरन्स कंपनी लि. कोरेगाव पार्क, पुणे या कंपनीकडे हेक्टरी ९१० रुपये  विमा रक्कम भरून विमा घेतलेला  आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी या विमा कंपन्यांकडे नुकसानभरपाईसाठी धाव घेतली होती.

महसूल विभाग, कृषिविभाग यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ते विमा कंपनी व संबंधित विभागांकडे सादर केले होते. वारंवार या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केल्यानंतर विमा कंपनीने काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले आहेत. हेक्टरी ४५ हजार ५०० रुपये विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २२०० ते २५०० रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.

पीक कर्ज घेतलेल्या  १९ हजार ४०९ शेतकऱ्यांनी ८३ लाख ८४ हजार रुपये विम्याची रक्कम एच. डी. एच. एफ. सी. इग्रो. इन्शुरन्स या विमा कंपनीकडे भरलेली आहे. या शेतकऱ्यांना एकूण सात कोटी ८७ लाख रुपये विमा रक्कम मिळणे आवश्यक असताना आतापर्यंत ९२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी २२०० ते २५०० प्रती हेक्टरी रक्कम जमा झाली आहे.  २१ हजार ६५०  बाधित शेतकरी असून त्याचे १० हजार ३९ हेक्टर वरील पिकाचे  नुकसान झाले आहे.  दरम्यान विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी  तसेच  टोल फ्री क्रमांकावर वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

भरपाईमध्ये मोठी तफावत

विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना एकाच गावातील दोन शेतकऱ्यांना दिलेल्या प्रति हेक्टरी रकमेमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २२०० ते २५०० रुपये नुकसानभरपाई दिली आहे, तर काही ठरावीक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ४२ हजार   रुपये भरपाई दिली आहे. या तफावत रकमेमुळे गावागावात शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण सुरू झाले आहेत.

बाधित शेतकऱ्यांना मिळालेल्या विम्याच्या रकमेतील तफावतीची माहिती  संबंधित विमा कंपनीकडून घेतली जात आहे. या तफावतीस बॅंकेचा काहीही संबंध नाही.

-श्रीकांत पटारे, कृषी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे-पालघर.

शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ४५५०० रुपये विमा कंपनीकडून मिळणे क्रमप्राप्त असताना अवघे २२०० रुपये भरपाई देऊन शेतकऱ्यांची विमा कंपनीने फसवणूक केली आहे.

-पुंडलिक पाटील, शेतकरी, मानिवली, ता.वाडा.