तवा ग्रामपंचायतीला नोटीस

डहाणू : आदिवासी उपाययोजनेतून आदिवासी पाडय़ावर तसेच शेतीवर  जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलासमोरील मार्ग अडविल्याप्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. आदिवासी विकास प्रकल्पाने या प्रकरणी तवा ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मौजे  तवा  नमपाडा येथे सरस्वती धींडा या आदिवासी महिलेची  शेती आहे. या शेतीलगत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी साकव नसल्याने ओहोळातून बैलगाडय़ा घेऊन जावे लागते.  परिणामी रहिवाशांच्या मागणीनुसार सन २०१८-१९ मध्ये ठक्कर बाप्पा योजनेतून १३ लाख रकमेचा साकव बांधण्यात आला.

यानंतर येथील खासगी वाडीमालकाने अदिवासी योजनेतून बांधलेला पुलासमोर लोखंडी द्वार उभारून पुलाचा स्वत:च्या वाडीसाठी वापर करुन रहिवाशांची वाट रोखली आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतीवर येण्याजाण्याचा मार्ग बंद झाला आहे. ही वहिवाटीची वाट मोकळी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, जमीन मालकाने वहिवाटीच्या मार्गावार लावलेले द्वार दूर करुन रहिवाशांचा मार्ग खूला करण्यासाठी तवा ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.  याप्रकरणी  आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प डहाणूच्या  प्रकल्प अधिकारीआशिमा मित्तल यांनी  संबंधित ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

पूल बांधण्याआधी शेतकऱ्यांना  शेतावर जाण्यासाठी नाल्यातून जावे लागत होते. बैलगाडय़ा ओहळातून  घेऊन जाव्या लागत होत्या. त्यामुळे रहिवाशांच्या मागणीनुसार पुलाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पूल बांधण्याआधी रस्त्यावर रहिवाशांची वहीवाट करण्यात आली होती.

-लहू बालशी,  ग्रामपंचायत सदस्य तवा ग्रामपांचायत