नांदगाव, आवंढाणी, वाडाखडकोना भागात आदिवासी, वन खात्याच्या  जमिनी गिळंकृत

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत पालघर तालुक्यातील  आदिवासी तसेच वन खात्याच्या जमिनी गिळंकृत करून हॉटेल तसेच धाबे उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. महसूल तसेच वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गानजीक असलेल्या जमिनींना  चांगला भाव आला आहे. त्यामुळे खासगी जमीन मालक जमिनींचा सौदा करण्यास नकार देत आहेत.  डहाणू परिसरातील भूमाफियांनी आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. महामार्गापासून नांदगाव येथे  १०० मीटर आतमध्ये असलेल्या बाबा सवरा यांची सर्वे नं. ४५ या नवीन शर्तीच्या जागेवर बिगर आदिवासी व्यक्तीने हॉटेल बांधले असून पोच रस्त्यासाठी वन विभागाच्या सर्वे नंबर ७१ या जागेत त्याने अतिक्रमण केले आहे.  नजीकच महामार्गालगत  आवंढाणी  गावामध्ये  गंगी काळ्या मोर या आदिवासींच्या नवीन शर्तीची जागेत अनधिकृत हॉटेल बांधले आहे. तर वाडाखडकोना येथे  आदिवासी जागा न्यायप्रविष्ठ असताना त्या जागेवर अलिशान हॉटेल बांधण्याचे काम सुरू आहे.

डहाणू तालुक्यात   कासा, चारोटी, घोळ, तवा, धूंदलवाडी, जामशेत, वाणगाव, वेती वरोती, आशागड, आसवे, गंजाड या आदिवासी ग्रामीण भागांत आदिवासींच्या मोक्याच्या जमिनींवर अतिक्रमणाची वाढ झाली आहे. मात्र महसूल खाते त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे.  राजकीय पुढारींचा अशा बांधकामांना आशीर्वाद असल्यामुळे  महसूल विभागाला कारवाईत अडथळे निर्माण  होत असल्याचे एका महसूल कर्मचाऱ्याने सांगितले.

ग्रामीण भागांमध्ये देखील अनधिकृत बांधकामांना पेव फुटले असून  बऱ्याच ठिकाणी आदिवासींच्या जमिनी खरेदी करून पत्र्याची बांधकामे करण्यात आल्याचे दिसत आहे. आदिवासींना शासनातर्फे उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेल्या जमिनींची विक्री करता येत नसल्याने आदिवासी जमीन मालकांशी साठेकरार करून कुळमुखत्यार (पॉवर ऑफ पॅटर्नी) द्वारे त्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे करून त्याची विक्री करण्याचा धंदा पालघर, डहाणू तालुक्यात खुल्लेआम सुरू आहे, असे येथे म्हटले जात आहे.