News Flash

देहरजा नदीवरील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी धोकादायक

मनोर-वाडा-भिवंडी मार्गावरील देहरजा नदीवरील ६५ वर्षे जुन्या दगडी पुलाची दुरवस्था झाली आहे.

कासा : मनोर-वाडा-भिवंडी मार्गावरील देहरजा नदीवरील ६५ वर्षे जुन्या दगडी पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच ६५ वर्षे जुन्या दगडी पुलाच्या बांधकामावर अनेक ठिकाणी झाडे वाढली आहेत. पुलाचे कठडे ठिकठिकाणी तुटलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी बांधकामाचे दगड निखळले आहेत. त्यामुळे हा दगडी पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.

मनोर वाडाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील देहरजा नदीवरील हा पूल ६५ वर्षे जुना आहे. या पुलाचे बांधकाम २५ एप्रिल १९५१ रोजी सुरू होऊन ३१ मार्च १९५७ ला हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पुलाचे बांधकाम सुरू केले तेव्हा मुंबई, अहमदाबाद, राजपुताना आणि दिल्लीला जोडणारा हा एकमेव रस्ता होता. सध्या या पुलाची स्थिती खूप वाईट झालेली आहे. वाहनचालक पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. भिवंडी वाडा मनोर वाहतूक सुरळीत व्हावी, अपघात होऊ नयेत यासाठी या मार्गाने चार पदरीकरणाच्या कामाचा ठेका सुप्रीम या कंपनीला दिला होता. सुप्रीम कंपनीने रस्त्याचे व पुलाचे काम अर्धवट ठेवत टोल वसुलीचे काम सुरू केले होते. रस्त्यांची व पुलाची अर्धवट कामे सोडून दिल्यामुळे मोठय़ा प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढल्याने टोल बंद करत सुप्रीम कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला व हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला.

तरीसुद्धा या ६५ वर्षे जुन्या धोकादायक दगडी पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसात देहरजा नदी दुथडी भरून वाहते, अशातच दुर्दैवाने पूल कोसळून एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यास जुना दगडी पूल कोसळण्याची वाट पाहत आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी या ठिकाणी असणाऱ्या अर्धवट पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

या संदर्भात वाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

या धोकादायक दगडी पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या दगडी पुलाचे बऱ्याच ठिकाणी बांधकाम तुटले आहे. तरी लवकरात लवकर अर्धवट पुलाचे बांधकाम पूर्ण करून वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावा.

– धनेश सांबरे,  वाहनचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:47 am

Web Title: old stone bridge over deharja river dangerous traffic ssh 93
Next Stories
1 निवडणूक बिनविरोध
2 करोना रुग्ण अहवाल प्रसिद्ध करणे बंद
3 अनुदानाचे धनादेश जमा करण्यास बँकांकडून टाळाटाळ
Just Now!
X